नाना पटोले यांची माहिती, राहुल गांधीना धमक्या देणाऱ्या भाजपाच्या विरोधात काँग्रेस रस्त्यावर इजा पोहेचवण्याच्या धमक्या देणा-यांवर कठोर कारवाई करा

गेल्या काही दिवसांपासून भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांचे नेते लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची हत्या करण्याच्या, त्यांना शारीरीक इजा पोहोचवण्याच्या धमक्या देत आहेत. हे अत्यंत गंभीर आहे. या संदर्भात काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधांना पत्र लिहिले आहे. पण अद्याप या धमकीबाजांवर कारवाई करण्यात आली नाही. एकनाथ शिंदेचा गावगुंड आमदार संजय गायकवाडने राहुल गांधीची जीभ कापणा-यास बक्षीस जाहीर केले भाजपाचा खा. अनिल बोंडेने त्यांच्या जीभेला चटके देण्याचे वक्तव्य केले आहे. या गंभीर धमक्या असून सरकारने यांच्यावर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी उद्या गुरुवारी काँग्रेस पक्ष राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना सातत्याने धमक्या देणा-या व बेताल वक्तव्य करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचा खरपूस समाचार घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, राहुल गांधी यांच्यावर बोलण्याची अनिल बोंडेची लायकी नाही, तो काही विद्वान नाही, त्याला मंत्रीपद, खासदारकी कशी मिळाली हे आम्हाला माहित आहे, योग्य वेळ आल्यावर तेही जाहीर करू. अनिल बोंडे जी भाषा बोलले त्याच भाषेत काँग्रेसही उत्तर देऊ शकते पण काँग्रेसची ती संस्कृती नाही. दोन महिन्यानंतर भाजपा युतीचे सरकार जाऊन महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे, त्यावेळी अनिल बोंडे कुठे असेल त्याचा त्यांनी विचार करावा. शिवसेनेचा गावगुंड आमदार संजय गायकवाड, दिल्लीतील भाजपाचा माजी आमदार व नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधील एक मंत्री यांनी केलेली विधाने अत्यंत निषेधार्ह आहेत. नरेंद्र मोदी, अमित शाह यांनी यावर गप्प बसणे याचा अर्थ त्यांचा याला पाठिंबा आहे असे दिसते असा आरोपही यावेळी केला.

नाना पटोले पुढे बोलताना म्हणाले की, राहुल गांधी यांच्या आजी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, वडील राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली. हे सर्वांना माहित आहे. त्याच इराद्याने आता राहुल गांधींना धमक्या दिल्या जात आहेत का? असा सवाल उपस्थित करून काँग्रेस कार्यकर्ते खासदार राहुल गांधी यांच्या केसालाही धक्का लावू देणार नाहीत असा निर्धारही यावेळी व्यक्त केला.

शेवटी बोलताना नाना पटोले म्हणाले की, राहुल गांधी यांच्याबद्दल भाजपाचे नेते जी भाषा वापरत आहेत, धमक्या देत आहेत त्यावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप आहे. या धमकीवीरांवर गुन्हे दाखल करुन अटक करण्याची मागणी केली आहे, पण महाभ्रष्ट युती सरकार कारवाई करत नाही. त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते उद्या गुरुवारी राज्यभर रस्त्यावर उतरून राहुल गांधींना धमक्या देणा-या भाजपाच्या तालिबानी वृत्तीविरोधात तीव्र आंदोलन करणार असल्याचेही यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, मनसेसोबतच्या युतीसंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा नाही नगरपालिका निवडणुकांसाठी काँग्रेसकडे ३५ हजार इच्छुक उमेदवारांचे अर्ज; १२ तारखेच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत निर्णय

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर युती वा आघाडीसंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *