Breaking News

काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, बीबीसी हे केवळ उदाहरण..पण सत्ताधारी वसाहतवादी मानसिकतेचे… २०२४ ची निवडणूक बेरोजगारी, मुठभर धनिकांच्या हातात एकवटलेली संपत्ती, लघु-कुटीर उद्योगांचा झालेला नाश यासारख्या मुद्द्यावर लढली जाणार

बीबीसी डॉक्युमेंट्रीचा वाद आणि त्यावर प्रतिक्रिया देत असताना सत्ताधाऱ्यांकडून वसाहतवादी मानसिकतेचा आरोप करण्यात आला, यावर प्रश्न विचारला असता राहुल गांधी म्हणाले, हे प्रकरण अदाणी यांच्यासारखेच आहे. ते देखील वसाहतवादी मानसिकतेचे लक्षण होते. ज्या ज्या ठिकाणी विरोध होतो, तिथे तिथे त्यांच्याकडून कारणे देण्यात येतात. खरेतर देशभरात विरोधातला आवाज दडपण्याचा प्रयत्न होत आहे. बीबीसी हे केवळ एक उदाहरण आहे. बीबीसीला आता याबद्दल माहिती मिळाली, परंतु गेल्या नऊ वर्षांपासून भारतात हेच सुरू आहे. पत्रकार भेदरलेले आहेत. त्यांना धमकी देऊन हल्ला केला जातो. याउलट जे सरकारचे गुणगान गातात, त्यांना बक्षिसी दिली जाते. हे आता समीकरणच बनले आहे. जर बीबीसीने सरकारविरोधात लिहिणे बंद केले तर सर्व सुरळीत होईल. सगळी प्रकरणे हवेत विरून जातील आणि सर्वकाही सामान्य होईल. ही नव्या भारताची नवी संकल्पना आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लंडनमधील भारतीय पत्रकार संघटनेच्यावतीने घेण्यात आलेल्या मुलाखती दरम्यान विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी वरील माहिती दिली.

राहुल गांधी पुढे म्हणाले की, भारत शांत राहावा अशी भाजपाची इच्छा आहे. त्यांना वाटते, दलित, निम्न जाती, आदिवासी, माध्यमे सर्वांनी शांत राहावे आणि या शांततेनंतर त्यांना जे काही भारताचे आहे, ते हिसकावून घ्यायचे आहे आणि आपल्या मित्रांना द्यायचे आहे. लोकांचे लक्ष विचलित करायचे आणि जी काही भारताची संपत्ती आहे, ती दोन-चार लोकांमध्ये वाटून टाकायची. ही खरी तर यामधली गोम आहे. माध्यमांची मुस्कटदाबी करण्याचा असा प्रकार यापूर्वी कधीही घडला नव्हता. संस्थात्मक रचनेवरदेखील पूर्ण क्षमतेने हल्ला होत आहे, याआधी आधुनिक भारतात असे कधीही पाहायला मिळाले नव्हते.

भारतात भाजपाविरोधात खूप रोष असल्याचे सांगताना राहुल गांधी म्हणाले, २०२४ च्या निवडणुका बेरोजगारी, मुठभर धनिकांच्या हातात एकवटलेली संपत्ती, लघु-कुटीर उद्योगांचा झालेला नाश यासारख्या मुद्द्यावर लढली जाणार आहे. यामध्ये विरोधक एकत्र येऊन कसे लढा देतात, हे देखील महत्त्वाचे असेल. आपल्याकडील काही राज्ये स्वतंत्रपणे काम करत आहेत. पण मला असे वाटते की वेगळ्या कल्पनेने जर विरोधक एकजूट झाले तर भाजपाच्या विरोधात निवडणुकीत चांगली कामगिरी करता येईल. विरोधी पक्षांच्या एकजुटीबाबत बराच समन्वय आहे. विरोधकांमध्ये नियमित संवाददेखील होत आहे. आरएसएस आणि भाजपाला पराभूत करण्याची आवश्यकता आहे, ही कल्पना विरोधी पक्षांच्या मनात खोलवर रुजली आहे. रणनीती म्हणून काही मुद्द्यांवर चर्चा होणे आवश्यक आहे. काही राज्ये यासाठी अनुकूल आहेत, पण काही राज्यांमध्ये थोडी अडचण असली तरी चर्चा, संवाद या माध्यमातून आम्ही मार्ग काढण्यासाठी सक्षम आहोत.

भारत जोडो यात्रा आणि काँग्रेसची भविष्यातील रणनीती याबाबत राहुल गांधी यांना विचारले असता ते म्हणाले की, यात्रेमधून निश्चितच काही कल्पना आमच्यासमोर आल्या आहेत. पण यावर पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे बोलतील. सध्या आमची पक्षांतर्गत चर्चा सुरू आहे. आम्ही विरोधकांना सोबत घेऊन पुढे चालू. आताच सर्वकाही सांगून मी आश्चर्याचा भंग करू इच्छित नाही.

परदेशात जाऊन भारताची बदनामी केली असा आरोप भाजपाकडून राहुल गांधी यांच्यावर करण्यात येत आहे. याबद्दल विचारले असता गांधी म्हणाले, केंब्रिजच्या व्याख्यानात मी असे काहीही बोललो नाही, ज्यामुळे भारताची बदनामी होईल. मला आठवत आहे, जेव्हा पंतप्रधान परदेशात जाऊन स्वातंत्र्यानंतरच्या ७० वर्षात भारतात काहीच झाले नाही, हे सांगत होते. तसेच मला हेही आठवत आहे की, त्यांनी भारताने गमावलेले दशक, ज्या काळात अमर्यादित भ्रष्टाचार झाला, असेही म्हटले होते. पण मी असे काहीही बोललो नाही, ज्यामुळे भारताची मान खाली जाईल. परंतु जी व्यक्ती परदेशात जाऊन भारताचा अवमान करत आहे, ती व्यक्ती भारताच्या पंतप्रधानपदावर बसलेली आहे.

Check Also

पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील दौऱ्यात महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार

भाजपाचा मित्र पक्ष जेडीएसचा लोकसभा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने शेकडो महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर लैंगिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *