Breaking News

जयंत पाटील यांचा उपरोधिक टोला, पुन्हा अर्थसंकल्प मांडायचा नाही, हा एकमेवच… जे शक्य नाही अशा गोष्टींची कमिटमेंट या सरकारने राज्यातील जनतेला करून घोषणांचा पाऊस पाडला...

आजचा अर्थसंकल्प १६ हजार कोटी रुपयांच्या तुटीचा अर्थमंत्र्यांनी मांडला परंतु ज्या घोषणा केल्या त्या किमान लाखभर कोटीच्या असल्याने त्याची बेरीज केली तर ही तूट १६ हजार कोटीवरुन एक लाख कोटीवर देखील जाऊ शकते अशा स्वप्नाळू अर्थसंकल्पाचे दर्शन झाले अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी अर्थसंकल्पावर बोलताना शिंदे – फडणवीसांवर जोरदार टीका केली.

पुन्हा आपल्याला अर्थसंकल्प मांडायचा नाही हा एकमेव मांडायचा आहे या अविर्भावात देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केला.मोठमोठ्या घोषणा आणि जे – जे सात – आठ महिन्यात समोर आलं ते सगळं एकत्रित करून जाहीर करण्याचे काम अर्थसंकल्पात करण्यात आले आहे असा थेट आरोपही जयंत पाटील यांनी केला.

या वर्षभरात शिंदे – फडणवीस सरकारला आपला कार्यकाळ पूर्ण करता येणार नाही याची खात्री असल्यासारखा हा अर्थसंकल्प मांडण्यात आला. न्यायालयाचा निर्णय यायचा आहे आणि परवा झालेल्या निवडणुकीचा बराच मोठा धसका घेतलेला दिसतोय म्हणून जे शक्य नाही अशा गोष्टींची कमिटमेंट या सरकारने राज्यातील जनतेला करून घोषणांचा पाऊस पाडला आहे असा जोरदार हल्लाबोलही जयंत पाटील यांनी केला.
बुधवारी हे आत्मविश्वास कमी असणारं सरकार आहे असे वक्तव्य केले होते. या कमी असणाऱ्या आत्मविश्वासामुळे जे पाहिजे ते उद्या द्यायला तयार होतील आणि तीच पध्दत आणि तोच अनुभव आज अर्थसंकल्पात पहायला मिळाला अशी टीकाही जयंत पाटील यांनी केली.

यावेळी जयंत पाटील म्हणाले, राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा अभ्यास केला आणि बुधवारी आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला त्या पाहणी अहवालात आपल्या राज्याचे उत्पन्न, राज्याची ग्रोथ ही मागच्या आठ महिन्यात कमी झालेली आहे. चालू अर्थसंकल्पातदेखील सरकार वेळेवर पैसे खर्च करत नाही असे असताना सरकारने आज मोठ्या घोषणा केल्या व या करताना सर्व क्षेत्राला खूश करण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये अविर्भाव असा होता की, या महाराष्ट्रातील सर्व घटकांना न्याय द्यायचा आणि तो न्याय वर्षभर करायचा असतो परंतु तो वर्षभराचा वेळ आपल्याला मिळणार नाही याची खात्री मनात ठेवून हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला असल्याचा टोलाही लगावला.

बांधकाम खात्यासाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या मात्र महाविकास आघाडी सरकारने जेवढा (१५६७३)निधी दिला त्याच्याऐवजी १४२२६ कोटी म्हणजे १४४९ कोटीने निधी कमी देण्यात आला आहे. त्याचबरोबर अर्थसंकल्पात पाचवे अमृत पर्यावरणाचे होते. त्या पर्यावरणाला आघाडी सरकारने जो निधी दिला होता त्यापेक्षा २९ कोटी रुपये कमी दिला आहे हा दुसरा विरोधाभास तर ऊर्जाक्षेत्रासाठी मोठ्या घोषणा केल्या पण अतिशय जुजबी म्हणजे ९०० कोटीची वाढ दिसते हा तिसरा विरोधाभास आहे. यामध्ये ९९२६ कोटीऐवजी १०९१९ कोटीची वाढ आहे. सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये ५ लाखाचा खर्च सरकार करणार अशी घोषणा करण्यात आली आहे मात्र यामध्ये भरीव वाढ झाली असेल असे वाटले परंतु २२-२३ आणि २३-२४ च्या अर्थसंकल्पात फक्त ३३७ कोटीचा फरक आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

भाषण मोठं आहे, घोषणा मोठी आहे… तरतूदी मात्र तशाप्रकारे वाढलेल्या दिसत नाहीत आणि बर्‍याच घोषणांमध्ये याची तरतूद करण्यात येईल अशी आश्वासने आहेत असा उपरोधिक टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

दरम्यान येरे येरे पावसा… तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा… घोषणांचा पाऊस आला मोठा असा गाण्याचा संदर्भ देत जयंत पाटील यांनी असा हा अर्थसंकल्प आहे असा मिश्किल टोलाही लगावला.

Check Also

नवनीत राणा यांचे पुन्हा एकदा असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात चिथावणी वक्तव्य

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना भाजपा नेत्या नवनीत राणा म्हणाल्या की “राम भक्त” (प्रभू रामाचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *