Breaking News

मुंबईतल्या हागणदारीच्या प्रश्नावरून मुख्यमंत्र्यांचा काढता पाय स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा

मुंबई : प्रतिनिधी

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत महाराष्ट्रात स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविण्यात आले. या अभियानातंर्गत राज्यात २२ लाख शौचालये बांधण्यात आल्याचे सांगत महाराष्ट्र हे देशातील हागणदारीमुक्त झाल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. परंतु मुंबईसह महानगर प्रदेशात हागदारीचा प्रश्न गंभीर असल्याबाबतचा मुद्दा पत्रकारांनी उपस्थित करताच मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकार परिषदच आटोपती घेत पत्रकारांच्या प्रश्नांपासून पळ काढला.

मलबार हिल येथील सह्याद्री अतिथिगृहात स्वच्छ भारत अभियानांतर्गत करण्यात आलेल्या कामाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, स्वच्छता व पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह अन्य प्रशासकिय अधिकारी उपस्थित होते.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत राज्यात गेल्या वर्षी १९ लाख शौचालय बांधण्यात आले. तर यंदाच्या वर्षी २२ लाख शौचालय बांधण्यात आले. तसेच आतापर्यंत राज्यात शौचालय बांधण्याचे काम हाती घेऊन 60 लाखापेक्षा अधिक शौचालयाचे बांधकाम केले असून आज महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.

राज्यात सन २०१२ च्या बेसलाईन सर्वेनुसार केवळ ४५ टक्के कुटुंबाकडे शौचालय होती. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत ५५ टक्के कुटुंबांसाठी शौचालय बांधण्याचे आवाहनात्मक काम होते. पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर तसेच ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, विभागाचे अपर मुख्य सचिव शामलाल गोयल यांनी स्वच्छ महाराष्ट्र मिशन अंतर्गत उत्कृष्ट काम केल्याचे सांगत या तिघांचेही त्यांनी कौतुक केले.

विविध तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देश प्रगती करीत असताना ५० टक्के भारतीयांकडे शौचालय सुविधा नसणे ही गंभीर बाब असल्याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान घोषित करुन २०१९ पर्यंत संपूर्ण देश हागणदारीमुक्त करण्याचे जाहीर केले. या अंतर्गत महाराष्ट्रात स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबवून २०१८ मध्येच महाराष्ट्र हागणदारीमुक्त करण्याचे काम केले आहे. महाराष्ट्रात एकुण ६० लाख ४१ हजार १३८ शौचालय बांधण्याचे काम करण्यात आले आहे. यासाठी ४ हजार कोटी पेक्षा अधिक खर्च केंद्र व राज्य शासनाच्या निधीमधून करण्यात आला आहे. विविध जिल्ह्यात उपलब्ध साधनसामुग्रीचा वापर करुन तेथील प्रशासकीय यंत्रणेने शौचालय बांधण्याचे काम केल्याचे त्यांनी सांगितले.

मागील चार वर्षात बांधण्यात  आलेल्या शौचालयाची माहिती त्यांनी दिली. यामध्ये सन २०१३-१७ मध्ये २ लाख २१ हजार ८४९, सन २०१४-१५ मध्ये ४ लाख ८८ हजार ४०२, सन २०१५-१६ मध्ये ८ लाख ८२ हजार ०५३, सन २०१६-१७ मध्ये १९ लाख १६ हजार ४६१ तर सन २०१७-१८ मध्ये २२ लाख ५१ हजार ०८१ तर सार्वजनिक व सामुहिक शौचालय २ लाख ८१ हजार २९२ अशी मिळून वैयक्तिक व सार्वजनिक ६० लाख ४१ हजार १३८ शौचालय बांधण्यात आल्याचे सांगून ते म्हणाले ३५१ तालुके, २७ हजार ६६७  ग्रामपंचायती, ४० हजार ५०० गावे हागणदारीमुक्त होऊन महाराष्ट्र राज्य हागणदारीमुक्त झाल्याचे त्यांनी घोषित केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिल्यानंतर आजही मुंबई शहरात आणि मुंबई महानगर प्रदेशात सर्वसामान्य नागरीकांना शौचालये उपलब्ध नाहीत. त्यामुळे त्यांना रेल्वे ट्रँक आणि आजबाजूच्या परिसरात खुलेपणाने शौच करतात. याबाबतचा मुद्दा पत्रकारांनी उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हा महापालिकांच्या अंतर्गत येणारा प्रश्न आहे. त्यामुळे त्याबाबत मी आताच काही बोलणे उचित होणार नाही. मात्र त्या अनुषंगाने महापालिकांना सूचना करण्यात येतील असे सांगितले.

त्यानंतर पत्रकारांनी याच अनुषंगाने प्रश्न विचारायला सुरुवात करताच मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेच गुंडाळून टाकली.

 

Check Also

केशव उपाध्ये यांचा आरोप, …काँग्रेसच्या षडयंत्रात ‘उबाठा’ ही सहभागी

हिंदु समाजातील उपेक्षित, वंचितांना संविधानाने दिलेले आरक्षण काढून घेऊन मुस्लिमांना बहाल करणे, मुस्लिम समाजातील तिहेरी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *