Breaking News

बंडखोरीमुळे भाजपा-शिवसेनेच्या २८ हून अधिक जागांमध्ये घट होण्याची शक्यता राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागांमध्ये वाढ होण्याची शक्यता

मुंबईः विशेष प्रतिनिधी
राज्यातील विधानसभा निवडणूकीचा निकाल काही तासानंतर जाहीर होणार आहे. तत्पूर्वी या निवडणूकीत भाजपा आणि शिवसेनेने परस्पराविरोधात बंडखोरी करत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा देत त्यांच्या उमेदवारांच्या विजयाची हमी घेतली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूकीचा निकाल अनपेक्षित लागणार असल्याची शक्यता अधिक असल्याचे दिसून येत आहे.
राज्यातील वांद्रे पश्चिम, माण, मीरा-भाईंदर, सोलापूर शहर मध्य, करमाळा, जुन्नर, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, वर्सोवा, अंधेरी पूर्व, कल्याण पूर्ण आणि पश्चिम, पंढरपूर, बार्शी, गंगाखेड, रामटेक आदी मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवारांविरोधात त्यांच्याच पक्षातील उमेदवारांनी बंडखोरी केलेली आहे. तर काही ठिकाणी भाजपा उमेदवारांविरोधात त्यांच्यात बंडखोर उमेदवारांनी बंडखोरी केली असून कोकणातील तीन मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवारांच्या विरोधात भाजपाने सरळ उमेदवारी देत युतीतच बंडखोरी घडवून आणल्याचे दिसून येत आहे.
याशिवाय भाजपाचा मित्रपक्ष असलेला रासपच्या गंगाखेड येथील उमेदवाराच्या विरोधात भाजपाच्या उमेदवारी अर्ज भरला आहे. याशिवाय रामटेकमध्ये भाजपाच्या उमेदवाराविरोधात शिवसेनेच्या बंडखोर उमेदवाराने अर्ज भरल्याने या भागात चुरस निर्माण झाली आहे.
याशिवाय मुंबईतील बोरीवलीत विनोद तावडे यांच्याऐवजी सुनील राणे यांना उमेदवारी दिल्याने तावडे समर्थकांनी राणे यांच्या विरोधात काम सुरु केले आहे. तर मीरा-भाईंदर येथे नरेंद्र महेता यांच्याविरोधात गीता जैन यांच्या बंडखोरीला भाजपातंर्गत जनसामान्यांचाही चांगला पाठिंबा मिळत आहे. माण विधानसभा मतदारसंघात भाजपा आणि शिवसेनेने सरसरळ लढत होत असून या दोन्ही पक्षांवर नाराज असलेल्या पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर लढत असलेले प्रभाकर देशमुख यांच्या विजयासाठी काम सुरु केल्याचे दिसून येत आहे.
याशिवाय डोंबिवली, कुलाबा आणि कल्याण पूर्व-पश्चिम या चार मतदारसंघात भाजपा आणि शिवसेनेच्या उमेदवारांपेक्षा बंडखोर आणि इतर पक्षाच्या उमेदवारांना मदत करण्याचे धोरण या मतदार संघातील युतीच्या कार्यकर्त्यांनी स्विकारले आहे. तसेच लातूर जिल्ह्यात औसा, अकोले आदी ठिकाणीही अशीच परिस्थिती असल्याचे दिसून येत आहे.
या नाराजी आणि युतीतील अंतर्गत बेबनावामुळे भाजपा-शिवसेनेच्या जवळपास २८ जागा आणि ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसशी शिवसेनेची थेट लढत होत असलेल्या ५७ जागी भाजपाने शिवसेनेऐवजी राष्ट्रवादीला मदत करण्याचे धोरण स्विकारले असल्याने युतीच्या जागांमध्ये मोठ्या प्रमाणावर घट होणार असल्याचे चित्र किमान आज तरी दिसत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत