Breaking News

राज ठाकरे यांच्या पत्रानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही

अंधेरी विधानसभा पोटनिवडणूकीत उध्दव ठाकरे यांच्या गटाने ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहिर करत त्यांचा उमेदवारी अर्जही भरला. त्यापाठोपाठ शिंदे गट-भाजपाच्यावतीने मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज भरला. त्यानंतर या दोघांकडूनही प्रचाराचे रणशिंग फुंकत प्रचाराला सुरुवात केली. यापार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उध्दव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना पाठिंबा जाहिर करत भाजपालाही उमेदवार मागे घेण्याचे आवाहन करत निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ असे स्पष्ट केले.

बीकेसी मैदानावरील एमसीएचआय-क्रेडाई संघटनेच्यावतीने आयोजित प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज सकाळी राज ठाकरे यांची भेट घेऊन भाजपा उमेदवार मुरजी पटेल यांना पाठिंबा देण्याची विनंती केली. त्यानंतर राज ठाकरे यांचे मला पत्र आले.

राज ठाकरे यांनी चांगल्या भावनेने पत्र लिहीले आहे असेही ते म्हणाले.

या अगोदर दिवंगत आर आर पाटील व विधान परिषदेच्या निवडणूकीत अशा भूमिका घेण्यात आल्या होत्या. परंतु आता उमेदवारी अर्ज सादर झाले. प्रचार सुरू झाला. पक्षात मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही. पक्षात बोलावे लागेल, वरिष्ठांसोबत चर्चा करावी लागेल बाळासाहेबांची शिवसेना सोबत असल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही चर्चा करावी लागेल असे सांगत चर्चेनंतर निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

राज ठाकरे काय म्हणाले आपल्या पत्रात:-

राज ठाकरे आपल्या पत्रात लिहितात की, आमदार कै. रमेश लटके यांच्या निधनानंतर आज अंधेरी (पूर्व) ह्या विधानसभेच्या जागेसाठी पोट निवडणूक जाहिर झाली. तिथे त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके ह्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. कै. रमेश लटके हे चांगले कार्यकर्त्ये होते. अगदी शाखाप्रमुख पदापासून त्यांची वाटचाल सुरु झाली. त्यांच्या राजकिय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीनं आमदार होण्यानं कै. रमेश यांच्या आत्म्यास शांती मिळेल.

माझी विनंती आहे की, भारतीय जनता पक्षानं ती निवडणूक लढवू नये आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके आमदार होतील हे पहावं. मी आमच्या पक्षातर्फे अशा परिस्थितीत जेव्हा दिवंगत आमदाराच्या घरच्या व्यक्ती निवडणूक लढवतात तेव्हा शक्यतो निवडणूक न  लढविण्याचं धोरण स्विकारतो. तसं करण्यानं आपण त्या दिवंगत लोकप्रतिनिधीला श्रध्दांजलीच अर्पण करतो अशी माझी भावना आहे. आपणही तसं करावं असं मला माझं मन सांगतं.

Check Also

शिक्षक व पदवीधर मतदार संघाची निवडणूक पुढे ढकलली

शिक्षक आमदारकीची निवडणूक १० जूनला जाहीर झाल्यामुळे लोकसभेची निवडणूक ड्यूटी आटोपून सुट्टीवर जाणाऱ्या शिक्षकांच्या आनंदावर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *