Breaking News

अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांनंतर काढले उध्दव ठाकरे, फडणवीसांचे वाभाडे माईक दिसला की काय बोलायचे कळत नाही

मागील काही दिवसांपासून राज्यात विविध पक्षांच्या नेत्यांकडून एकमेकावर टीका करताना भलतेच शब्द वापरण्यात येत आहे. तसेच राज्यात अवकाळी पावसामुळे आणि वाढत्या महागाई, बेरोजगारी आदी प्रश्नी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारकडून कोणतेही निश्चित धोरण जाहिर करण्यात आलेले नसताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वैयक्तिक राजकिय श्रध्देच्या प्रश्नावरून अयोध्या दौऱ्यावर गेले. त्यावरून अजित पवार यांनी सकाळी टीका केल्यानंतर दुपारी सातारा येथे झालेल्या कार्यक्रमात बोलताना उध्दव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधत चांगलेच वाभाडे काढल्याचे पाह्यला मिळाले.

काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांच्यावर काही दिवसांपूर्वी शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी हल्ला केला. या प्रकरणामुळे ठाण्यासह महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वत: रोशनी शिंदे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. दरम्यान, हा हल्ला झाल्यानंतर हल्लेखोरांवर पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही, म्हणून उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना “महाराष्ट्राला फडतूस गृहमंत्री लाभलाय” असं वक्तव्य केले. यानंतर देवेंद्र फडणवीसांनी “मै फडतूस नही, काडतूस हू… झुकेगा नही, घुसेगा साला” असं प्रत्युत्तर दिलं.

यावरून “फडतूस आणि काडतूस” शब्दाचा वाद वाढतच गेला. यानंतर आता विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ‘फडतूस आणि काडतूस’ वरील वादावरून उद्धव ठाकरेंसह देवेंद्र फडणवीसांवर नाव न घेता निशाणा साधला.

साताऱ्यातील एका कार्यक्रमात भाषण करताना अजित पवार म्हणाले, काहींना माईक हातात आल्यावर काय बोलावं? तेच कळत नाही. कोण फडतूस म्हणतं, तर कोण काडतूस म्हणतं. कुणी काहीही म्हणतं. अरे आपल्याला यशवंतराव चव्हाणांनी चांगले विचार दिले आहेत. संयुक्त

महाराष्ट्राच्या काळात यशवंतराव चव्हाणांनी सुसंस्कृत महाराष्ट्राची निर्मिती केली. त्या रस्त्याने आपण जायला हवं. वसंतदादा नाईक, शरद पवार यांनी दाखवलेल्या रस्त्याने आपण जायला हवं. तो रस्ता आपल्या भल्याचा आहे. आपल्याला निश्चितपणे दिशा देणारा आहे. त्याचा विचार आपण करायला हवा. या गोष्टी सोडून राज्यात नको त्या गोष्टी सुरू आहेत अशी उपरोधिक टीका केली.

अजित पवारांच्या या विधानानंतर महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे अलीकडेच शरद पवारांनी अदानी प्रकरणावर मतप्रदर्शन केलं होतं. हिंडेनबर्ग कंपनीच्या अहवालात अदानींना लक्ष्य केल्याचं दिसतं, असं विधान केलं होतं. यानंतर आता अजित पवारांनी अप्रत्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावरच निशाणा साधला आहे.

Check Also

मेहबूबा मुफ्ती यांचे निवडणूक आयोगाला पत्रः कार्यकर्त्यांना अटक करण्याचे थांबवा

जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) च्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *