Breaking News

अंबादास दानवे यांची भन्नाट मागणी, ‘अर्थ’ शिंदेंना द्या! पवारांना `मुख्य` करा रखडलेल्या खाते वाटपावर आणि मंत्रिमंडळ विस्तारावर भाजपाला सल्ला

राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आपल्याकडेच असाव्या यासाठी अर्थ खात्यावरून चाललेला गोंधळ पाहता अजित पवार यांना मुख्यमंत्री करा, एकनाथ शिंदे यांच्याकडे अर्थखाते द्या आणि हा तिढा सोडवा, असा खोचक सल्ला ठाकरे गटाचे नेते विधान परिषद विरोधी पक्षनेते तथा ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला.

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार मागच्या वर्षभरापासून रखडला आहे. त्यात अजित पवार आणि शिंदे गटामध्ये काही खात्यांमुळे रस्सीखेच चालली आहे. अर्थखाते कुणाकडे असावे यासंदर्भात युतीत दावे-प्रतिदावे केले जात आहेत. अर्थ खाते आपल्याकडे राहावे, यासाठी अजित पवार आग्रही आहेत. तर अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते नको, अशी भूमिका शिंदे गटाची आहे. अशातच ठाकरे गटाचे नेते, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी खाते वाटपाच्या पेचावर खोचक सल्ला दिला.

भाजपाने युती करण्यासाठी आधी शिवसेना आणि आता राष्ट्रवादी पक्षातून अनेक नाग गळ्यात अडकवले आहेत. ते त्यांना काम करून देणार आहेत का, असा सवाल अंबादास दानवे यांनी विचारला आहे.

मंत्रिपद गळ्यात पडेल, या आशेवर अनेकजण आहेत. त्यांनी शिवलेले कोट कपाटातच राहतील, असे चित्र सध्या दिसत आहे, असे दानवे म्हणाले. मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटप आणि अन्य बाबीवर चर्चा करण्यासाठी अजित पवार यांना अखेर दिल्लीला जावे लागले. तिथे त्यांनी अमित शाह यांची भेट घेतली. पण पदरात काय पडले हे त्यांनाच ठावूक, असे दानवे म्हणाले.

अजित पवार हे भाजपच्या दिल्लीवारीवर आधी टीका करत होते. पण शालीन नेतृत्व असलेल्या अजित पवार यांनाच आता दिल्लीच्या दरबारी मुजरे आणि हुजरेगिरी करावी लागते, यासारखे दुर्दैव नाही, असे दानवे यांनी म्हटले आहे.

आमदार बच्चू कडू यांनी पत्रकार परिषद घेत मंत्रिपदाचा त्याग करण्याची तयारी त्यांनी दाखवली. त्यावर बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, बच्चू कडू यांनी मंत्रीपद घ्यावे म्हणून एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस मागे लागलेत का? सध्याचे चित्र पाहता ते बच्चू कडूंना मंत्रिपद देण्यास अनुकूल नाहीत, असेच दिसत आहे. मग ते कसला त्याग करत आहेत? या सर्व बनावट गोष्टी आहेत, अशी टीका दानवे यांनी केली.

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *