Breaking News

गृहनिर्माण, विमानतळ निर्मितीसाठी सिंगापूरमधील कंपन्यांशी करार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सिंगापूरचे व्यापार मंत्री एस.ईश्वरन यांच्यात सामंज्यस करारावर सह्या

मुंबई : प्रतिनिधी

महाराष्ट्रातील गृहनिर्माणाच्या महत्त्वाकांक्षी उद्द‍िष्टांसह विविध क्षेत्रांत महाराष्ट्र-सिंगापूर संयुक्त समितीचे प्रयत्न विकासाचे पर्व निर्माण करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला. महाराष्ट्र -सिंगापूर संयुक्त समितीची स्थापना व कार्यकक्षा निश्चितीबाबतच्या महत्त्वपुर्ण मसुद्यावर मुख्यमंत्री फडणवीस आणि सिंगापूरचे उद्योग व व्यापार मंत्री एस. ईश्वरन यांनी स्वाक्षरी केली.

यावेळी पुणे महानगर विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी-एमएडीसी यांच्यावतीने सिंगापूरमधील कंपन्यांशी करार करण्यात आले. त्यानुसार पीएमआरडीए क्षेत्रात वर्ल्ड क्लास मास्टर-प्लॅनींगसाठी सुर्बाना जुरांग आणि ग्रीनफिल्ड एअरफिल्ड या पुरंदर विमानतळाच्या विकासासाठी चांगी एअरपोर्ट इंटरनॅशनल या सिंगापूरमधील कंपन्या सहकार्य करणार आहेत.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या संयुक्त समितीच्या बैठकीसाठी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सिंगापूरचे भारतातील उच्चायुक्त लीम क्वॉन, राज्याच्या गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल, नागरी विमान सेवा विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, राज्याचे मुख्य राजशिष्टाचार अधिकारी राजगोपाल देवरा, एमएडीसीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी, पीएमआरडीएचे आयुक्त किरण गिते, सिंगापूरचे भारतातील वकिलातीचे प्रमुख अजित सिंग, सिंगापूरच्या व्यापार-उद्योग मंत्रालयातील वरिष्ठ संचालक डॉ. फ्रान्सिस चाँग, तसेच प्रतिनिधी मंडळात समावेश असलेल्या सिंगापूरमधील विविध उद्योग व व्यापार समुहांचे प्रमुख वरिष्ठ अधिकारी टॅन सून किम, आलोक भुनिया, विनम्र श्रीवास्तव, माईक फोरमोसो, वाँग फिने आदींची उपस्थिती होती.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या संयुक्त समितीची स्थापना हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. सिंगापूरने छोटा देश असूनही विकासाच्या क्षेत्रात मोठे काम केले आहे. हा विकासच समितीच्या स्थापनेची प्रेरणा आहे. या समितीमुळे महाराष्ट्राच्या प्रगतीला वेग देता येणार आहे. मुंबईप्रमाणेच राज्यातील अनेक शहरांत विकासाची मोठी क्षमता आहे. पुणे हे त्यापैकी एक शहर आहे. पुण्याचा नागरी क्षेत्रातील विकास झपाट्याने होत आहे. त्यामुळे पीएमआयरडीएच्या द्वारे या शहराच्या विकासाला आकार देण्याचा प्रयत्न सुरु आहे. अशा योग्य वेळी संयुक्त समितीच्या प्रयत्नातून पुण्याचे सुनियोजन करता येईल. त्यातून नागरी-नियोजनाचा उत्तम नमुनाही जगासमोर ठेवता येईल. त्यामुळे पुणे विकासाचे ग्रोथ इंजिनही ठरू शकेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येकाला हक्काचे घर मिळावे यासाठी पंतप्रधान आवास योजनेसारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. देशात मुबलक जमीन आणि साधनसंपत्ती उपलब्ध आहे. त्या जोडीला तंत्रज्ञान आणि कुशल मनुष्यबळ विकसित करण्यात सहकार्य मिळाल्यास, मोठ्या प्रमाणात घरे बांधता येतील. सिंगापूर आणि महाराष्ट्र शासनाच्या कार्यप्रणालीत पारदर्शकता हे समान वैशिष्ट्य आहे. या पारदर्शकतेमुळेच अनेक विकास प्रकल्प यशस्वी करता येतील. त्यादृष्टीने यापुढे विकासाचे पर्व निर्माण करता येईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

सिंगापूरचे उद्योग व व्यापार मंत्री  ईश्वरन म्हणाले की, सिंगापूर आणि महाराष्ट्राच्या दरम्यानचे हे सहकार्य यापुढे अनेक विकास प्रकल्पांच्या बाबतीत महत्त्वपुर्ण ठरेल. दोन्ही शासनांच्या दरम्यानचे संबंध वृद्धींगतही होतीलच,पण यातून सामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडविणाऱा विकासही साधता येईल. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्त्वातील महाराष्ट्रातील शासन-प्रशासनाचा विकासाचा दृष्टीकोन आणि अंमलबजावणीतील तत्परता या गोष्टी खूप महत्त्वपूर्ण आहेत. यामुळे विविध औद्योगिक संधीसह, दळण-वळण आणि गृहनिर्माण क्षेत्रातही विकासाच्या मोठ्या संधी आहेत. मुंबई आणि पुण्यासारख्या दाट लोकवस्तींच्या शहरातील आव्हानात्मक प्रश्नांवर रचनात्मक उपाय योजनांसाठीही हे सहकार्य महत्त्वपूर्ण ठरेल.

Check Also

एचडीएफसीही आणणार दिर्घकालीन बॉण्ड ६० हजार कोटी रूपयांचे रोखे जारी करण्यास बोर्डाची मान्यता

एचडीएफसी बँकेच्या संचालक मंडळाने शनिवारी खाजगी प्लेसमेंट मोडद्वारे पुढील बारा महिन्यांत एकूण ₹६०,००० कोटी रुपयांचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *