Breaking News

“म्युकोर्मिकोसिस” (ब्लॅक फंगस) म्हणजे काय, हा आजार कसा होतो? जाणून घ्या सदर आजाराची माहिती नागरीकांना व्हावी यासाठी हा खटाटोप

कोविड-19 या आजाराशी लढता लढता आणखी एका आजाराने काही रुग्णांना ग्रासले आहे, या आजाराविषयी जाणून घेऊ या लेखाद्वारे…..

करोनानंतर रुग्णांमधे जीवघेण्या बुरशीचा संसर्ग (ब्लॅक फंगस) वाढत असल्याचे दिसून येत आहे. राज्यात तसेच देशात करोनाचा धोका असतानाच करोनामुक्त झालेल्या रुग्णांमधे “म्युकोर्मिकोसिस” हा गंभीर संसर्ग बळावतो आहे.

म्युकोर्मिकोसिस म्हणजे काय?

म्युकोर्मिकोसिस हा एक प्रकारचा बुरशीजन्य संसर्ग आहे. हा तुलनेने दुर्मिळ आहे, परंतु अत्यंत गंभीर देखील आहे. साधारणत: झिगॉमायकोसिस म्हणून या आजारास ओळखले जाते. एखाद्या आजारपणामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली असेल तर हे संक्रमण बहुतेक वेळा उद्भवते. याकरिता उपचार घेणे महत्वाचे आहे. उपचार न घेतल्यास म्युकोर्मिकोसिस प्राणघातकही ठरू शकतो.

कोणाला जास्त धोका?-

कुठल्याही कारणाने रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या रुग्णांमधे हा संसर्ग जास्त प्रमाणात होतो. दुसऱ्या लाटेनंतर प्रमुख्याने करोना पश्चात रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याने (कोविड-19 च्या उपचारातील रेमडेसिवर, स्टेरॉईड व अँटीबायोटिक्सच्या वापराच्या दुष्परिणामामुळे ) तसेच उच्च रक्तदाब, अनियंत्रित मधुमेह,अवयव प्रत्यारोपण केलेल्या व्यक्तींमध्ये याचे गंभीर स्वरुप पहावयास मिळते.

म्युकोर्मिकोसिसची लक्षणे कोणती आहेत?

या आजारात व्यक्तीच्या श्वसनयंत्रणेस किंवा त्वचेस संसर्ग उद्भवतो.

यात प्रामुख्याने पुढील लक्षणे आढळतात:-

 • खोकला
 • ताप येणे
 • डोकेदुखी
 • नाक बंद
 • सायनस वेदना
 • दातांमधे तीव्र वेदना
 • दात हलणे
 • हिरड्यांमधून पू येणे
 • तोंडातून दुर्गंधी येणे
 • टाळूवर एखादा काळा चटटा येणे
 • नाकातून पू येणे
 • दृष्टी कमी होणे
 • डोळे लाल होणे
 • डोळ्यांची हालचाल कमी होणे
 • चेहऱ्यावर सूज येणे वा बधीरता येणे
 • जबड्याचे हाड उघडे पडणे
 • त्वचा काळसर होणे
 • त्वचेवर मेदयुक्त फोड येणे
 • त्वचेवर लालसरपणा येणे
 • शरीराला सूज येणे
 • मलूलपणा जाणवणे
 • अल्सर

या आजारामुळे प्रसंगी वरचा डोळा व जबडा गमवायची वेळ येऊ शकते. तसेच मेंदूपर्यंत संसर्ग पोहोचल्यास प्रसंगी मृत्यूही संभावतो.

म्युकोर्मिकोसिस कशामुळे होतो?       

म्युकोर्मिकोसिस हा आजार म्यूकोर्मिटाईड मोल्ड्सच्या संपर्कातून उद्भवतो.

हे जीव…

 • पाने
 • कंपोस्टचे ढीग
 • माती
 • सडणारे लाकूड, यात आढळतात.

हे प्रभावित मोल्ड श्वसन यंत्रणेस संसर्गित करते व त्यातून म्यूकोर्मिकोसिस आजार उद्भवतो. याला फुफ्फुसीय संसर्ग (synus infection) म्हणून संबोधले जाते.

हे संक्रमण पुढील माध्यमातून अधिक संक्रमित होते:-

 • केंद्रीय मज्जासंस्था (हे माध्यम दुर्मिळ आहे)
 • डोळे
 • चेहरा
 • फुफ्फुसे
 • सायनस
 • त्वचेवरील जखम किंवा भाजलेली जखम (त्वचेच्या संसर्गातून)

मात्र प्रत्येकाला बुरशीजन्य संसर्ग होतोच असे नाही. एखाद्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाल्यास त्यास या प्रकारचा संसर्ग होण्याचा धोका वाढू शकतो.

 ज्या परिस्थितींमध्ये आपला संसर्गाचा धोका वाढू शकतो त्या पुढीलप्रमाणे आहेत:-

 • भाजलेली जखम
 • कापलेली जखम आणि खरचटलेली जखम
 • कर्करोग
 • अलिकडील अवयव प्रत्यारोपण
 • मधुमेह (विशेषत: जर योग्यरित्या उपचार केला जात नसेल तर)
 • शस्त्रक्रिया
 • एचआयव्ही किंवा एड्स

त्वचेच्या संसर्गासह, आपल्या शरीराच्या कोणत्याही भागात म्यूकोर्मिकोसिस विकसित होऊ शकतो. हा सुरुवातीला त्वचेच्या माध्यमातून उद्भवू शकतो. परंतु पुढे दुर्लक्ष झाल्यास गतीने दुसर्‍या भागातही हा संसर्ग पसरण्याचा धोका असतो.

उपाय:-

वेळीच निदान आणि उपचार केल्यामुळे या आजारामुळे होणारे संभाव्य दुष्परिणाम टाळता येतात. यासाठी….

 • रक्तातील साखरेचे प्रमाण  नियंत्रित ठेवणे आवश्यक
 • करोनाच्या उपचारादरम्यान स्टेरॉईडचा आवश्यक तेवढाच वापर गरजेचा असून अतिरिक्त वापर टाळणे अत्यावश्यक.
 • प्रतिजैविकांचा (Antibiotics)तारतम्याने वापर आवश्यक
 • ऑक्सीजन सिलिंडरच्या ह्यूमिडिफायरमधे distilled water चा वापर.

 उपचार(Treatment):-

अँटी फंगल ट्रीटमेंटची गरज असेल तर सर्जरी करुन बाधित झालेला भाग काढून टाकला जातो. यासाठी दंतशल्यचिकित्सक, ओरल आणि मॅकझिलोफ़ेशियल सर्जन, कान-नाक-घसा तज्ञ, न्यूरोसर्जन व फिजिशियन यांच्या सामूहिक प्रयत्नांची गरज आहे.

म्युकोर्मिकोसिस संसर्ग रोखणे शक्य आहे काय?

म्युकोर्मिकोसिस संक्रमित होणारा आजार नाही. म्हणून संक्रमित व्यक्तीकडून तो आजार दुसऱ्या व्यक्तीला होवू शकत नाही. मात्र या प्रकारच्या संसर्गापासून बचाव करण्याचा उत्तम उपाय म्हणजे स्वतःची काळजी घेणे, वैयक्तिक स्वच्छतेकडे काळजीपूर्वक लक्ष देणे.

आपली प्रतिकारशक्ती दुर्बल असल्यास, घराबाहेर स्वत:ला सुरक्षित ठेवणे महत्वाचे आहे. कोणत्याही ठिकाणी काम करताना मुखवटा (मास्क) घातल्यास आणि पूर्ण बरे होईपर्यंत सर्व जखमांवर नियमित मलमपट्टी करीत राहिल्यास बुरशीजन्य संसर्ग रोखणे शक्य होईल.

उन्हाळ्यात आणि शरद ऋतूतील महिन्यांमध्ये अतिरिक्त सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे, कारण या वातावरणात बुरशीचे प्रमाण वाढण्याची शक्यता जास्त असते. म्युकोर्मिकोसिस या आजाराबाबतची ही माहिती आपल्या सर्वांना उपयुक्त ठरेल यात शंका नाही. तरी सर्वांनी काळजी घ्यावी. वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष द्यावे. कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. आणि काही लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा त्वरित सल्ला घ्यावा.

 

मुख्य मार्गदर्शन

डॉ.स्वाती गणेश वारे (B.D.S.,L.L.B.),पनवेल

 

लेखन व संपादन

मनोज शिवाजी सानप

जिल्हा माहिती अधिकारी रायगड-अलिबाग

Check Also

कोरोना : मुंबईत २०० च्या आत तर राज्यात आतापर्यत सर्वात कमी संख्येची नोंद ४ हजार १४५ नवे तर ५ हजार ८११ बरे झाले, १०० मृत्यूची नोंद

मुंबई: प्रतिनिधी मुंबईत आज बऱ्या दिवसानंतर २०० आत अर्थात १९५ इतके नवे कोरोना बाधित आढळून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *