महाराष्ट्रात पारंपरिक मासेमारी करणाऱ्यांना शासनाच्या जाचक धोरणांमुळे विविध समस्यांना सामारे जावे लागत आहे. मासेमारीमध्ये अनेक ठेकेदार व भांडवलदार शिरल्याने कोळीबांधवांवर अन्याय होत आहे. काँग्रेस पक्षाने सातत्याने या समाज घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. यापुढेही काँग्रेस पक्ष मच्छिमार समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून या समाजाला भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यास कटीबद्ध असून नवी मुंबई विमानतळबाधित मच्छिमारांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार, असे आश्वासन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले.
काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे महाराष्ट्र मच्छिमार काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली त्यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ बोलत होते. हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, आपल्या समस्या सरकारकडे मांडण्यासाठी सर्वप्रथम आपली संघटना बळकट करा, जे प्रश्न आहेत त्यासाठी संघर्ष करावा लागेल त्यासाठी काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी उभा असेल. धरणक्षेत्रातील मासेमारी, तलावातील मासेमारी, नद्यातील मासेमारी संदर्भातील प्रश्न असतील किंवा नवी मुंबई विमानतळामुळे मच्छिमारांवर संकट आले आहे त्यासंदर्भात योग्य ती पावले उचलून सरकारकडे त्यासाठी पाठपुरावा करू. आता करो वा मरो ची परिस्थिती आहे. भाजपा सरकारची मच्छिमारांसंदर्भातील धोरणे मारक आहेत. कोळीबांधवांना न्याय देण्यासाठी काँग्रेस पक्ष म्हणून सर्व ताकद उभी करू, असेही यावेळी सांगितले.
पुढे बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, भाजपा सरकारने मासेमारीला कृषीचा दर्जा दिला असला तरी त्यातून फारकाही फायदा होणार नाही, ही योजनाच फसवी आहे. मच्छिमारांना बोटीसाठी लागणाऱ्या डिझेलवर सलवत मिळावी, भांडवलदार, ठेकेदार यांचा पारंपरिक मासेमारी कारणाऱ्यांना त्रास होत आहे. खर्च व उत्पन्न याचा ताळमेळ लागत नाही. शासनाने नुकताच काढलेला जीआर या कोळी बांधवांसाठी अन्यायकारक आहे तो रद्द व्हावा. प्रकल्पग्रस्तांचा दाखला मिळावा, भाजपा सरकारने बंद केलेल्या सवलती पुन्हा लागू कराव्यात यासह विविध प्रश्न या बैठकीत मांडण्यात आले.
या बैठकीला प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ऍड. गणेश पाटील, फिशरमन काँग्रेसचे अध्यक्ष मार्तंड नाखवा, ऑल इंडिया फिशरमन काँग्रेसचे उपाध्यक्ष रामदास संधे, विभागीय अध्यक्ष प्रकाश नगरे, कोकण विभागीय अध्यक्ष उल्हास वाटकरे, मुख्य संयोजक मिल्टन, प्रदेश काँग्रेसचे यांच्यासह फिशरमन काँग्रेसचे सदस्य उपस्थित होते.
Marathi e-Batmya