Breaking News

यशवंतराव चव्हाण यांच्या वाक्याच्या संदर्भ देत अमित शाह म्हणाले, शिवाजी महाराज नसते तर…. शिवसृष्टीचे उद्घाटन केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलताना दिला संदर्भ

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधत शिवशाहीर स्व.बाबासाहेब पुरंदरे यांच्या मनातील शिवसृष्टीचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात बोलताना अमित शाह म्हणाले की, मला आज यशवंतराव चव्हाण यांचं वाक्य आठवतं आहे ते म्हणाले होते की, छत्रपती शिवराय नसते तर भारताचं काय झालं असतं हे सगळ्या जगाला माहित आहे. पाकिस्तानची सीमा शोधण्यासाठी फार दूर जावं लागलं नसतं कदाचित तुमच्या माझ्या घराच्या बाहेरच ही सीमा असती. मी यावर काही भाष्य करणार नाही. पण शिवाजी महाराजाचं जीवन हे सत्तेच्या लालसेसाठी नव्हतं. त्यांनी होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडली. स्वराज्य, निष्ठा आणि स्वधर्म यासाठी त्यांनी संघर्ष केला असल्याचे सांगितले.

आजचा दिवस हा ऐतिहासिक आहे. छत्रपती शिवरायांची जयंती आपण साजरी करत आहोत आणि शिवसृष्टीचं लोकार्पण होतं आहे. मी या कार्यक्रमाला उपस्थित आहे हे माझं भाग्य आहे असं अमित शाह यांनी म्हटलं आहे. छत्रपती शिवरायांना मी कोटी कोटी नमस्कार करतो असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे. त्यांनी देशासाठी आणि राज्यासाठी जे योगदान दिलं ते अतुलनीय आहे त्यालाही मी वंदन करतो असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे.

यावेळी अमित शाह यांनी स्व.शिवशाहिर पुरंदरे यांचे कौतुक करताना म्हणाले की, बाबासाहेब पुरंदरे यांनी आपलं सगळं आयुष्य छत्रपती शिवराय या एका विषयावर खर्ची घातलं. संपूर्ण देश फिरून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज काय आहेत त्याची माहिती घेतली आणि जनतेलाही त्याची ओळख करून दिली. बाबासाहेब पुरंदरे यांनी जाणता राजा हा प्रयोग केला होता. त्यावेळी मी गुजरातमध्ये होतो गुजरातमध्ये आम्ही ८ जिल्ह्यात जाणता राजाचे प्रयोग केले. छत्रपती शिवाजी महाराज की जय हे नारे कुणीही न सांगता लागत असत. आज बाबासाहेब पुरंदरे हयात नाहीत पण त्यांचं स्वप्न साकार होतं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शिवसृष्टीचं राहिलेलं कामही लवकरच पूर्ण होईल असाही विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलं. शिवसृष्टीचं स्वप्न त्यांनी पाहिलं होतं ते आज पूर्ण होतं आहे.

यावेळी बोलताना अमित शाह म्हणाले, शिवसृष्टीचा प्रकल्प ४३८ कोटींचा आहे. याचा पहिला टप्पा सुरू होतो आहे. चार टप्पेही दिलेल्या वेळात पूर्ण होतील याचा मला विश्वास आहे. पहिल्या टप्प्यात शिवकालीन इतिहासातले अनेक प्रसंग आहेत. आग्र्याहून सुटका, शिव राज्याभिषेक यासारखे अनेक प्रसंग या ठिकाणी आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचं सगळं लिखाण वाचणं शक्य नाही. पण इथे जी व्यक्ती येईल त्या व्यक्तीला शिवाजी महाराज कळतील याविषयी माझ्या मनात शंका नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास त्यांचे विचार हे लोकांना समजणं खूप आवश्यक आहे. तेच काम या माध्यमातून होईल असा मला विश्वास वाटतो आहे.

थ्रीडी आणि फोरडी तंत्रज्ञान वापरून आणि इतिहास जिवंत करण्याचा उत्तम प्रयत्न या ठिकाणी झाला आहे. जगभरातल्या इतिहासप्रेमींसाठी, शिवप्रेमींसाठी हे ठिकाण महत्त्वाचं असणार आहे. फक्त विचार करून बघा छत्रपती शिवाजी महाराज नसते तर काय झालं असतं? जर तर चालत नसतं असेही ते म्हणाले.

Check Also

पंतप्रधान मोदींच्या आमंत्रणावर शरद पवार यांची स्पष्टोक्ती, …राजकिय असोसिएशन कधीही नाही

लोकसभा निवडणूकसाठी आजपर्यंत तीन टप्प्यात मतदान झाले. या तिन्ही टप्प्यातील मतदानाची आकडेवारी पाहिली तर ती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *