Breaking News

देवेंद्र फडणवीस यांची टीका, विरोधकांचे पत्र नव्हे ग्रंथच… जितक्या लक्षवेधी आलेल्या आहेत त्यातील मुद्दे उचलून पत्र पाठविलेले दिसते

राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारचे हे पहिलेच तर शिंदे-फडणवीसांचे दुसरे पावसाळी अधिवेशन आहे. या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला शिंदे-फडणवीस-पवार सरकारने प्रथेप्रमाणे विरोधकांना चहापान कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. मात्र राज्यासमोरील प्रश्नांची यादी वाचून दाखवित दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत असा आरोप करत सत्ताधारी पक्षाच्या चहापानावर विरोधकांनी पत्र पाठवित बहिष्कार टाकला.

चहापानानंतर सह्याद्री अतिथीगृहात सत्ताधारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयोजित पत्रकार परिषदेला सामोरे गेले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांनी लिहिलेल्या पत्राचा संदर्भ देत म्हणाले, विरोधी पक्षाला विषयच माहिती नाही. त्यामुळे त्यांनी पत्राऐवजी एक ग्रंथ दिला, अशी टीका करत जरी सध्या विरोधी पक्ष कमकुवत असला तरी आम्ही त्यांच्याकडून उपस्थित केलेल्या प्रश्नांना योग्य उत्तरे देऊ असे सांगितले. तसेच अधिवेशनासाठी आलेल्या सर्व लक्षवेधीमधील मुद्यांचे एकत्रिकरण करून हे लांबलचक पत्र विरोधकांनी सरकारला पाठविल्याचा टोलाही लगावला.

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमची ताकद वाढली आहे. या शक्तीचा कुठेही दुरुपयोग न करता, विधिमंडळात जास्तीत जास्त चर्चा करण्यात येईल. विरोधी पक्षांच्या लोकहीताच्या प्रश्नांवर न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही ही दिली.

सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाचा निर्णय आला आहे. तरी, एकीकडे लोकशाहीच्या गप्पा मारायच्या आणि लोकशाहीने निर्माण केलेल्या संस्थांनी सरकारला कायदेशीर ठरवलं आहे. अशा सरकारला बेकादेशीर आणि असंवैधानिक म्हणायचं, हे अत्यंत चुकीचं आहे, असा आक्षेपही विरोधकांच्या म्हणण्यावर देवेंद्र फडणवीस यांनी घेतला.

राज्यातील औद्योगिक परिस्थितीवर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमचं सरकार आल्यावर उद्योग पळवण्यात आल्याचे आरोप केले गेले. पण, हे सरकार आल्यानंतर परकीय गुंतवणूकीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आला आहे. २०१९ मध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर होता. २०२० आणि २०२१ मध्ये कर्नाटक तर २०२१ आणि २०२२ मध्ये गुजरात पहिल्या क्रमांकावर गेला होता. आता पुन्हा २०२२ आणि २०२३ मध्ये महाराष्ट्र परकीय गुंतवणूकीत पहिल्या क्रमांकावर आला आहे, असा दावाही केला.

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *