Breaking News

मुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन, सर्वसामान्यांसाठी घरे उपलब्ध करण्याचा वेग वाढवणार ‘म्हाडा’ मुंबई मंडळाच्या ४०८२ घरांची लॉटरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोडत

मुंबईसह राज्यातील सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गृहनिर्माण संस्थांची घरे उपलब्ध करण्याकरीता गृह निर्मितीचा वेग वाढविण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे ‘म्हाडा’ मुंबई मंडळाच्या घरांच्या लॉटरीची सोडत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काढण्यात आली. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.

यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, आमदार मंगेश कुडाळकर, गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा उपाध्यक्ष संजय जयस्वाल, समितीचे अध्यक्ष जॉनी जोसेफ उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, स्वतःचे घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. हे स्वप्न साकार करण्यासाठी आता एका घरासाठी ३० अर्ज आहेत. ते प्रमाण एकास ५ पर्यंत आणण्यासाठी ‘म्हाडा’ सारख्या शासनाच्या संस्थांना आवश्यक सहकार्य करण्यात येईल. त्यामुळे लवकरच सर्वसामान्यांचे स्वप्न, हक्काचा निवारा साकार होण्यास मदत होईल.

‘म्हाडा’वरील लोकांचा विश्वास वाढतोय. यामुळेच या सोडतीसाठी १ लाख २० हजार १४४ अर्ज आले.हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. ‘म्हाडा’च्या घरांची लॉटरी पारदर्शकपणे काढण्यात येत आहे. यामध्ये मानवी हस्तक्षेप नाही. पूर्णपणे संगणकीकृत पद्धतीचा वापर केला आहे. ‘म्हाडा’च्या या सोडतीमुळे मुंबईकर पुन्हा मुंबईत येवू शकणार आहेत. मुंबईतील रखडलेल्या प्रकल्पांना चालना देण्यात येणार आहे. त्याकरिता कायद्यात दुरुस्ती करणे आवश्यक असल्यास ते करणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

गिरणी कामगारांना घरांच्या चाव्या देण्यात आल्या. धारावी सारखा प्रकल्प सुरू होत आहे. देशातील सर्वात मोठा ट्रान्स-हार्बर समुद्रावरील रस्ता एक वर्षात सुरू होत आहे. प्रवाशी मुंबईतून २० मिनिटांत रायगड जिल्ह्यात जावू शकणार आहे. कोस्टल रोड, मेट्रो यामुळे मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळाला आहे. ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमामुळे १.५ कोटी नागरिकांना लाभ मिळाला आहे. आरोग्य सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. पंढरपूरचा विकास करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘म्हाडा’ला मोफत जमीन मिळते त्यामुळे म्हाडाच्या घरांच्या किमती खासगी बिल्डरांच्या घरांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. शासनाचेही हेच स्वप्न आहे, की सर्व सामान्यांना कमी किमतीत घरे उपलब्ध व्हावीत यासाठी शासन ‘म्हाडा ’च्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी प्रयत्न करील आणि पुढील सोडतीमधील घरांच्या किमती इतर घरांपेक्षा कमी असतील.

‘म्हाडा’ने अधिकाधिक घरे निर्माण करावीत. मुंबईतील नागरिकांची मागणी वाढली आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात घरे निर्माण करावीत. नवी मुंबईत अनेक सोयी-सुविधा निर्माण झाल्या आहेत.

सर्वसामान्य जनतेला त्यांच्या उमेदीच्या काळात घराचे स्वप्न साकार झाले. तर त्याचा मोठा आनंद संबंधितांच्या परिवारास होतो. त्यामुळे गृहनिर्माण प्रकल्पांचा वेग वाढविण्यासाठी शासन प्रयत्न करणार आहे. म्हाडा पारदर्शकपणे सोडत काढून जनतेचा विश्वास जिंकत आहे. म्हाडा पुनर्विकास करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. नवनवीन योजना राबवीत असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

गृहनिर्माण मंत्री सावे म्हणाले की, घरांची मागणी वाढत आहे. लवकरच पुढील सोडत काढण्यात येणार आहे. या सोडतीमध्ये ज्यांना घराची लॉटरी लागली नाही त्यांना पुढच्या लॉटरीत कागदपत्रांची पडताळणीची आवश्यकता असणार नाही. गृहनिर्माण प्रकल्पांची त्यांनी यावेळी सविस्तर माहिती दिली. यावेळी म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जयस्वाल यांनी प्रास्ताविक केले. अपर मुख्य सचिव वल्सा नायर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

मुंबई ‘म्हाडा’च्या सोडतीविषयी अधिक माहिती

म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे मुंबईतील विविध गृहनिर्माण योजनांतर्गत अंधेरी, जुहू, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली, विक्रोळी, घाटकोपर, पवई, ताडदेव, सायन येथे उभारण्यात आलेल्या ४,०८२ सदनिकांच्या विक्रीकरिता प्राप्त १,२०,२४४ पात्र अर्जाची संगणकीय सोडत आज यशवंतराव चव्हाण सेंटर येथे काढण्यात आली..

सोडतीमधील विजेत्या अर्जदारांची यादी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर सायंकाळी ६.०० वाजता प्रसिद्ध केली जाणार असून विजेत्या अर्जदारांना एसएमएसद्वारेही विजेता ठरल्याबाबतची माहिती तत्काळ कळविली जाणार आहे.

ही सोडत नवीन संगणकीय प्रणाली IHLMS 2.0 (Integrated Housing Lottery Management System) द्वारे होत आहे. या नूतन प्रणालीनुसार अर्ज नोंदणीकरण व पात्रता निश्चिती झाल्यानंतरच अर्जदार सोडत प्रक्रियेत सहभाग घेत आहे. सोडतीत विजेता ठरल्यानंतर, अर्जदारास सूचना पत्र पाठविले जाणार असून त्यातील तरतुदींची पूर्तता केल्यानंतर विजेत्या अर्जदारांना तात्पुरते देकार पत्र पाठविले जाणार आहे. ही सर्व प्रक्रिया सोपी व सुलभ ठरल्यामुळे यंदाच्या वर्षी नागरिकांनी सोडतीस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

सोडतीत जाहीर ४०८२ सदनिकांमध्ये प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत १९४७ सदनिकांचा समावेश आहे. प्रधानमंत्री आवास योजना प्रकल्पातील घरे पहाडी गोरेगाव येथे असून या घरांकरिता २२,४७२ अर्ज प्राप्त झाले आहेत. तसेच उत्पन्न गटनिहाय अत्यल्प उत्पन्न गटातील ८४३ सदनिकांसाठी २८,८६२ अर्ज प्राप्त झाले आहेत आणि या उत्पन्न गटातील सर्वाधिक अर्ज कन्नमवारनगर विक्रोळी (४१५) या योजनेकरिता प्राप्त झाले आहेत. तसेच अल्प उत्पन्न गटातील १०३४ सदनिकांसाठी ६०,५२२ अर्ज प्राप्त झाले असून सर्वाधिक अर्ज पहाडी गोरेगांव (४१६) या योजनेकरिता आहेत तर मध्यम उत्पन्न गटातील १३८ सदनिकांसाठी ८३९५ अर्ज प्राप्त झाले असून सर्वाधिक अर्ज उन्नतनगर गोरेगांव येथील गृहनिर्माण योजनेकरिता आले आहेत. उच्च उत्पन्न गटातील १२० सदनिकांसाठी २०६८ अर्ज प्राप्त झाले असून सर्वाधिक अर्ज शिंपोली कांदिवली पश्चिम येथील गृहनिर्माण योजनेकरिता आहेत.

Check Also

मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघात शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६- मुंबई उत्तर, २७- मुंबई उत्तर पश्चिम, २८- मुंबई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *