Breaking News

चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार…तर ईट का जबाब पत्थर से! भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या स्तरावर जाऊन टीका केल्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना ‘ईट का जबाव पत्थर से’ देणार असल्याचा इशारा दिला आहे.
मंगळवारी त्यांनी नागपुरात पत्रकार परिषदेतून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, “उद्धव ठाकरे तुमचे संतुलन बिघडले असेल, तर मनोरुग्णालयात जा. नागपुरात मनोरुग्णालय आहे. तिथे जाऊन उपचार घ्या. तुम्ही बावचळले असाल तर डॉक्टर बदला. परंतु, यापुढे जर आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोललात तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही. आत्ता रस्त्यावर आंदोलन केलेय, पुढचे आंदोलनात आमचे लोक तुमच्या गाड्या अडवल्याशिवाय राहणार नाहीत. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला तुम्ही जबाबदार असाल, अशा शब्दात त्यांना स्पष्ट इशारा दिला.

• देवेंद्र फडणवीस हे कर्तृत्वाचे धनी आहेत. तर, उद्धव ठाकरे हा कलंकित करंटा आहे, असे सांगून बावनकुळे म्हणाले,”यापुढे तुम्ही पुन्हा असे काही बोललात तर नागपूरची जनता तुम्हाला जोड्याने बदडेल.’
पत्रकार परिषदेला नागपूर भाजपा शहराध्यक्ष आ. प्रवीण दटके, आ. कृष्णा खोपडे, नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये, प्रदेश प्रवक्ता धर्मपाल मेश्राम, माजी आमदार मिलिंद माने, माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी, अजय बोढारे, सुनील कोढे, जयप्रकाश गुप्ता, विष्णू चांगदे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

• हे देवेंद्रजींचे कर्तृत्व!
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी डेटा तयार केला. हायकोर्ट, सुप्रीम कोर्टापर्यंत आरक्षण टिकविले व परत मिळवून दिले. देशातील सर्वात मोठे मेट्रोचे नेटवर्क देवेंद्र फडणवीस यांनी उभारले . महाराष्ट्रातील जनतेला दुष्काळमुक्त करण्यासाठी जलयुक्त शिवारसारखी योजना सुरु केली. राज्यात लोड शेडिंग कमी करण्यासाठी योजना राबविली. एक रुपयांत पीक विमा योजना आणली. महत्वाकांक्षी समृद्धी महामार्ग तयार केला. ही देवेंद्र फडणवीस यांची दूरदृष्टी आहे

• उद्धव ठाकरे म्हणजेच कलंक
उद्धव ठाकरेंची सुरुवात माझे वडील, त्यापुढे माझा कॅमेरा, माझी पत्नी. वयाच्या ६० व्या वर्षी मी, माझा मुलगा, मंत्री, माझी पत्नी आणि मुख्यमंत्री असा असून तेच ‘कलंक’ आहेत, असे सांगून श्री. बावनकुळे म्हणाले की, ठाकरेनी मराठा समाजाचे, ओबीसींचे आरक्षण घालविले. स्वत:च्या अहंकारासाठी जलयुक्त शिवार योजना बंद पाडली. कमिशन मिळत नसल्याने मेट्रो प्रकल्पाची कामे बंद पाडली. कोरोनाच्या काळात महाराष्ट्राला अंधारात लोटले.. बरेच कलंकित कामे केली.

• अभिमानाने महाराष्ट्राचे नाव उंचाविले
संभाजीनगर, धाराशीव, अहिल्यादेवीनगर अशी नावे देऊन अभिमानाने महाराष्ट्राचे नाव उंचविणारे देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदे आणि त्याचवेळी संभाजीनगरला संभाजीनगर म्हणणार नाही अशांची साथ देणारे कलंकित व्यक्ती म्हणजे उद्धव ठाकरे. स्वातंत्र्यवीर सावरकारांचा अपमान कॉंग्रेस करीत असताना त्यांचा विचार, संस्कार, संस्कृती जपली पाहिजे व पुढच्या पिढीने त्यांचे विचार आत्मसात केले पाहिजेत यासाठी रात्रंदिवस काम करणारे व्यक्ती देवेंद्र फडणवीस असून, स्वातंत्र्यवीरांचा अपमान करणाऱ्यांची साथ देणारे उद्धव ठाकरे कलंकित करंटे आहेत. नक्षलवादी, जिहादी आणि औरंग्यांच्या प्रेमी पडलेल्या लोकांना तरुंगात टाकणारा व्यक्ती देवेंद्र फडणवीस आहे. जिहाद्यांना नक्षलवाद्यांच्या मुव्हमेंटला संरक्षण देणारा त्याच्यावर कुठलीही कारवाई न करणारा कलंकित व्यक्ती उद्धव ठाकरे आहेत.

यावेळी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या बळावर नगरसेवक ते मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राच्या राजकारणात उच्चपदापर्यंत यशस्वी प्रवास केला. तर उद्धव ठाकरे यांनी स्वत:च्या नेतृत्वाला कर्तृत्व समजून जनतेशी बेईमानी करुन मुख्यमंत्रीपदापर्यंतचा अयशस्वी प्रवास केला असा उपरोधिक टोलाही लगावला.

Check Also

माढा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक आता एकांगी की चुरसीची ?

लोकसभा निवडणूकांची रणधुमाळी सुरु झालेली असतानाच काही लोकसभा मतदारसंघातील लढती या फारच रंजक होणार असल्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *