Breaking News

संजय राऊत यांची टीका, हे सरकार पाण्यात बसलेल्या म्हशी सारखं रोज एका मंत्र्याच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं पुढे येतायत

मागील दोन-तीन दिवसांपासून ठाकरे गटाच्या संघटनात्मक बांधणीच्या निमित्ताने सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. मात्र त्यांच्यावर भाजपाचे नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि संजय राऊत यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. नारायण राणे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देतानाच शिंदे-फडणवीस सरकारच्या कारभारावरूनही संजय राऊत यांनी टीकेची झोड उठवली आहे. यापार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस सरकारच्या कारभारावर बोलताना संजय राऊत म्हणाले, राज्यातील सरकार गेंड्याच्या कातडीचं असून रोज एका मंत्र्याच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण पुढे येत असताना हे सरकार पाण्यात बसलेल्या म्हशी सारखं बसून आहे, अशी खोचक टीका केली.

आज सकाळी संजय राऊत हे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीका केली.

संजय राऊत पुढे म्हणाले की, काही दिवसांपूर्वी आम्ही नागपूरमध्ये होतो. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही तिथे उपस्थित होते. सरकारचा गोंधळ आम्हाला जवळून बघता आला. मुळात हे सरकार अस्तित्वातच नाहीये. रोज एका मंत्र्याच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं पुढे येत आहेत. मात्र, सरकार गेंड्याच्या कातडीचं आहे. मुख्यमंत्र्यांच्या भूखंडाची दोन प्रकरणे, त्यानंतर अब्दुल सत्तार यांचा जमीन घोटाळा, उदय सामंत यांचे बोगस डिग्री प्रकरण, अशी प्रकरणं बाहेर येऊनही सरकार पाण्यात बसलेल्या म्हशी सारखं होतं. जणू काही घडलंच नाही आणि विरोधी पक्षच गुन्हेगार आहे, अशा पद्धतीने काम करत होतं, अशी टीकाही केली.

महाराष्ट्राला इतिहास आहे. पूर्वी एखाद्या मंत्र्यावर किंवा मुख्यमंत्र्यांवर न्यायालयाने थोडे जरी ताशेरे ओढले, तरी ते राजीनामा देत होते. बॅरिस्टर अंतुले, शिवाजीराव पाटील निलंगेकर, अशी अनेक उदाहरणं आहेत. मात्र, एका अधिवेशनात मुख्यमंत्र्यांसह सहा मंत्र्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणं उघडकीस आली. तेही पुराव्यासह तरीही सरकार ठोंब्याप्रमाणे बसून आहे असल्याची खोचक टीकाही त्यांनी केली.

महाराष्ट्रातील राजकीय वातावरण हे परिवर्तनाच्या दिशेने चालले आहे. २०२४ किंवा त्यापूर्वीसुद्धा हे परिवर्तन होऊ शकते. हे सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही, हे मी यापूर्वी सुद्धा सांगितलं आहे. न्यायालयावर जर दबाव आला नाही, तर संविधान आणि कायद्याचे उल्लंघन करून आलेलं हे सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही. कायद्यानुसार १६ आमदार अपात्र ठरतील. त्यामुळे सरकारकडून वेळकाढू धोरण राबवलं जात आहे. हे सरकार व्हेंटिलेटरवर आहे, ते एका सर्वोच्च न्यायालयाने काढलं तर ‘हे राम’ नक्की आहे, अशी बोचरी टीकाही संजय राऊत यांनी केली.

Check Also

नरेंद्र मोदी यांचे भाकित, नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये…

या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव होणार असून मान्यताप्राप्त विरोधी पक्षाचे स्थान देखील त्यांना मिळणार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *