Breaking News

कामगारांना दर्जेदार अत्याधुनिक सुरक्षा साधने पुरविणे काळाची गरज कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांची माहिती

निष्काळजीपणामुळे एखाद्या कामगाराचा अपघात झाल्यास पैशाच्या स्वरुपात कितीही मदत केली तरी त्या कामगाराचे नुकसान भरून निघत नाही. त्यामुळे कामाच्या ठिकाणी शून्य अपघात धोरण अवलंबून उद्योजक, मालक, बांधकाम व इतर क्षेत्रातील कंपन्यांनी त्यांच्या कामगारांना दर्जेदार अत्याधुनिक सुरक्षासाधने पुरविणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले.

‘शून्य अपघात’ हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन अग्निशमन क्षेत्रात सुरक्षित तंत्रज्ञानाचा वापर, उत्पादन व संशोधन या क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या कंपन्यांना आणि अग्निशमन क्षेत्रात काम करणाऱ्या जवानांना किंग्ज एक्सलन्स पुरस्कार वितरण आणि परिषदेचे आयोजन किंग्स एक्पो मीडिया यांच्यावतीने करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मंत्री डॉ. खाडे बोलत होते.

व्यासपीठावर महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय, एमआयडीसी, मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष वरीक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालक देवीदास गोरे, कार्यक्रमाचे संयोजक आणि किंग्ज एक्स्पो मीडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निरंजन गुप्ता, भारत पेट्रोलियमचे अग्नि आणि सुरक्षा विभागाचे प्रमुख अरुणकुमार दास उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचे हस्ते ‘किंग्ज एक्सलन्स पुरस्कार’ २१ जणांना, ‘सेफ इंडिया हिरो प्लस पुरस्कार’ ५९ जणांना, ‘सेफ टेक कार्पोरेट पुरस्कार’ ३ जणांना, ‘सेफ्टी प्रुफ पुरस्कार’ ३८ जणांना प्रदान करण्यात आले.

कामगारांचा जीव वाचावा, यासाठी अत्याधुनिक सुरक्षा साधनांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्या आणि अनेकांचा जीव वाचविण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालणारे अग्निशमन सैनिक या दोघांच्याही पाठीवर कौतुकाची थाप देण्याचे अतिशय कौतुकास्पद काम या पुरस्काराच्या निमित्ताने होत असल्याचे सांगत मंत्री खाडे यांनी समाधान व्यक्त केले. उद्योजकांनी कामगारांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य देणे हे त्यांचे कर्तव्य असल्याचेही त्यांनी सांगितले.

कोणत्याही क्षेत्रात आपण कामगारांचे कौशल्य वापरून वास्तू, वस्तू किंवा यंत्र तयार करतो. त्यामुळे कामगारांचे महत्व अनण्य साधारण आहे. आपला कामगार कसा काम करतो, त्याच्या हातात कोणती सुरक्षा साधने आहेत, तो सुरक्षितपणे काम करतो की नाही याची खात्री पर्यवेक्षकाने करणे आवश्यक आहे. मालक, व्यवस्थापक आणि पर्यवेक्षकाने कामगारांच्या सुरक्षेवर लक्ष ठेवावे. असेही मंत्री खाडे म्हणाले.

शासनसुद्धा कामगार मंत्रालयातून कामगारांना सुरक्षित साधनांची संच देण्यात येतो. आतापर्यंत ४० लाख नोंदणीकृत बांधकाम व संघटित कामगारांना अशा संचाचे वितरण शासनाने केले आहे. त्यात हातमोजे, सुरक्षा जॅकेट, हेल्मेट, सुरक्षा पट्टा, बूट, बॅटरी इत्यादी सुरक्षा साहित्य प्रत्येक कामगाराला मोफत देण्यात आल्याचे मंत्री डॉ. खाडे यांनी सांगितले.

Check Also

ज्येष्ठ साहित्यिक डॉ यशवंत मनोहर यांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहीर

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार २०२३’ ज्येष्ठ दलित साहित्यिक डॉ. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *