Breaking News

राजीव गांधी जीवनदायी योजनेचा लाभ फक्त अर्धा टक्के लोकांना प्रभावी अंमलबजावणी न झाल्याचा कॅगचा ठपका

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील सर्वसामान्य गरीब आणि शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा प्रत्यक्ष लाभ आता पर्यंत फक्त अर्धा टक्के नागरीकांना मिळाला आहे. तसेच या योजनेचा फायदा सर्वसामान्य नागरीकांऐवजी खाजगी कंपनी आणि विमा कंपन्यांना झाल्याचा ठपका ठेवत या योजनेच्या अंमलबजावणीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी आणि व्यापक प्रसिद्धी करण्याच्या अनुषंगाने राज्य सरकारने आपल्या कार्यपध्दतीत बदल करावा अशी सक्त ताकीद कँगने दिली.

या योजनेसाठी नोव्हेंबर २०१६पर्यंत या योजनेच्या ९ कोटी ३५ लाख लाभार्थ्यांच्या विमा हप्त्यापोटी आरोग्य विभागाने ३ हजार ९ कोटी रुपये विमा कंपनीला अदा केले. त्या तुलनेत फक्त ११ कोटी ८९ लाख रुपयांचे दावे विमा कंपनीने मंजूर करत एकूण रकमेच्या प्रमाणात फक्त अर्धा टक्का नागरीकांनाच याचा लाभ दिल्याचे बाब कँगने उघडकीस आणली.

राज्यातील गरीब जनतेला मोफत आरोग्य व्यवस्था देण्यासाठी मोठा गाजावाजा करत सुरू केलेली राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना पुरती फसल्याचा ठपका ही ठेवला आहे. योजनेच्या व्यापक प्रसिद्धीचा अभाव, आरोग्य शिबिरे घेण्यातील कमतरता आणि आरोग्य केंद्रात आरोग्य मित्रांची नियुक्ती न करणे या कारणास्तव अपेक्षित हेतु साध्य होऊ शकला नाही. योजना लागू झाल्यापासून म्हणजे मे २०११ ते नोव्हेंबर २०१६ या कालावधीत विमा कंपनीला विमा हप्त्यापोटी ३ हजार ९ कोटी रुपये शासनाने भरले. मात्र त्या तुलनेत फक्त ०.४ टक्के म्हणजे फक्त ११ कोटी ८९ लाख रुपयांचे दावे विमा कंपनीकडून मंजूर झालेत. याच्या कारणाचा शोध घेतला असता आरोग्य विभागाने शिधापत्रिका धारकांची नावे आणि शिधापत्रिका क्रमांक यांची पडताळणी न करता सरसकट शिधापत्रिका धारकांची आकडेवारी ग्राह्य धरली. तसेच आरोग्य कार्डांचे वितरण लाभार्थ्यांना झाले नसल्याची बाबही कॅगने नमूद केली आहे. या शिवाय आत्महत्याप्रवण १४ जिल्ह्यांतील फक्त पांढरे शिधापत्रिकाधारक शेतकरी या योजनेच्या लाभासाठी पात्र असताना सर्वच या जिल्ह्यातील सर्वच पांढऱ्या श्वेतपत्रिकाधारकांचा विमा हप्ता भरल्याने अतिरिक्त पैसे विमा कंपनीला मिळाल्याची बाबही कॅगने अधोरेखित केली आहे. या सर्व गोंधळामुळे अनेक लाभार्थ्यांना योजनेचा लाभच न मिळाल्याने योजनेची रुपरेषा बदलण्याची शिफारस कॅगने केली आहे.

Check Also

महाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये होणार ‘नऊ’ ईएसआयसी रुग्णालयांची उभारणी

कर्मचारी राज्य विमा योजनेतंर्गत महाराष्ट्र, मध्यप्रदेश व उत्तराखंड राज्यांमध्ये नऊ ‘ईएसआयसी’ रुग्णालयांची उभारणी केली जाणार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *