एल्विन यादव याने रेव्ह पार्ट्यांमध्ये सापाचे विष पुरवल्याच्या प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात सापडला असून प्रकाश राज यांनी काही सनसनाटी फोटो ट्विट केले आहेत. त्यात तो भाजपच्या अनेक मंत्र्यांबरोबर तसेच ज्येष्ठ नेत्यांबरोबर दिसत आहे. त्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या बरोबरचे फोटो शेअर करत एकच खळबळ उडवून दिली आहे.
खूप गरळ ओकणाऱ्या लोकांबरोबर एल्विश यादव, ते इतके विष का ओकतात याविषयी आता आश्चर्य वाटायला नको अशी शेरेबाजीही प्रकाश राज यांनी आपल्या सोशल मिडीया पोस्टवर केली आहे. प्रकाश राज सध्या विदेशात आहेत. तेथूनच त्यांनी ही पोस्ट टाकली आहे. सापाच्या विषाचा रेव्ह पार्टीत होत असलेला वापर हा विषय सध्या खूपच वादग्रस्त ठरला असून त्याची मोठी चर्चा सुरू आहे. त्यात एल्विश यादव हा मुख्य आरोपी आहे. तथापि त्याने आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत.
महाराष्ट्रात सुद्धा मादक द्रव्यांचा व्यापार वाढत असून या प्रकरणाशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तारा जुळल्या आहेत काय असा थेट सवाल करीत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनाच घेरण्याचा प्रयत्न केला आहे. नोएडा येथील रेव्ह पार्टीत सापाच्या विषाचा पुरवठा केल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल असलेला आरोपी एल्विश यादव याचे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या निवासस्थानी स्वागत केल्याच्या घटनेकडे बोट दाखवत राऊत यांनी हा आरोप केला आहे.
No wonder they SPIT so much VENOM #justasking https://t.co/O14owS9uFu
— Prakash Raj (@prakashraaj) November 3, 2023