Breaking News

सुप्रिया सुळे म्हणाल्या, प्रशासन नेमकं कोण चालविते ते देवालाच ज्ञात ओरबाडून सत्तेवर आलेलं सरकार

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार येवून जवळपास तीन महिने झाले. मात्र या सरकारच्या कारभारावरून सातत्याने विरोधकांकडून टीकेची झोड उठविण्यात येत आहे. विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या सातत्याने कधी राज्य सरकारच्या पालकमंत्री नियुक्तीवरून तर कधी राज्याच्या कारभारावरून शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य करत असतात. सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, राज्याचे प्रशासन कोणं चालविते ते देवालाच ज्ञात असे म्हणत शिंदे-फडणवीस सरकारवर चांगलाच निशाणा साधला.

यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, राज्यातील सरकार ओरबाडून सत्तेवर आले असून प्रचंड टीका झाल्यानंतर पालकमंत्री नियुक्त केले. काही मंत्री अद्याप आपल्या विभागातही गेलेले नाहीत. मंत्रालयात गेले तर मंत्री भेटत नाहीत. प्रशासन नेमकं कोण चालवते हे देवालाच ज्ञात असा खोचक टोला लगावला.

क्रांती अग्रणी जी.डी. बापू लाड जन्मशताब्दी निमित्त निराधार कुटुंबांना मदत आणि आशा सेविकांना सायकल वाटप आणि नाना-नानी पार्कचे उद्घाटन खा.सुळे यांच्या हस्ते कुडल येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानी आ. अरूण लाड होते. यावेळी आ. मानसिंगराव नाईक, आ. सुमनताई पाटील, किरण लाड, शरद लाड आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, महिला जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव आदी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर खा. सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

शत्रुत्वाची भावना निर्माण करणारी नवीन संस्कृती भारतीय जनता लॉन्ड्री पक्षाने सुरू केली आहे. विरोधात बोलला तर तो शत्रू झाला अशा पध्दतीने काही मंडळी वागत आहेत. ही राज्याची संस्कृती नाही. खा. अमोल कोल्हे एका चित्रपटासंबंधी केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांना भेटले. यामध्ये गैर काहीच नाही. मतभेद असले तरी मनभेद असून नयेत ही  महाराष्ट्राची संस्कृती आहे असेही त्या म्हणाल्या.
हे सरकार ओरबाडून आणलेले आहे. यातून चांगले काहीही निष्पन्न झालेले नाही. अनेक नेत्याकडून राज्याच्या संस्कृतीला न शोभणारी वक्तव्ये केली जात आहेत. यामध्ये सामान्य माणूस भरडला जात आहे. अनेक मंत्री अद्याप त्यांच्या विभागातही गेलेले नाहीत. कामासाठी मंत्रालयात गेले तर मंत्रीच भेटत नाहीत अशी स्थिती आहे. या ओरबाडून सत्तेवर आलेल्या सरकारमुळे सामान्य माणूस भरडला जात असल्याचेही त्या म्हणाल्या.

Check Also

मेहबूबा मुफ्ती यांचे निवडणूक आयोगाला पत्रः कार्यकर्त्यांना अटक करण्याचे थांबवा

जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) च्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *