जागतिक स्तरावर मनोरंजनक्षेत्रात ‘एआय’चा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. येत्या काळात नवी मुंबई येथे ‘एआय’ तंत्रज्ञानची शिक्षणनगरी उभारण्यात येणार आहे. त्यामुळे आता ‘एआय’ आणि मनोरंजन क्षेत्राचे जागतिक नेतृत्व करण्याची संधी भारताला मिळणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
वेव्हज परिषदेदरम्यान महाराष्ट्र पॅव्हेलियन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, वेव्हज परिषदेसारख्या एका व्यासपीठाची जागतिक पातळीवर गरज होती. ही गरज ओळखून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पहिल्या वेव्हज परिषदेचे आयोजन केले आणि त्याचे यजमानपद महाराष्ट्राकडे दिले राज्यासाठी ही एक मोठी संधी आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, वेव्हज परिषदेच्या निमित्ताने महाराष्ट्र सरकारने काही अत्यंत महत्त्वाचे सामंजस्य करार (MoUs) केलेले आहेत. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा, एनएसईने (NSE) वेव्हज निर्देशांक सुरू केलेला आहे. ४३ कंपन्या, या दृकश्राव्य क्षेत्रातल्या आहेत, या कंपन्यांचा निर्देशांक सुरू झालेला आहे. त्यामुळे या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करत आणि एकूणच फायनान्शियल इकोसिस्टीम तयार करण्याकरिता हे अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचललेले आहे. हा वेव्हज इंडेक्स म्हणजे वेव्हजच्या यशामधला एक मुकुटमणी असल्याचे सांगितले.
ऑस्ट्रेलिया आणि न्यूयॉर्क या दोन जागतिक विद्यापीठांसोबत आज सामंजस्य करार केल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत, परदेशी विद्यापीठांना देशामध्ये त्यांचे केंद्र उघडण्याची परवानगी मिळाली असून नवी मुंबई इथे सिडकोच्या पुढाकाराने एज्युसिटी उभारण्यात येणार आहे. या एज्युसिटीमध्ये जागतिक दर्जाची १० ते १२ विद्यापीठे आपले कॅम्पस सुरू करणार आहेत. त्यातील दोन विद्यापीठांशी सामंजस्य करार करण्यात आला. सुरुवातीला दीड हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. पण भविष्यात ही गुंतवणूक वाढत जाणार आहे. आणखी तीन महत्त्वाच्या विद्यापीठांशी चर्चा सुरू आहे. देशातले जागतिक विद्यापीठ एकत्र असलेले पहिले कॅम्पस नवी मुंबईमध्ये सुरू होत आहे.
यासोबत प्राइम फोकससोबत (Prime Focus) सामंजस्य करार करण्यात आला आहे, ज्याच्यामध्ये प्राइम फोकस एक फिल्मसिटी या ठिकाणी तयार करणार आहे, ज्यामध्ये जवळपास 3 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून किमान १० हजार लोकांना रोजगार मिळेल. ‘एआय’ (AI) पॉवर आणि जगातली उत्तम तंत्रज्ञानही त्या ठिकाणी असणार आहे.
पनवेल येथे चित्रपट सृष्टी उभारण्यासाठी गोदरेज सोबतही दोन हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीबाबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. एकूण ८००० कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
फिल्मसिटी म्हणजे तंत्रज्ञान
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, फिल्मसिटी म्हणजे लोकेशन नाही, आता फिल्मसिटी म्हणजे टेक्नॉलॉजी असल्याचे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, सर्व तंत्रज्ञानाने परिपूर्ण चित्रपट सृष्टी असेल. तेथे चित्रपट निर्मिती क्षेत्रातील सगळ्या गोष्टींसाठी परिसंस्था असतील. आतापर्यंत आपले लोक तिथे वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या विद्यापीठामध्ये प्रवेश घेण्याकरिता प्रयत्न करायचे, मात्र जे लोकं जाऊ शकत नाहीत, त्यांना तेच शिक्षण या ठिकाणी मिळणार आहे. आज वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था जर कुठली असेल, तर ती दृकश्राव्य माध्यमाची अर्थव्यवस्था आहे. सर्वात जास्त रोजगाराची संधी यात असून, या क्षेत्रात भारताला नेतृत्व करण्याची संधी आहे. कारण कंटेंट क्रिएटर्स, कंटेंट वापर, आपल्याकडे सगळ्यात जास्त आहेत. या क्षेत्रात नेतृत्व करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. वेव्हजमुळे, हे शक्य झाले आहे आणि मुंबई, ही दृकश्राव्य माध्यमाची जणू राजधानीच या संमेलनामुळे झालेली असल्याचेही यावेळी सांगितले.
Marathi e-Batmya