Breaking News

अखेर मुख्यमंत्र्यांनी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूरचा हट्ट पुरविला पनवेल महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांची अखेर बदली

मुंबई : प्रतिनिधी

मुंबई महानगरात नव्याने स्थापन झालेल्या पनवेल महापालिकेच्या आयुक्त पदी मृदू व जलसंधारण मंत्री राम शिंदे यांचे बंधू डॉ.सुधाकर शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र आयुक्त पदी डॉ.शिंदे यांच्या काम करण्याच्या शैलीचा त्रास भाजपच्याच नगरसेवकांना होवू लागला. त्यामुळे त्यांची आयुक्त पदावरून बदली करण्यासाठी महापालिकेतील सत्ताधारी असलेल्या भाजप नगरसेवकांसह येथील आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीमागे लकडा लावला. त्यामुळे अखेर मुख्यमंत्र्यांनी डॉ. शिंदे यांची पनवेलच्या आयुक्त पदावरून थेट महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या मुख्याधिकारी पदी नियुक्ती करत ठाकूर यांचा हट्ट पुरविला.

पनवेल महापालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या निपक्षपाती कारभाराचा फटका भाजपच्या स्थानिक आमदार आणि नगरसेवकांना होवू लागला. त्यामुळे सुरुवातीला या नगरसेवकांचे नेते आमदार प्रशांत ठाकूर यांनी निवदेने देत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे डॉ. शिंदेची बदली करण्यासाठी प्रयत्न करण्यात सुरुवात केली. मात्र शिंदे यांच्या कारभारावर खुष असलेल्या मुख्यमंत्र्यांनी आ.ठाकूर यांच्या निवेदनाला केराची टोपली दाखविली. त्यानंतर आ.ठाकूर यांनी भाजपच्या नगरसेवकांना आणून डॉ. शिंदे यांच्या कारभाराचा भाजपच्याच नगरसेवकांना त्रास कसा होतो याची माहिती देण्यासाठी थेट मंत्रालयात तर कधी विधिमंडळ अधिवेशनात आणून अप्रत्यक्षरित्या दबाव आणण्याचा प्रयत्न सुरु केला.

तरीही मुख्यमंत्री आपल्या मागणीला भीक घालत दिसत नसल्याचे दिसून येत असल्याने अखेर भाजप नगरसेवकांनी आयुक्त डॉ.सुधाकर शिंदे यांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव आणत त्यांना पळवून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र मंत्रालयातील तथा मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत असलेल्या नगरविकास विभागाने हा अविश्वासाचा ठरावच फेटाळून लावला. त्यामुळे डॉ.शिंदे हे आयुक्त पदी कायम राहणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले.

मात्र हा ठराव फेटाळल्यानंतर आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची मिन्नतवारी आणि मनधरणी करत डॉ. शिंदे यांची बदली करण्यास राजी केले. त्यामुळे अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. शिंदे यांच्या बदलीला हिरवा कंदील दाखवित प्रशांत ठाकूर यांचा हट्ट पुरविल्याची चर्चा मंत्रालयात सुरु झाली आहे.

Check Also

भारतीय निवडणूक प्रक्रियेचे चार देशांच्या परदेशी शिष्टमंडळाकडून कौतुक

भारतासारख्या लोकशाही देशात निवडणूक प्रक्रिया ही खूप महत्त्वपूर्ण बाब आहे. येथील मतदारांचा स्वयंप्रेरीत मतदानासाठीचा उत्साह …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *