Breaking News

आयोगाच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत होतो… बाळासाहेबांचा विचार तीच खरी शिवसेना

हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे ही आनंदाची गोष्ट आहे. मी एकनाथ शिंदे आणि इतर सर्व मंडळींचं अभिनंदन करत होतो. आम्ही पहिल्या दिवसापासून हेच सांगत होतो की शिवसेना ही विचारांची शिवसेना आहे. कुणीही खासगी मालमत्ता म्हणून शिवसेनेवर अधिकार सांगू शकत नाही. बाळासाहेबांचा विचार ज्यांच्याकडे तीच खरी शिवसेना असं आम्ही सांगत होतोच. निवडणूक आयोगाने यावरच शिक्कामोर्तब केलं आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

केंद्रिय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह धनुष्य बाण एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे असलेले भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीशीं बोलताना आपली प्रतिक्रिया दिली.

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, यापूर्वीच्या सगळ्या निर्णयांमध्ये निवडणूक आयोगाने असाच निर्णय दिला आहे. आमदार आणि खासदार यांची संख्या लक्षात घेऊनच निवडणूक आयोग निर्णय घेत असतं. आमदार आणि खासदार यांच्या मार्फत मतं किती मिळाली हे ठरतं. त्याच अनुषंगाने हा निर्णय झाला आहे. मी निकाल पूर्ण वाचला नाही त्यामुळे त्याचं विश्लेषण करणार नाही असंही स्पष्ट केले.

देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले, बाळासाहेबांच्या विचारांवर चालणाऱ्या एकनाथ शिंदेंना पक्ष आणि चिन्ह मिळालं याचा मनस्वी आनंद झाला आहे.

२१ जून २०२२ ला शिवसेनेत बंड झालं होतं. यानंतर एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत ४० आमदार सत्तेतून बाहेर पडले. त्यांना गद्दार असं संबोधलं गेलं. मात्र शिवसेनेत दोन गट पडले. आता या गटांचं भांडण निवडणूक आयोगाच्या दारात आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात गेलं.
हे बंड झाल्याने महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं. २९ जूनला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर ३० जूनला एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आता या घटनेला इतके दिवस झाल्यानंतर निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह हे दोन्ही एकनाथ शिंदे यांना दिलं आहे.

Check Also

पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील दौऱ्यात महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार

भाजपाचा मित्र पक्ष जेडीएसचा लोकसभा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने शेकडो महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर लैंगिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *