Breaking News

गरीबांसाठी घराची अर्थसंकल्पात घोषणा, तर मुंबईतल्या गरीबांचे मंत्रालयात आंदोलन ओंकार बिल्डर्स विरोधातील आंदोलनानंतर नागरीकांना पोलिसांकडून अटक

मुंबईः प्रतिनिधी

एकीकडे केंद्रीय अर्थसंकल्पात देशातील गरिबांना २०२२ पर्यंत सर्वाना घरे देण्याचे आश्वासन देवून केंद्र सरकारला २४ तासांचा अवधी होत नाही. तोच मालाड येथील नियोजित एसआरए प्रकल्पातील घरे मिळावीत यासाठी ओकांर बिल्डर्सच्या विरोधात शेकडो झोपडीवासीयांनी मंत्रालयात घुसून ठिय्या आंदोलन केले.

मालाड पूर्व येथील कुरार इथल्या शांताराम तलाव येथील जानू भोईर गृहनिर्माण संस्थेच्या शेकडो रहिवाश्याना ओंकार बिल्डर्स या प्रसिद्ध विकासकाने अपात्र घोषित केले. त्यामुळे आम्हाला हक्काची घरे मिळवित या मागणीसाठी रहिवाशांनी थेट मंत्रालयात घुसून त्रिमूर्ती प्रांगणात आंदोलन केले. यावेळी आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाची गृहनिर्माण सचिव संजीवकुमार यांच्यासोबत चर्चा सुरु असतानाच प्रांगणात बसलेल्या रहिवाशांना पोलिसांनी उचलून मरिन लाईन्स पोलीस ठाण्यात नेले.

गेल्या चार वर्षांपासून शांताराम तलाव येथे इमारतींचे बांधकाम सुरु आहे. एकूण सहा इमारतींपैकी तीन इमारतींचे काम पूर्ण झाले असूनही विकासकाने शेकडो लोकांना अपात्र घोषित केले आहे. यावर नगरविकास विभाग आणि एसआरए कार्यालयात खेटे मारूनही याबाबत योग्य दाखले मिळत नसल्याने थेट मंत्रालयातच आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असल्याचे स्थानिक रहिवासी बच्चूलाल चव्हाण यांनी सांगितले. २००७ साली ओंकार बिल्डरने आपल्याशी करार केला असून २०११ पासून आमची घरे तोडण्यास सुरूवात केल्याचे त्याने सांगितले. 

मंत्रालयात प्रवेश पत्र काढून शेकडोंच्या संख्येने दाखल झालेले झोपडीवासी यांनी अचानक मंत्रालयातल्या त्रिमूर्ती प्रांगणात ठिय्या दिल्याने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. मंत्रालय सुरक्षा व्यवस्थेचे प्रमुख प्रशांत खैरे यांनी तात्काळ अतिरिक्त पोलिस बंदोबस्त मंत्रालयात मागवला. दरम्यान पोलीसानी आंदोलकांशी चर्चा करत गृहनिर्माण विभागाच्या सचिवांशी भेट घालून दिली. त्यानंतर सर्व आंदोलकांना ताब्यात घेत मरिन लाईन्स पोलिस ठाण्यात नेण्यात आले.

Check Also

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, हेमंत करकरे यांची हत्या कसाबने नव्हे तर आरएसएसच्या…

२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे (ATS) माजी प्रमुख हेमंत करकरे यांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *