Breaking News

निकालानंतर उध्दव ठाकरे म्हणाले, आयोगाने शेण खाल्ल, मग इतका खटाटोप कशासाठी? मोदींनी थेट लाल किल्ल्यावरून जाहिरच करावं

एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देण्यात आल्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला. या निर्णयामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. या निकालानंतर उध्दव ठाकरे यांनी मातोश्री या आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद आयोजित करत आपली भूमिका मांडताना केंद्रिय निवडणूक आयोगासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खोचक टीका केली.

यावेळी बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले, निवडणूक आयोगाने दिलेला निकाल निर्णय देताना जे शेण खायचं आहे ते खाल्लंच मग आम्हाला कागदपत्रे कशाला सादर करायला लावली, मग इतकंच सगळं करायचं होत तर इतका खटाटोप कशासाठी असा सवाल करत आता सर्वोच्च न्यायालयावर आमची आशा आहे. जर अशाच प्रकारे देशात लोकशाहीची हत्या होणार असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून घोषणा करावी असे आव्हानही दिले.

यावेळी शिंदे गटावर निशाणा साधताना उध्दव ठाकरे म्हणाले, आज आमचं धनुष्यबाण आणि पक्षाचं नाव चोरट्यांनी चोरलं आहे. चोर मोठे झाले आहेत. निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला तो देताना शेण खाल्लं जर असंच होणार असेल तर लोकशाहीची हत्याच होणार असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून लोकशाहीला आदरांजली वहावी आणि आम्ही बेबंदशाही देशात सुरू करतो आहोत हे जाहीर करावं अशी खोचक टीकाही केली.

७५ वर्षांचं स्वातंत्र्य आता संपलं आहे आणि आम्ही बेबंदशाही सुरू केली आहे हे मोदींनी जाहीर करावं. न्याय यंत्रणाही आपल्या दबावाखाली येईल याचा प्रयत्न सुरू आहे. न्यायमूर्ती नेमण्याचे अधिकारही त्यांना हवे आहेत. देशातल्या लोकशाहीला भावपूर्ण आदरांजली आता भाजपाने आणि पंतप्रधानांनी वाहण्याचं धाडस दाखवावं. २१ तारखेपासून सर्वोच्च न्यायालयातही सलग सुनावणी सुरू होईल. तो निकाल लागेपर्यंत निवडणूक आयोगाने निर्णय देऊ नये असं आम्ही म्हटलं आहे. उद्या कुणीही धनाढ्य माणूस उद्या एखादा पक्ष अशाच पद्धतीने पैशांच्या जोरावर विकत घेऊ शकतो अशी भीतीही उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केली.

उध्दव ठाकरे म्हणाले, चोराला राजमान्यता देणं हे काही लोकांना भूषण वाटत असेल पण राजमान्यता दिली तरी तो चोरच असतो. मी अनेकदा आव्हान दिलं आहे की हिंमत असेल तर निवडणुका घ्या. पण ती हिंमत झालेली नाही. ज्या पद्धतीने भाजपाने मिंधे गटाला धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव दिलं आहे. त्यावरून मला वाटतं आहे की निवडणूकही उद्या जाहीर करतील आणि मुंबई महापालिका जिंकून तिच्या हाती भिकेचा कटोरा देतील अशी टीकाही केली.

एवढंच नाही तर आपल्या पूजेत धनुष्यबाण आहे. बाळासाहेब ठाकरेंनी त्याची पूजा केली आहे. तो धनुष्यबाण आणि त्याचं तेज हे माझ्याकडून कुणीही हिसकावू शकत नाही. कागदावरचा धनुष्यबाण आणि चिन्ह चोरांनी चोरलं असेल तरी हरकत नाही आम्ही या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणारच आहोत. तोपर्यंत आपली चोरी पचल्याचे पेढे चोरांना खाऊ द्या असाही टोला उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे गटाला लगावला. लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत घातक निकाल निवडणूक आयोगाने दिला असल्याचा आरोपही केला.

Check Also

पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील दौऱ्यात महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार

भाजपाचा मित्र पक्ष जेडीएसचा लोकसभा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने शेकडो महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर लैंगिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *