Breaking News

दिव्यांग दाखले वाटप अद्यादेशास ठामपाकडून दीड वर्षे हरताळ अन्यथा २७ मार्चला आंदोलनाचा संघटनेचा इशारा

ठाणेः प्रतिनिधी
दिव्यांगांना ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयामधून अपंगत्वाचे दाखले दिले जातात. मात्र, सबंध जिल्ह्यातून दिव्यांग येथे येत असल्याने अपुरे मनुष्यबळ आणि यंत्रणेअभावी सिव्हील रुग्णालयामधून दाखले वाटपास विलंब होत आहे. त्यामुळे राज्य शासनाने 17 ऑक्टोबर 2017 रोजी एक अद्यादेश काढून ठामपाच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये दिव्यांग दाखले देण्यात यावे, असे आदेश दिले आहेत. मात्र, या अद्यादेशालाच ठामपाकडून गेली दीड वर्षे हरताळ फासला जात असल्याचे उघडकीस आले आहे.
राज्यातील दिव्यांगांना त्यांचे हक्क-अधिकार प्राप्त व्हावेत, यासाठी आरोग्य खात्याकडून दिव्यांग दाखला देण्यात येत असतो. हा दाखला शासकीय रुग्णालयांमधून देण्याची तजवीज आरोग्य विभागाने केली आहे. ठाणे जिल्ह्याचा विचार केल्यास हे दाखले केवळ विष्ठल सायन्ना जिल्हा शासकीय रुग्णालयामधूनच वितरीत करण्यात येत असतात. सबंध जिल्ह्यात दुसरीकडे हे दाखले देण्यात येत नसल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. शिवाय, येथे वैद्यकीय अधिकार्यांची संख्या कमी असल्याने दाखले देण्यासाठी आणि तपासणीसाठी एकच वार असल्याने दिव्यांगांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. वैद्यकीय अधिकार्यांची संख्या कमी असतानाही सिव्हील रुग्णालय प्रशासनाने हा त्रास सहन केला होता. परिणामी, दाखल्यांसाठी दिव्यांगांना अनेक फेर्‍या माराव्या लागत होत्या. साधारणपणे दोन महिन्यांचा कालावधी या दाखल्यांसाठी लागत होता. आताही दाखल्यासाठी पुढील दोन-तीन महिन्याच्या तारखा दिव्यांगांना दिल्या जातात. परिणामी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील दिव्यांगांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. वास्तविक पाहता सीव्हील हॉस्पीटलमधील यंत्रणा दिव्यांगांना न्याय देण्यासाठी कार्यरत आहे. पण, पालिका प्रशासनाकडून योग्य त्या हालचाली होत नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी अशा तपासण्या करण्यात याव्यात, अशी मागणी बृहन्म्हाराष्ट्र दिव्यांग विकास कामगार संघटना व हमराही एजुकेशन एंड चेरीटेबल ट्रस्टचे मोहम्मद यूसुफ फारुख खान यांनी राज्य दिव्यांग आयुक्तांकडे केली होती. या मागणीच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने शासन निर्णय क्र. अप्रवि -2017/ प्र.क. 106/ आरोग्य-6 दि. 17.10.2017 या अद्यादेशाद्वारे ठाणे महानगर पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि ओरास रुग्णालय लोकमान्य नगर येथे ही तपासणी करुन दाखले देण्यात यावेत, असे आदेश दिले होते. मात्र, या आदेशाची अद्यापही अंमलबजवाणी केली जात नसल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे निसर्गाने अन्याय केलेल्या दिव्यांगांवर ठामपाही अन्याय करीत असल्याचा आरोप विश्व दिव्यांग अत्याचार विरोधी मंच संचालित बृहन्म्हाराष्ट्र दिव्यांग विकास कामगार संघटना व हमराही एजुकेशन एंड चेरीटेबल ट्रस्टचे मोहम्मद यूसुफ फारुख खान यांनी केला आहे.
या संदर्भात युसूफ खान यांनी दिव्यांग आयुक्त, ठाणे जिल्हाधिकारी व आयुक्त ठाणे महापालिका यांना निवेदन दिले असून ही कलवा येथील छत्रपती शिवाजी महाराज व ओरस लोकमान्य नगर रुग्णालयामध्ये दाखले वाटप सुरु न केल्यास येत्या 27 मार्च रोजी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

Check Also

भारतीय निवडणूक प्रक्रियेचे चार देशांच्या परदेशी शिष्टमंडळाकडून कौतुक

भारतासारख्या लोकशाही देशात निवडणूक प्रक्रिया ही खूप महत्त्वपूर्ण बाब आहे. येथील मतदारांचा स्वयंप्रेरीत मतदानासाठीचा उत्साह …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *