Breaking News

उध्दव ठाकरे यांचे खुले आव्हान, असेल हिंमत तर या मैदानात…

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे उपस्थित होते. या वेळी कार्यक्रमात बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले की, आज प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला न्यायालयात जावं लागतं आहे. मैदानासाठीही न्यायालयात जावं लागलं. हिंमत असेल तर तुम्ही मैदानात या, माझी तयारी आहे. तुम्ही दोघे मिळून आणि मीही एकाच व्यासपीठावर येतो आणि होऊन जाऊ द्या असे जाहीर आव्हान शिंदे गटासह भाजपाला दिले.

मैदानात या. मी तर लढाईच्या क्षणाची वाट पाहात आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे शिंदे गटाला लक्ष्य केलं. मर्दांच्या हाती मशाल आहे असंही यावेळी ते म्हणाले.

छगन भुजबळ आपल्या आयुष्यातील पहिल्या निवडणुकीत पराभवाला सामोरं गेल्यानंतरही आज जिद्दीने उभे आहेत. बेळगावमधील फोटो कोणी पाहिला तर माझ्यावर पुन्हा एकदा हिंदुत्त्व सोडल्याचा आरोप होईल, असे मिश्कीलपणे ते म्हणाले.

प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला न्यायालयात जावं लागत आहे. मैदानासाठीही न्यायालयात जावं लागलं. हिंमत असेल तर तुम्ही मैदानात या, माझी तयारी आहे. मी मैदानात उतरलो आहे. आम्हाला मैदान कसं मिळणार नाही यापेक्षा एका मैदानात, व्यासपीठावर येऊ आणि काय व्हायचं ते होऊन जाऊ दे असेही ते म्हणाले.

त्यानंतर पुढे बोलताना ते म्हणाले, मला आल्यानंतर फारुख साहेब भेटले. वयाचं आणि महाराष्ट्र ते काश्मीर अंतर जास्त असल्याने आमची फार काही गाठभेट होत नाही. पण बाळासाहेब आणि त्यांची चांगली मैत्री होती. आल्यानंतर त्यांनी मला अजिबात घाबरु नकोस, वडिलांसारखा लढ असं सांगितलं. मी काही लढाई सोडणार नाही. अशी अनेक वादळं शिवसेनेने अंगावर घेतली आहेत. पण त्यावेळी वादळं निर्माण करणारेही सोबत लागतात आणि ते आहेत, असे सांगत शरद पवारांकडे पाहिलं.

शिवसेनेने अनेक वादळं अंगावर घेतली होती. मात्र शरद पवार, काँग्रेस यांच्या रुपात वादळ निर्माण करणारी लोक सोबत असल्यामुळे मी तर लढाईच्या क्षणाची वाट पाहात आहे, असेही ते म्हणाले.
आपल्या भाषणात त्यांनी मिश्कील टोलेबाजी करत राष्ट्रवादी आणि काँग्रेसने महाविकास आघाडीच्या रुपात सोबत राहावे, असे आवाहन केले. छगन भुजबळ यांची ही पहिलीच पंचाहत्तरी आहे. पुढच्या पंचाहत्तरीलाही सोबतच राहा. आम्हाला कार्यक्रमाला बोलवा, असेही ते म्हणाले.

तसेच महाविकास आघाडीची सत्ता ही तुमच्या हातात आहे. नेत्याचा जयजयकार करून चालणार नाही. कार्यकर्त्यांनी सोबत यावे लागेल. ही लढाई माझ्या एकट्याची नसून सर्वांचीच आहे. ही लढाई देशाच्या दुसऱ्या स्वातंत्र्याची आहे, असे सांगत फक्त नेत्यांच्या नावाच्या घोषणा करू नका. तुम आगे बढो आणि मागे वळून बघितले तर घोषणा देणारे गायब असा मिश्किल चिमटा यावेळी कार्यकर्त्यांना काढला.

उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकार तसेच उद्धव ठाकरे गटाला मिळालेल्या मशाल या चिन्हावरही भाष्य केले. नियतीच्या मनात काय असतं हे कोणालाही माहिती नसते. आता मर्दांच्या हातात मशाल देण्याची नियतीची इच्छा आहे. प्रत्येकाचे वय वाढत असते. माणूस वयाने मोठा होत असतो. पण तो जेव्हा विचारांनी थकतो तेव्हा तो खरा वृद्ध होतो. अडीच-तीन वर्षांपूर्वी आपण एक नवे समीकरण जन्माला घातले. महाविकास आघाडीच्या रुपात आपण हे समीकरण यशस्वीपणे चालवले होते. मात्र हे पाहून एखाद्याला पोटशूळ उठणे साहजिक आहे. याच कारणामुळे आता सरकार पाडण्यात आले. सरकार पाडण्यासाठी किती खालची पातळी गाठण्यात आली, असे सांगत शिंदे गट आणि भाजपावर टीका केली.

 

Check Also

पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील दौऱ्यात महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार

भाजपाचा मित्र पक्ष जेडीएसचा लोकसभा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने शेकडो महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर लैंगिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *