संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र या नियुक्तीवर आनंद व्यक्त करण्याआधी कृपया सत्यता नीट समजून घ्या असे आवाहन शिवसेना उबाठाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी समाज माध्यमांवर एका पोस्टच्या माध्यमातून केले. त्यासाठी सुषमा अंधारे यांनी खैरलांजी प्रकरण, अजमल कसाब प्रकरणाचा दाखला देत उज्वल निकम यांच्या विशेष सरकारी वकील म्हणून कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले.
सुषमा अंधारे आपल्या पोस्टमध्ये म्हणाल्या की, २९ सप्टेंबर २००६ रोजी नागपूर पासून ३७ किलोमीटर अंतरावर तुमसर तालुक्यातील खैरलांजी गावामध्ये भोतमांगे हत्याकांड घडले होते. सिद्धार्थ गजभिये या गावातील एका दलित व्यक्तीचे शेतातील रस्त्यावरून स्थानिकांशी भांडण झाले. हल्ल्यातून बचावलेल्या गजभियेने कामठी गावात जाऊन पोलिसात तक्रार दिली आणि या तक्रारीमध्ये साक्षीदार भैयालाल भोतमांगे आणि सुरेखा भोतमांगे झाले. गावकऱ्यांनी राग मनात धरला आणि भोतमांगेच्या झोपडीवर हल्ला चढवला ज्यात पत्नी सुरेखा मुलगी प्रियांका आणि दोन मुलं रोशन आणि सुधीर यांच्या हत्या झाल्या. अल्पवयीन प्रियंका हिच्यावर अमानुष सामूहिक बलात्कार करून हालहाल करून मारले गेले. या प्रकरणात सरकारी वकील नेमले होते उज्वल निकम.
पुढे आपल्या पोस्टमध्ये सुषमा अंधारे म्हणाल्या की, एका दलित कुटुंबाला इतके हाल हाल करून अत्यंत क्रूर पद्धतीने मारले. ही केस देशात नाही तर संपूर्ण जगात गाजली. युनो UNO अर्थात आंतरराष्ट्रीय संघटनेच्या पटलावर या केसची चर्चा झाली. मात्र या केस मध्ये साधी ॲट्रॉसिटी लागली नाही. या प्रकरणात एकूण ४० आरोपी होते. चाळीस वरून त्यांची संख्या ११ वर गेली. फाशीची शिक्षा कुणालाही झाली नाही. खटला चालू असतानाच ११ पैकी दोघांचे मृत्यू झाले. कुटुंबातला शेवटचा माणूस भैय्यालाल न्याय मागता मागता २०१७ साली हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू पावला असल्याची आठवणही यावेळी करून दिली.
त्यानंतर सुषमा अंधारे म्हणल्या की, अॅडव्होकेट उज्वल निकम प्रकाशझोतात आले ते अजमल कसाब केसमुळे. पण लक्षात घ्या कसाबच्या केस मध्ये कोणीही वकील असता तरी कसाबला फाशीचं झाली असती. कारण त्याच्या विरोधात प्रचंड पुरावे होते आणि राष्ट्रविरोधी कारवाई मध्ये तो घटनास्थळी सापडला होता. याच अजमल कसाब च्या केस मध्ये अजून दोन लोक होते फहीम अन्सारी आणि सबाउद्दीन अहमद ज्यांच्या खिशामध्ये राजभवन चा नकाशा सापडला होता अन हे दोन आरोपी सुटलेले आहेत हेही कृपया लक्षात घ्यावे ही बाबही त्यांनी निदर्शनास आणून देत पुढे म्हणाल्या की, अॅडव्होकेट उज्वल निकम यांच्या मुलानेच धनंजय मुंडे यांची केस लढली होती हे कृपया विसरून चालणार नाही अशी आठवणही यावेळी करून दिली.
सुषमा अंधारे यांनी उज्वल निकम यांच्या निवडणूक उमेदवारीवरून बोलताना म्हणाल्या की, उज्वल निकम यांनी भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढली. गेल्या दहा वर्षापैकी साडेसात वर्ष त्याच भाजपाचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस राहिले आहेत. आणि ते गृहमंत्री असतानाच परळी किंवा बीडमध्ये पोलिसांचा हैदोस चालू असतो हे विसरून चालणार नाही. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजूनही देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांच्या बडतर्फ्या केलेल्या नाहीत. तरीसुद्धा आपल्या केस मध्ये वकील कोण असावा कोण नसावा हे ठरवण्याचा संपूर्ण अधिकार हा त्या पिडीत कुटुंबाचा असतो. त्यामुळे उज्वल निकमांची नियुक्ती ही जर धनंजय देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांना हवी असेल तर तो त्यांचा स्वतंत्र अधिकार असल्याचेही यावेळी सांगत आणि आपण त्यांच्या इच्छेचा सन्मान केला पाहिजे अशी आशाही राज्य सरकारकडून व्यक्त केली.
Marathi e-Batmya