Breaking News

पनवेलकरांवर घोटाळेबाज आयुक्त लादण्याचा प्रयत्न ? आयुक्त डॉ. शिंदे यांच्याऐवजी घरत यांच्या नियुक्तीचा घाट

पनवेल : प्रतिनिधी

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या गाजलेल्या इंजिन घोटाळ्यात संशयाच्या भोवऱ्यात असलेले अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांना पनवेल महापालिकेच्या आयुक्तपदी विराजमान करण्याच्या भाजपाने हालचाली सुरू केल्या आहेत. घरत हे रायगडचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या खास मर्जीतील असल्याने त्यांच्यासाठी भाजपाने पायघड्या घालून चव्हाणांची तळी उचलण्याचा प्रयत्न सुरू ठेवल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. परंतु, घोटाळेबाज आयुक्तांच्या हाती पनवेल मनपा सोपविण्याचे प्रयत्नाविरोधात पनवेलकरांनी भाजपाविरोधी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यास सुरूवात केली आहे.

गर्भश्रीमंत अतिरिक्त आयुक्तः

ठाणे जिल्ह्यातील वाडा येथील संजय घरत हे कल्याण-डोंबिवली येथील अतिशय गर्भश्रीमंत अतिरिक्त आयुक्त आहेत. त्यांच्याविरोधात बेहिशेबी मालमत्ता साठविल्या प्रकरणी चौकशीचा फेरा सुरू आहे. ते रायगडचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या खास मर्जीतील असल्याने कल्याण-डोंबिवलीचे सर्वपक्षिय नगरसेवक त्यांच्यापुढे आदराने झुकताना दिसत आहेत, इतका त्यांचा जबरदस्त दरारा आहे.

गाड्यांचे इंजिन परस्पर विकले?

घरत उपायुक्त असताना कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन खात्याच्या प्रवासी बसेसचे इंजिन परस्पर विकल्याचा घोटाळा उघडकीस आला होता. त्यामध्ये संजय घरत यांच्या दोन अधिकार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे. तर त्यांच्याविरोधी अद्याप चौकशी सुरू आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर घरत यांच्यावर घोटाळेबाज आयुक्त असा शिक्कामोर्तेब झाल्याची माहिती कल्याण-डोंबिवलीतून उपलब्ध होत आहे.

दारू पिवून धिंगाणा

निवडणुकीच्या काळात घरत यांनी चक्क दारू पिवून धिंगाणा घातला होता. त्यावेळी त्यांच्याविरोधात निवडणूक आयोगाने तक्रार केली असल्याची माहितीही उजेडात आली आहे. त्यामुळे चारित्र्यावर बरेच डाग असलेल्या घरतांना केवळ पालकमंत्र्यांची मर्जी सांभाळण्यासाठी पनवेलला आणून पारदर्शक कारभार करणार्‍या महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांचा बळी देण्याचा विचार भाजपाने सुरू केल्याने पनवेल महापालिका क्षेत्रात भाजपाविरोधी संतापाची लाट उसळली आहे.

तीन आयुक्तांचे चौकशीचे आदेश

घरत यांच्या हेकेखोर आणि गैरकारभाराविरोधात कल्याण-डोंबिवलीचे तत्कालीन आयुक्त आर्दंड, सोनावणे आणि सी. रविंद्र यांनी विभागीय चौकशी लावली आहे. शासन दरबारी घरत यांच्यावर अनेक आरोप असताना त्यांना नवे पालकमंत्री रविंद्र चव्हाण पनवेल भाजपा नेत्यांच्या नथीतून तीर मारत महापालिका आयुक्तपदी बसविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मस्का लावत आहेत. भाजप नेत्यांनांही पालकमंत्र्यांची मर्जी राखता यावी आणि त्यांच्या शिफारसीवर काही तरी पदरात पाडून घेता यावे, याकरीता घोटाळेबाज आयुक्त पनवेलकरांच्या माथी लादण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे समजते.

Check Also

मुंबई उच्च न्यायालयाचे संभाजीनगर आणि धाराशिव नामांतरावर शिक्कामोर्तब

मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी महाराष्ट्र सरकारच्या औरंगाबाद शहर आणि महसूल क्षेत्राचे अधिकृतपणे छत्रपती संभाजीनगर आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *