Breaking News

उद्धव ठाकरे यांचे टीकास्त्र; कमरेचा, गळ्याचा पट्टा….हे लोक म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक लोकांच्या दारी जाण्यापेक्षा घरी जा

‘भाजपावाले आणि मिंधे माझ्या ऑपरेशनवरून चेष्टा करतात. कमरेचा, गळ्याचा पट्टा सुटला म्हणतात. इतक्या खालच्या पातळीवर जाता. मी जे भोगलंय ते त्यांना भोगावं लागू नये ही माझी प्रार्थना आहे. कोणाच्या तब्येतीवरून, कोणाच्या कुटुंबावर बोलता. यामुळे माझे म्हणणं आहे की हे लोक म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीला लागलेला कलंकच असल्याचा पुर्नरूच्चार करत शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपावर घणाघाती टीका केली.

दोन दिवसीय विदर्भाच्या दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांवर टीका केली होती. तसेच गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांनी आज मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्या भेटीमध्ये उभय नेत्यांमध्ये विविध मुद्यांवर चर्चा झाली. मातोश्री येथे आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे बोलत होते.

सध्याच्या शिंदे-फडणवीस सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमावरून उद्धव ठाकरे म्हणाले, ‘मिंधे सरकार लोकांच्या दारोदारी जातेय पण दारातून परत येतेय. अरे लोकांच्या घरातही जा. त्यांची काय अवस्था आहे पहा. सरकारी योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचतोय की नाही ते पहा’ असा खोचक टोलाही लगावत म्हणाले, मिंधे सरकारच्या या निष्क्रियतेमुळेच आपण शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना घरोघरी जाऊन सरकारी योजनांचा पाठपुरावा करण्यासाठी ‘होऊन जाऊ दे चर्चा’ हा कार्यक्रम हाती घेण्यास सांगितल्याचे म्हणाले.

गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांची उद्धव ठाकरे यांनी यावेळी एक आठवण माध्यमांना सांगितली. ते म्हणाले की, ‘शंकरसिंह वाघेला हे भाजपामध्ये होते. त्यांचे भाजपाशी बिनसले तेव्हा मिडियाने ते हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भेटण्यासाठी मातोश्रीवर निघाले असल्याच्या बातम्या दिल्या होत्या. त्या पाहून भाजपा नेते प्रमोद महाजन मातोश्रीवर पोहोचले होते. वाघेला यांना भेट देऊ नका असे त्यांनी बाळासाहेबांना सांगितले. त्यावर बाळासाहेबांनी युतीचा धर्म काय आहे, आम्ही काय करायचे हे तुम्ही सांगायची गरज नाही, असे महाजन यांना स्पष्ट सांगितले होते. तुमचे बिनसले असले तरी मी वाघेला यांना माझ्याकडे घेणार नाही, असेही ते म्हणाले होते. हा खरा युतीचा धर्म. त्यानंतर वाघेला हे आज मातोश्रीवर आले होते असे स्पष्ट केले.

यावेळी ईडीच्या कारवायांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, अफजलखानाच्या खलित्यात म्हटल होत की आम्हाला येऊन सामील व्हा, धर्मांतर करा नाहीतर कुटुंबकबिल्यासह मारले जाल. आता भाजपावाले ईडी, इन्कम टॅक्सला घराघरात घुसवत आहेत. कुटुंबासह आमच्यात सामील व्हा नाहीतर कुटुंबासह कापून टाकू असाच त्याचा अर्थ होतो ना? ईडी, सीबीआयच्या धाडी घालता तेव्हा ते कुटुंब कलंकित होत नाही का? त्याची नुसती जाणीव करून दिली तर तुमच्या तळपायाची आग मस्तकात का जाते? असा खडा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला. ‘पक्षांतर करा नाहीतर आत जाल’ ही अफझलखानी वृत्ती महाराष्ट्राला आणि देशाला कलंकासारखी लावू नका, असा इशाराही भाजपाला दिला.

देवेंद्र फडणवीस हे कलंक आहेत असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी नागपूर येथील सभेमध्ये केले होते. ते भाजपा नेत्यांना इतके झोंबलेय की त्यांचा जळफळाट सुरू झाला आहे. भाजपा नेत्यांकडून सातत्याने त्यावरून टीका केली जात आहे. त्या टीकेचा चांगलाच समाचार आज उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये घेतला. ‘अजित पवार यांच्यावर आरोप केलात, चक्की पिसिंग…चक्की पिसिंग असे म्हणालात तो कलंक नव्हता का? जे आरोप असतील त्या आरोपांना जागा, आरोप करताना जबाबदारीने वागा. आरोप केल्यानंतर घाबरवून टाकले आणि पक्षात घेतले, त्यानंतर चौकशी बंद केली. मग यापूर्वी ज्यांना घाबरवून पक्षात घेतलात त्यांच्या चौकशीचे काय झाले? नाहीतर जाहीर तरी करा की शिक्षा होणार’ असे उद्धव ठाकरे म्हणाले. भाजपाने ज्यांच्यावर कलंक लावला होता आज त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसले आहेत, असा आरोपही केला.

लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार दिला जाणार आहे. त्या कार्यक्रमाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘आता सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? हा प्रश्न कोणाला विचारायचा आणि उत्तर कोण देणार? ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला तोच पक्ष भाजपसोबत आला. पुरस्कारावेळी आमच्यातील मिंधेही उपस्थित असणार. मग कोण कोणाला कलंक लावतोय?’ असा सवालही उद्धव ठाकरे यांनी भाजपाला केला.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘विदर्भ दौऱ्यामध्ये आपण कार्यकर्ते आणि नागरिकांशी संवाद साधला. सध्या सुरू असलेल्या राजकारणाचा त्यांना उबग आला आहे. ठिकठिकाणी लोकांनी आपले स्वागत केले. सरकारबद्दल असंतोष व्यक्त केला. आम्ही फक्त निवडणुकीची वाट पाहतोय अशा लोकांच्या भावना आहेत.”मत कोणालाही द्या सरकार माझेच होणार’ हा भाजपाचा पायंडा महाराष्ट्राला आणि देशाला घातक ठरणार आहे, असे सांगतानाच, जनतेचा लोकशाहीवरील विश्वास उडाला तर जनता रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही दिला. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नव्या नऊ मंत्र्यांमुळे शिंदे गटाच्या नाकी नऊ आले असल्याचा खोचक टोला, उद्धव ठाकरे यांनी यावेळी लगावला. राष्ट्रवादीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्यांना आता मिरचीदेखील गोड लागत असल्याचे ते म्हणाले.

Check Also

चला.. लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊ या, मतदानासाठी या आहेत सुविधा ….

लोकसभा निवडणूक २०२४ साठी पाचव्या टप्प्यात २० मे रोजी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघात मतदान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *