Breaking News

मल्लिकार्जुन खर्गे यांना जबरदस्त आव्हान ; शशी थरुर यांना महाराष्ट्रातून वाढता पाठिंबा

काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक येत्या सोमवारी म्हणजे १७ नोव्हेंबर २०२२ रोजी होत आहे. या निवडणुकीत गांधी नेहरु परिवाराचे उमेदवार मल्लिकार्जुन खर्गे यांना ज्येष्ठ नेते शशी थरुर यांनी जबरदस्त आव्हान दिले. पी. चिदंबरम, सैफुद्दिन सोज, ए.के.ॲंथनी यांच्या सह अनेक नेत्यांच्या मुलांनी शशी थरुर यांना पाठिंबा दिला असून माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या समवेत शशी थरुर यांचे बंद दारा आड चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येते.

काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक घोषित करण्यात आल्यावर शशी थरुर यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली. आपण अथवा राहुल गांधी, प्रियांका गांधी या पैकी कुणीही ही निवडणूक लढविणार नाही, असे सोनिया गांधी यांनी स्पष्ट केले.

तसेच शशी थरुर यांनी निवडणूक लढविण्यास हरकत नाही असे सुद्धा सोनिया गांधी यांनी सांगितले. त्यानंतर थरुर यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. त्यांनी संपूर्ण देशभरात फिरुन आपला प्रचार सुरु केला. दरम्यान मल्लिकार्जुन खर्गे यांनी निवडणुकीत उतरताच गांधी नेहरु परिवाराचे उमेदवार म्हणून खर्गे हे निवडणूक लढवीत असून सर्व राज्यांत प्रदेश काँग्रेस कमिट्यांनी खर्गे यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत,असे चित्र स्पष्ट झाले.

महाराष्ट्रातही नाना पटोले आणि भाई जगताप यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांना निवडून आणण्यासाठी चंग बांधला आहे. त्यामुळे शशी थरुर यांना त्यांच्या मुंबईतील दौऱ्यात कोणतेही सहकार्य करण्यात आले नाही,असे समजते.असे असले तरी शशी थरुर यांना मुंबईत मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला असल्याचे समजते. महाराष्ट्रात सुमारे ५६० आणि मुंबईत सुमारे २०० प्रतिनिधी मतदार असून त्यांची यादी शशी थरुर यांना देण्यात आली पण त्यात एकाचाही मोबाईल नंबर दिलेला नाही, असे समजते.

मल्लिकार्जुन खर्गे हे ज्या दक्षिण भारताचे प्रतिनिधित्व करतात त्या दक्षिण भारतात शशी थरुर यांनी जबरदस्त मुसंडी मारलेली आहे. पी.चिदंबरम, सैफुद्दिन सोज इतकेच नव्हे तर सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय अशा ए.के.ॲंथनी यांच्यासह अनेक नेत्यांच्या मुलांचा शशी थरुर यांना पाठिंबा मिळाला आहे. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या बरोबर शशी थरुर यांनी बंद दाराआड चर्चा केली असल्याचे सांगण्यात येते. शशी थरुर यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांना एका मंचावर येऊन आपापली भूमिका मतदारांसमोर मांडण्याची सूचना केली होती पण ती त्यांनी मान्य केली नसल्याचे समजते. एकूणच शशी थरुर यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांना कडवे आव्हान उभे केले असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Check Also

नाना पटोले यांची टीका,… हा तर छत्रपती शिवरायांचा अपमान

हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षाकडून सातत्याने केला जात आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *