Breaking News

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना अभियंता बनण्याची संधी राज्यात १ हजार ९२० जागांवर मिळणार प्रवेश-अल्पसंख्याक मंत्री मलिक

मुंबई: प्रतिनिधी

अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांकरिता राज्यातील १५ शासकीय तंत्रनिकेतनामध्ये (पॉलिटेक्निक) दुसऱ्या पाळीतील वर्ग सुरु करण्यात आले आहेत. या योजनेतून अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना अभियंता बनण्याची संधी उपलब्ध झाली असून सध्या तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. पात्र इच्छूक विद्यार्थ्यांनी यासाठी अर्ज करावा असे आवाहन अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केले.

राज्यात दुसऱ्या पाळीतील वर्गांमध्ये १ हजार ९२० इतक्या जागा उपलब्ध असून मेकॅनिकल, सिव्हील, इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर, आयटी, प्रिटींग टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आदी अभ्यासक्रमात अल्पसंख्याक विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात असेही त्यांनी सांगितले.

सध्या फक्त प्रवेश प्रक्रिया सुरु असून लॉकडाऊनसंदर्भात शासनाच्या आदेशानुसार नंतर वर्ग सुरु करण्यात येतील. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी अर्ज भरण्यासाठी आवश्यक माहिती, हेल्पलाईन क्रमांक यासह ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया ही तंत्रशिक्षण संचालनालयाच्या http://www.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर सुरु आहे.

अल्पसंख्याक मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, जैन, पारसी, ज्यु समाजातील विद्यार्थ्यांना यासाठी अर्ज करता येईल. ठाणे, सोलापूर, नांदेड, जळगाव, यवतमाळ, वांद्रे (जि. मुंबई उपनगर), रत्नागिरी, कराड (जि. सातारा), ब्रम्हपुरी (जि. चंद्रपूर), जालना, अंबड (जि. जालना), पुणे, हिंगोली, लातुर येथील शासकीय तंत्रनिकेतने आणि मुंबईतील शासकीय मुद्रण तंत्र संस्था (सीएसएमटीसमोर) येथे दुसऱ्या पाळीतील वर्ग सुरु होणार आहेत.

शासकीय तंत्रनिकेतनमधील काही निवडक व्यवसायांचे अभ्यासक्रम दुसऱ्या पाळीत शिकविले जातात. संचालक (तंत्रशिक्षण) यांनी नियमित तंत्रनिकेतनांमध्ये प्रवेशाकरिता विहित केलेल्या नियमानुसार दुसऱ्या पाळीत प्रवेश देण्यात येतो. एकूण प्रवेश क्षमतेच्या ७० टक्के जागा अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी तर ३० टक्के जागा सर्वसाधारण आणि राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. तंत्रनिकेतनांमधील नियमित अभ्यासक्रमासाठीही अल्पसंख्याक विद्यार्थी अर्ज करु शकतात. तिथे संधी न मिळाल्यास अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी दुसऱ्या पाळीतील वर्गामध्ये प्रवेश उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

पॉलिटेक्निक संस्थेचा पत्ता, संस्था प्रमुख, प्रवेश संख्या, प्रशिक्षणाचा कालावधी,अभ्यासक्रमाचे नाव इत्यादी माहिती अल्पसंख्याक विकास विभागाच्या http://mdd.maharashtra.gov.in या वेबसाईटवर ‘ई-शासन व इतर – अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी दुसरी व तिसरी पाळी मान्यताप्राप्त संस्थांची यादी’ या मेनुवर पाहू शकता असे ते म्हणाले.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *