मुंबई : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खास उद्योजकांच्या यादीत असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडसह अन्य दोन कंपन्यांना आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांना भांडवली बाजार नियामक अर्थात ‘सेबी’ने एकूण ७० कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. सेबीने नोव्हेंबर २००७ मध्ये रिलायन्स पेट्रोलियम लिमिटेडमध्ये (आरपीएल) आढळलेल्या शेअर घोटाळा प्रकरणी ही कारवाई केली.
सेबीने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडला २५ कोटी, कंपनीचे चेअरमन मुकेश अंबानी यांना १५ कोटी रुपयांचा दंड ठोठावलाय. याशिवाय नवी मुंबई एसईझेड प्रायव्हेट लिमिटेडला २० कोटी आणि मुंबई एसईझेड लिमिटेडला १० कोटी रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. नोव्हेंबर २००७ साली करण्यात आलेल्या शेअर्सच्या खरेदी-विक्री प्रकरणी सेबीने ही कारवाई केली.
मार्च २००७ मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजने आरपीएलचे ४.१ टक्के शेअर्स विकण्याचा निर्णय घेतला होता. पण नंतर आरपीएलचे आरआयएलमध्ये विलीनीकरण करण्यात आले होते. याप्रकरणी सेबीचे अधिकारी बी. जे. दिलीप यांनी ९५ पानांच्या आदेशपत्रात कोणाला किती दंड आणि त्याची कारणे या संदर्भात सविस्तर माहिती नमूद केली आहे. गुंतवणूकदारांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी तसेच भविष्यात अशी पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सर्वांनाच योग्य तो इशारा देण्याकरिता सेबीने दोषींना दंड भरण्याचा आदेश दिला.