प्रताप सरनाईक यांची घोषणा, एसटी महामंडळ यात्री ॲप आणणार एसटी बरोबरच प्रवाशी वाहतूकीसाठी यात्री ॲप बनविणार

चालकांना सन्मानजनक मोबदला आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देणारे राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप लवकरच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) मार्फत सुरू करण्यात येत आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

मंत्रालयात आयोजित केंद्र व राज्य शासनाच्या प्रवासी वाहतुकीविषयी ॲग्रीगेटेड पॉलिसीच्या (समुच्चयक धोरण) अधीन राहून राज्य शासनाचे ‘यात्री ॲप’ बनवण्याच्या अंतिम मसुद्यावरील बैठकीत मंत्री प्रताप सरनाईक बोलत होते. या बैठकीला आमदार प्रवीण दरेकर, परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर व इतर अधिकारी उपस्थित होते.

यात्री ॲप चालविण्यासाठी एसटी महामंडळाची प्रवाशांप्रती असलेली निष्ठा आणि वर्षानुवर्षापासूनची विश्वासार्हता उपयोगी पडणार असून उत्पन्नाचा नवा स्त्रोत निर्माण होणार आहे, असेही मंत्री प्रताप सरनाईक सांगितले.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, मराठी तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, भरमसाठ नफा कमावून प्रवासी व चालकांना वेठीस धरणाऱ्या खासगी कंपन्यांच्या जोखडातून मुक्त करण्याच्या प्रामाणिक हेतूने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रवासी अ‍ॅप बस, रिक्षा, टॅक्सी व ई-बस या वाहन सेवेकरीता सुरू करण्याचे निश्चित केले आहे. हे ॲप परिवहन विभागाच्या सहकार्याने एसटी महामंडळामार्फत सुरू करण्यात येईल. भविष्यात एसटी महामंडळाला उत्पन्नाचा नवा स्त्रोत निर्माण करणे व प्रवाशांना एक विश्वासार्ह सेवा उपलब्ध करून देणे हा उद्देश समोर ठेवून हे ॲप एसटी महामंडळाने नियंत्रित करावे, असेही परिवहन मंत्री श्री.सरनाईक यांनी यावेळी सांगितले.

‘छावा राईड ॲप’ नाव देण्याचे सर्वानुमते निश्चित झाले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंतिम मान्यतेने हे ॲप लवकरच कार्यान्वित करण्यात येईल, असेही श्री. सरनाईक म्हणाले.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, केंद्र सरकारच्या अ‍ॅग्रीगेटर मार्गदर्शक तत्वानुसार या ॲपची नियमावली अंतिम टप्यात आहे. सध्या खासगी संस्था अनधिकृत ॲपच्या माध्यमातून प्रचंड नफा कमवतात. त्यासाठी त्या कंपन्या चालक व प्रवासी यांची लूट करीत आहेत. एसटी महामंडळाकडे यंत्रणा, तंत्रज्ञान आणि मनुष्यबळ व जागा मुबलक प्रमाणात असल्यामुळे असे ॲप विकसित केल्यास त्याचा फायदा प्रवाशांबरोबर एसटी महामंडळाला देखील होईल.

एसटी महामंडळातर्फे नियंत्रित ॲपद्वारे रोजगाराची संधी मिळणाऱ्या मराठी तरुण- तरुणींना मुंबै बँकेच्या माध्यमातून विशेष आर्थिक पाठबळ देण्यात येईल, असे बॅंकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी सांगितले. या तरुण-तरुणींना रोजगार देण्यासाठी मुंबई बँकेच्या माध्यमातून वाहन खरेदीसाठी १० टक्के व्याजदराने कर्ज दिले जाईल. तसेच विविध आर्थिक विकास महामंडळे यांच्या माध्यमातून व्याज परतावा अनुदानाच्या स्वरूपात देण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा केला जाणार असल्याने हे कर्ज बिनव्याजी असल्यासारखे असेल, असेही आमदार प्रवीण दरेकर यांनी सांगितले.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, मनसेसोबतच्या युतीसंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा नाही नगरपालिका निवडणुकांसाठी काँग्रेसकडे ३५ हजार इच्छुक उमेदवारांचे अर्ज; १२ तारखेच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत निर्णय

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर युती वा आघाडीसंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *