Breaking News

उद्धव ठाकरे यांचा पलटवार, …तर तुमच्यावर ही परिस्थिती आली नसती

मध्यंतरी काहीजण आले होते. त्यांनी जाहिरपण सांगितलं की उद्धव ठाकरे यांना जमिन दाखवू. त्यानुसार आपल्यातील गद्दारांना सोबत घेऊन त्यांच्या मध्यस्थीने पक्ष काढून घेतला, पक्षचिन्ह काढून घेतलं. इतकंच काय सध्या आपल्या सोबत असलेल्या आमदार, खासदार नगरसेवकांच्या घरावर धाडी टाकल्या. तरीही हा उद्धव ठाकरे उभा कसा असा प्रश्न त्यांना पडला असून त्यांना माहितच नाही की माझी ताकद कशात आहे. या समोर बसलेल्यांमध्ये माझी ताकद असल्यानेच माझं सगळं काढून घेतलं तरी माझ्या समोर बसलेली ताकदीच्या बळावर उभा आहे. होय आहे मी घराणेशाहीतून पुढे आलेला असे ठणकावून सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पलटवार केला.

जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने आयोजित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील जाहिर सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि पंतप्रधान मोदी यंच्यावर टीकास्त्र सोडले.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, तुम्हाला आठवत असेल की, १९९३ साली मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना मुंबईच्या रस्त्यावर, रेल्वे प्लॅटफॉर्मवर गँगवॉर दिसत होते. पण त्यावेळच्या आपल्या युती सरकारने ही गँगवॉर मोडून काढली. पण आता सरकारमधीलच गँगवॉर बाहेर आल्याचे दिसत आहे. एक गँग मिद्यांची तर दुसरी गँग भाजपाची आणि तिसरी गँग अद्याप दिसेची ना पण आता सरकारमधली गँगवॉर बाहेर दिसत असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले, भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी मिंदे गटाच्या कार्यकर्त्यावर गोळीबार केला. ही घटना घडताच पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज कोणी मागितले पण तुम्हा सर्वांच्या मोबाईलवर आलेच ना. वास्तविक सीसीटीव्हीचे फुटेज बघण्याचे न्यायालयाचे आहे. न्यायालयाने अद्याप ते फुटेज अद्याप मागितले नसताना हे फुटेज बाहेर कसे आले. मध्यंतरी आम्ही एका लवादाने निकाल दिला की आपल्या शिवसेनेची घटना नाहीच उद्धव ठाकरेंची निवड निवडणूकीतून झाली नाही असे सांगत पक्ष आणि चिन्ह गद्दारांना देऊन टाकले. त्यानंतर आम्ही जनअदालात घेत शिवसेनेतील निवडणूकांचे सगळे व्हिडिओ आम्ही जनतेच्या समोर दाखविले. पण लवादाचा निर्णय देणारे काही व्हिडिओ फुटेल दाखवायला तयार नाही अशी खोचक टीकाही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे नाव न घेता केली.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मी आजारी असताना कोणतीही शाररीक हालचाल करू शकत नव्हतो. तेव्हा तुम्ही आमच्यातील काही गद्दारांवर ईडी, सीबीआयच्या धाडीची भीती घालत सोबत घेऊन गेला. आज तेच तुमच्यावर उलटलेत ना. कुठाय तुमचा पक्ष, कुठे आहे गद्दारांचा पक्ष माझं सगळं काढून घेतलं तरी उलट माझी शिवसेना वाढतेय, फोफावतेय असे सांगत तुमचा भाजपा शिल्लक तरी राहिला आहे का असा सवाल करत भाजपातील खरी माणसे आता शिल्लक तरी राहिली आहेत का असा सवाल यावेळी फडणवीस आणि भाजपाला केला.

उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले , मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सिंधूदुर्गाच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी पहिल्यांदाच नौदलाचा कार्यक्रम सिंधुदूर्गाच्या किल्ल्यावर झाला होता. त्यावेळी मला वाटले की आता पंतप्रधान कोकणात पहिल्यांदाच आले आहेत काही तरी भरभरून देऊन जातील. पण काहीच दिलं नाही. त्यानंतर वारंवार महाराष्ट्रात येत आहेत. मग आता मला भीती वाटायला लागली असून प्रत्येक वेळी ते येथे येतात अन महाराष्ट्रातील काही तरी किंवा कोणता तरी उद्योग गुजरातला घेऊन जातात अशी टीका करत मध्यंतरी कोकणाला तौक्ते आणि निसर्ग चक्रिवादळाचा फटका बसला. त्यावेळी पंतप्रधान मोदी हे कोकणात आले नाहीत की कोणती मदत दिली नाही. पण आता प्रकल्पांचे उद्घाटन करण्यातसाठी येत आहेत. नाही तर पुन्हा एकदा एखादा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला नेतील की काय अशी भीती वाटायला लागली असा टोलाही लगवाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी ईडी, सीबीआयचा धाक दाखवत अनेक पक्षात फोडाफोडी केल्या. पण ते हे विसरले की, तुमची जी पिलावळ आहेत त्यांनी जर खरंच देशासाठी काम केलं असतं तर आत ह्याचा पक्ष फोड त्याचा पक्ष फोड असे करण्याची वेळ आली नसती असा खोचक टोला लगावत या फोडाफोडीच्या राजकारणात तुमचा भाजपा शिल्लक राहिलाय कुठे असा सवाल करत तुमच्या सत्तेच्या हव्यासापायी भाजपा पक्ष संपवायला निघालात असा इशाराही यावेळी दिला.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आता लोकंच मोदीच्या नावाला विरोध करू लागले आहेत. मोदी सरकार म्हणून फिरणाऱ्या रथाला हाकलून देत आहेत. देशाचं नाव भारत असताना सगळ्या योजना भारत सरकारकडून राबविल्या जात असताना तुम्ही मोदी सरकार असे नाव कसे काय ठेवू शकता असा सवाल करत देशाचे नाव भारतच्या ऐवजी मोदी म्हणून ठेवलयं का तुम्ही सगळीकड मोदी सरकार लिहीताय असा उपरोधिक सवालही केला. मध्यंतरी पंतप्रधान मोदी यांनी चाय पे चर्चा हे सुरु केलं होत. जन की नाही तर मन की बात सुरु केली. पण आपण सगळ्यांनी मिळून होऊ जाऊ दे चर्चा, शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळाले का सारख्या मुलभूत प्रश्नावर खुले आम चर्चा घडवून आणा असे आवाहनही यावेळी केले.

कोंबडी चोरायच्या आधीच तुम्ही पिसे उपसून काढलीत

यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाच्या काळात केंद्रीय मध्यम व सुक्ष्म लघुउद्योग मंत्री नारायण राणे यांच्या मेडिकल काँलेजला परवानगी देण्याचा किस्सा सांगताना म्हणाले, शिवसेना प्रमुखांनी सगळं काही दिलेलं असतानाही काहीजण शिवसेनेतून बाहेर पडले. तरीही कोकणातील जनतेला चांगल रूग्णालय देण्यासाठीचा एकप्रस्ताव माझ्याकडे पाठविला. पण मी पक्ष पाहिला नाही, व्यक्ती कोण म्हणून पाहिला नाही पण लगेच मेडिकल कॉलेज आणि रूग्णालयाला परवानगी देऊन टाकली. इतकेच नव्हे तर देशाचे आरोग्य मंत्री राहिलेल्या मनसुख मांडविया यांच्याशी मी स्वतः बोललो. त्यांच्याच पक्षाच्या एका मंत्र्याला रूग्णालय सुरु करण्याला ते परवानगी देत नव्हते. त्यामुळे मला बोलावं लागलं अशी आठवण सांगत असतानाच कोंबडी चोर, कोंबडी चोर अशा घोषणा उपस्थित समुदायांकडून करण्यात येऊ लागल्या त्यावेळी उद्धव ठाकरे गमतीने म्हणाले तुम्ही तर कोंबडी चोरायच्या आधीच पिसे उपटून काढलीत अशी खोचक टीपण्णीही केली.

Check Also

मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची स्पष्टोक्ती, राज्यातील मतदानाच्या टक्केवारीत वाढ नाही

लोकसभा निवडणूकीसाठी २६ तारखेला दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पाडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पहिल्या आणि दुसऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *