Breaking News

नाना पटोले यांची टीका, शिंदे आणि पवार यांची भाषा म्हणजे मोदी-शाह यांची स्क्रिप्टच गद्दारांना सर्व गद्दारच दिसतात, काँग्रेसमध्ये कोणीही गद्दार नाही

राज्यात फोडाफोडीचे राजकारण सुरु असून त्यामागे भारतीय जनता पक्षच आहे. दिल्लीतून मोदी व शहा जशी स्क्रिप्ट लिहून देतात तीच भाषा बोलली जात आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडल्यावर जी भाषा वापरली तशीच भाषा अजित पवार वापरत आहेत, हा काही योगायोग नाही तर दिल्लीतून मोदी-शहांनी दिलेली स्क्रिप्टच आहे. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधून काही लोक गेले असले तरी काँग्रेस सोडून कोणीही जाणार नाही, काही लोक जाणिवपूर्वक अफवा पसरवत आहेत. गद्दारांना सर्वजण गद्दारच दिसत असतात मात्र काँग्रेसमध्ये कोणी गद्दार नाही, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले.

टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, सत्तेच्या जोरावर भारतीय जनता पक्ष विरोधी पक्ष फोडत आहे. भाजपाला विरोधी पक्षच नको आहेत म्हणून विरोधी पक्षात फुट पाडून विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न सुरु आहे. भाजपाचे हे फोडाफोडीचे राजकारण सर्वसामान्य जनतेला आवडलेले नाही म्हणूनच फुटीर नेत्यांच्या मतदारसंघात त्यांना पाठिंबा मिळत नसल्याचे चित्र आहे. शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांना नेहमीच महत्वाची पदे दिली, संघटनेत महत्वाची जबाबदारी दिली, दहा वर्षे केंद्रीय मंत्रिपद दिले, लोकसभेला पराभव झाल्यानंतर राज्यसभेवर पाठवले तेच पटेल आज शरद पवार यांच्यावर आरोप करत खालच्या पातळीची भाषा वापरत आहेत.

अधिवेशनात शेतकरी, बेरोजगारी, महागाईचे मुद्दे..
अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतकरी संकटात आहे, सरकारने मदत जाहीर केली पण ती मिळालेली नाही. सोयाबीन, कांदा, केळी पिकाला भाव नाही तर कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडूनच आहे. जून महिना संपला तरी अजून पेरण्या झालेल्या नाहीत. या प्रश्नांवर पावसाळी अधिवेशनात चर्चा झाली पाहिजे अशी काँग्रेसची भूमिका आहे. १७ तारखेपासून सुरु होणाऱ्या अधिवेशनात पहिल्या दिवशीच महागाई, बेरोजगारी तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन सरकारला जाब विचारू असे पटोले म्हणाले.

Check Also

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्रासाठी मागितल्या या गोष्टी, पण पंतप्रधान मोदींकडून साधा उल्लेखही नाही

स्वातंत्र्य मिळाल्यावर काँग्रेस विसर्जित करावी असा सल्ला महात्मा गांधींनी दिला होता. त्यानुसार काँग्रेस विसर्जित झाली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *