Breaking News

राज्यपालांच्या राजीनाम्यानंतर शरद पवार म्हणाले, अतिशय चांगला निर्णय हा निर्णय आधीच घ्यायला हवा होता

महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज, क्रांती ज्योती महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि मुंबईबाबत अनादर व्यक्त करणारे वक्तव्य करत मराठी जनतेची मने दुखावणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना हटविण्याची मागणी सातत्याने विरोधकांकडून करण्यात येत होती. मात्र भाजपाला पोषक अशी भूमिका राज्यपाल कोश्यारी यांच्याकडून घेण्यात येत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह याच्याकडून कोश्यारी यांनी पदमुक्त करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतरही पदमुक्त केले जात नव्हते. अखेर राज्यपाल कोश्यारींनी पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात कृतीतून नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केल्यानंतर अखेर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु आणि पंतप्रधान मोदींनी मंजूर करत पदमुक्त केले. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना विचारले असता ते म्हणाले, अतिशय चांगला निर्णय, हा निर्णय आधीच घ्यायला हवा होता. माझ्या मते महाराष्ट्राची सुटका झाली अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

तसेच राज्यपालांनी संविधान विरोधी जे निर्णय घेतले होते, त्याचे काय होणार? असा प्रश्न विचारला असता शरद पवारांनी सांगितले, जर संविधानाच्या विरोधात काही झाले असेल तर त्याची चौकशी झाली पाहीजे अशी मागणी केली.

यावेळी पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, माझ्या मते महाराष्ट्राची सुटका झाली. अतिशय चांगला निर्णय. हा निर्णय आधीच घ्यायला हवा होता. महाराष्ट्राच्या इतिहासात अशी व्यक्ती कधीही राज्यपाल म्हणून झाली होती, ती आपण पाहिली. केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींनी त्यात बदल केला, ही समाधानकारक बाब आहे.

तसेच मागील महिन्यात जेव्हा राज्यपालांनी परत जाण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा देखील शरद पवार यांनी मिश्किल शब्दात त्यांना टोला लगावला होता. त्यावेळी शरद पवार म्हणाले, ते राज्यपाल पदावर दुःखी असतील, तर आम्हीही सगळे दुःखीच आहोत. महाराष्ट्राची एक परंपरा आहे. या राज्यात लोकांनी अनेक चांगले राज्यपाल पाहिले आहेत. पी. सी. अलेक्झांडर यांच्यासारखे अनेक नावं यात घेता येतील. अतिशय उच्च दर्जाचे व्यवहार असणारे लोक महाराष्ट्राला राज्यपाल म्हणून मिळाले. महाराष्ट्रात जे जे राज्यपाल झाले त्यांनी पक्ष कोणताही असो, पण राज्याच्या हितासाठी मार्गदर्शन केले आणि घटना आबाधित ठेवली. हे पहिले राज्यपाल आहेत ज्यांच्याबद्दल सतत चर्चा होते. त्यांच्यावर लोकांना सतत टीका करावी लागते असा टोला लगावला.

दरम्यान, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर केल्यानंतर राज्यभरातून भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना वगळता सर्व पक्षांकडून आनंद व्यक्त करत आहेत.

Check Also

रमेश चेन्नीथला यांचा आरोप, नरेंद्र मोदी खोट्यांचे सरदार…

देशाच्या प्रगतीत शेतकरी व कामगारांचा मोठा वाटा आहे, कामगार शक्तीच्या जोरावरच देशाने प्रगती केली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *