Breaking News

गुंतवणूकदारांची गोल्ड ईटीएफमध्ये या वर्षी ३५१५ कोटींची गुंतवणूक आतापर्यंतची सर्वाधिक गुंतवणूक

मुंबईः प्रतिनिधी
सोन्याच्या किमतीत घसरण झाल्याने सोन्यातील गुंतवणूक वाढू लागली आहे. सप्टेंबर महिन्यात, गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड्स (गोल्ड ईटीएफ) मध्ये ४४६ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (अॅम्फी) च्या आकडेवारीनुसार, २०२१ च्या पहिल्या ९ महिन्यांत गोल्ड ईटीएफमध्ये एकूण ३,५१५ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.
असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाच्या मते, ईटीएफ श्रेणीतील फोलिओची संख्या देखील वाढली आहे. सप्टेंबरमध्ये फोलिओची संख्या वाढून २४.६ लाख झाली. मागील महिन्यात ही संख्या २१.४६ लाख होती. या वर्षी आतापर्यंत फोलिओची संख्या ५६ टक्के वाढली आहे. यामुळे ऑगस्टमध्ये गोल्ड ईटीएफमध्ये २४ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. यापूर्वी जुलै महिन्यात गुंतवणूकदारांनी गोल्ड ईटीएफमधून ६१ कोटी रुपयांहून अधिक रक्कम काढली होती. मात्र जूनमध्ये ईटीएफमध्ये ३६० कोटी आणि मेमध्ये २८८ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली.
कोरोनापूर्वी गोल्ड ईटीएफमधून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक काढून घेण्यात आली होती. मात्र कोरोनामध्ये म्हणजे २०२० मध्ये गोल्ड ईटीएफ योजनांमधील गुंतवणूक चारपटीने वाढली. २०२०-२१ या आर्थिक वर्षात गोल्ड ईटीएफ योजनांमध्ये ६९०० कोटींची गुंतवणूक झाली आहे.
केडिया कमोडिटीचे संचालक अजय केडिया सांगतात की, सध्या सोने ४८ हजारांवर आहे. वाढत्या महागाईमुळे आणि सणासुदीच्या काळात सोन्याला आगामी काळात आधार मिळेल. यामुळे दिवाळीपर्यंत सोने पुन्हा ५० हजारांपर्यंत जाऊ शकते.
गोल्ड ईटीएफ म्हणजे काय?
हा ओपन एन्डेड म्युच्युअल फंड आहे, जो सोन्याच्या चढउतारांच्या किमतींवर आधारित आहे. एक गोल्ड ईटीएफ युनिट म्हणजे १ ग्रॅम सोने. तेही पूर्णपणे शुद्ध. हे सोन्यात गुंतवणूक करण्याबरोबरच स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याची लवचिकता देते. BSE आणि NSE वर स्टॉकप्रमाणेच गोल्ड ETF खरेदी आणि विक्री करता येते. मात्र, यात तुम्हाला सोने मिळत नाही. जेव्हा तुम्हाला त्यातून बाहेर पडायचे असेल, तेव्हा तुम्हाला त्या वेळी सोन्याच्या किंमतीइतके पैसे मिळतील.
गुंतवणूक कशी करू शकता?
गोल्ड ईटीएफ खरेदी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या ब्रोकरद्वारे डिमॅट खाते उघडणे आवश्यक आहे. यामध्ये तुम्ही NSE वर उपलब्ध गोल्ड ETF ची युनिट्स खरेदी करू शकता. खरेदी केल्यानंतर तुमच्या डीमॅट खात्याशी जोडलेल्या बँक खात्यातून रक्कम कापली जाईल. तुमच्या डीमॅट खात्यात ऑर्डर दिल्यानंतर दोन दिवसांनी गोल्ड ईटीएफ तुमच्या खात्यात जमा होतात. गोल्ड ईटीएफ ट्रेडिंग खात्याद्वारेच विकले जातात.

Check Also

साबण, डिटर्जंटच्या किंमती वाढल्या हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (HUL) आणि ITC लिमिटेडने वाढविल्या किंमती

मुंबईः प्रतिनिधी ग्राहकोपयोगी वस्तू बनवणाऱ्या हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (HUL) आणि ITC लिमिटेड यांनी त्यांच्या निवडक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *