Breaking News

अध्यक्ष बागडेंच्या निर्णयामुळे सरकारची नाचक्की तर विरोधकांचा विजय विरोधकांच्या मागणीनुसार उर्वरित उत्तर प्रश्नोत्तराच्या तासानंतर

मुंबई : प्रतिनिधी

पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी मांडलेल्या २९३ अन्वये मांडलेल्या प्रस्तावावरील चर्चेला सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी उत्तर देण्यास सुरुवात केली. मात्र विशेष बैठकीची वेळ संपत आल्याने विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मंत्री देशमुख आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वेळ वाढविण्याच्या मागणीला केराची टोपली दाखवित विरोधकांच्या मागणीनुसार निर्णय घेत प्रश्नोत्तराच्या तासानंतर मंत्र्यांनी उत्तर द्यावे असा निर्णय जाहीर करत सभागृह तहकूब करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे सत्ताधारी पक्षाचा अध्यक्ष असून सरकारवर नाचक्कीची वेळ आल्याचे चित्र पाह्यला मिळाले.

मंगळवारी विरोधकांनी मांडलेल्या प्रस्तावावर सत्ताधारी आणि विरोधी बाकावरील जवळपास १६० सदस्यांनी आपली मते मांडली. तरीही काही सदस्यांची भाषणे बोलणे राहील्याने विधानसभेची विशेष बैठक सकाळी ९.३० ते ११.४५ वाजेपर्यत बोलविण्यात आली. त्यानुसार सदस्यांची मते मांडण्यात आल्यानंतर सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी साधारणत: ११.२५ वाजता उत्तर देण्यास सुरुवात केली. त्यावेळी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मंत्र्यांनी ११.५० वाजेपर्यंत आपले उत्तर संपविण्याची सूचना केली. मात्र मंत्री देशमुख यांनी जोशात उत्तर देण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांचे भाषण लांबत चालले. तसेच त्यात काही राजकिय मुद्दे येवू लागल्याने विरोधकांकडूनही त्यांच्या भाषणात अडथळे आणण्यास सुरुवात केली.

त्यामुळे सत्ताधारी बाकावरील मनिषा चौधरी, योगेश सागर यांच्यासह अन्य सदस्यांनीही कामकाजाची वेळ वाढवा आणि मंत्र्यांना पूर्ण बोलण्याची संधी देण्याची मागणी अध्यक्षांकडे सतत करत होते. पण कामकाजाची वेळ संपत आल्याने अध्यक्षांना निर्णय घेणे कठीण चालले होते. अखेर अध्यक्षांनी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांच्याकडे काय करायचे अशी विचारणा केली.  त्यावर या दोन्ही नेत्यांनी वेळ संपतच आली आहे. त्यामुळे आता प्रश्नोत्तराचा तास घ्यावा आणि त्यानंतर मंत्र्याचे उत्तर घ्यावे अशी मागणी या दोघांनी केली.

त्यावर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि मंत्री देशमुख यांनी आताच उत्तर पूर्ण देवू द्या उत्तर झाल्यावर प्रश्नोत्तराचा तास घेण्याची विनंती अध्यक्ष बागडे यांच्याकडे केली. मात्र अध्यक्ष बागडे यांनी सत्ताधाऱ्यांच्या विनंतीला केराची टोपी दाखवित विरोधकांच्या मागणीप्रमाणे निर्णय घेत सभागृहाचे कामकाज ५ मिनिटासाठी तहकूब करत पुढील कामकाज पुकारले. त्यामुळे राज्य सरकारवर नाचक्कीची वेळ ओढावल्याचे चित्र सभागृहात निर्माण झाले.

Check Also

न्यायालयाकडून अरविंद केजरीवाल यांना या अटी व शर्तीवर १ जून पर्यंत अंतरिम जामीन

सर्वोच्च न्यायालयाने १० मे (शुक्रवार) रोजी दिल्ली दारू धोरण प्रकरणात ईडीच्या न्यायालयीन कोठडीत असलेले दिल्लीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *