Breaking News

प्रकाश आंबेडकर- उध्दव ठाकरेंच्या एकत्र येण्यावर भाजपा म्हणते, फरक पडत नाही

काल रविवारी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे पहिल्यांदाच प्रबोधनकार ठाकरे डॉट कॉम या संकेतस्थळाच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने एकत्र आले. तसेच एकत्र आल्यानंतर उध्दव ठाकरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना थेट प्रकाशजी आपल्या दोघांना मिळून या गोष्टी करायच्या आहेत. त्यासाठी आपल्याला बसावं लागेल चर्चा करावी लागेल असं सांगत एकप्रकारे आगामी निवडणूकीत एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत दिले. या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपाची भूमिका मांडताना म्हणाले, कितीही पक्ष एकत्र आले तरी भाजपाला फरक पडत नाही.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी चंद्रशेखर बावनुकळे यांनी वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटाच्या संभाव्य युतीबाबत भाष्य केले. या दोन्ही पक्षांनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा अधिकार आहे. त्यांना युती करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे मी यावर बोलणे योग्य ठरणार नाही. पण भाजपा आणि शिंदे गटाने देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली ५१ टक्क्यांची तयारी केली आहे. त्यामुळे कितीही पक्ष एकत्र आले तरी भाजपाला त्याचा फरक पडणार नाही, असेही स्पष्ट केले.

देशात लोकशाही टिकणार की नाही टिकणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. देशाच्या लोकशाहीचे आधारस्तंभ मानल्या जाणाऱ्या व्यवस्थांबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. प्रकाशजी आपल्याला एकत्र यावं लागेल, असं उद्धव ठाकरे म्हणाले. मतदारांच्या जीवावर सरकार उभं असतं. मतदारांच्या जनजागृतीचं काम आपल्याला करावे लागेल, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी रविवारी एका कार्यक्रमात प्रकाश आंबेडकर यांना युतीची साद घातली होती.
आम्ही एकत्र कधी येणार हे एकाच गोष्टीवर अवलंबून आहे. निवडणूक कधी होणार यावर अवलंबून आहे. निवडणूक ताबडतोब होणार असेल तर आम्ही ताबडतोब एकत्र येऊ, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. त्यामुळे महाराष्ट्रात आगामी काळात शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी निवडणुकीच्या राजकारणात एकत्र येणार का यासंदर्भात चर्चांना सुरुवात झाली आहे.

आगामी काळात ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र आल्यास महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. २०१९ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी काय करू शकते, याची चुणूक प्रकाश आंबेडकर यांनी दाखवून दिली आहे. त्यामुळे वंचित आणि ठाकरे गटाची युती झाल्यास आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला (ठाकरे गट) काहीप्रमाणात फायदा होऊ शकतो. मुंबईत दलित मतदारांचा टक्का मोठा आहे. मुंबईतील अनेक परिसर दलित व्होटबँकेची पॉकेटस मानली जातात. या भागांमध्ये आंबेडकरी विचारांच्या पक्षांना मोठा पाठिंबा आहे. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत या भागांमध्ये ठाकरे गटासाठी वंचितची साथ मोलाची ठरू शकते. भाजपा, शिंदे गट आणि मनसे एकत्र असल्यास उद्धव ठाकरे यांच्यासाठी वंचित फॅक्टर निर्णायक ठरु शकतो.

Check Also

मेहबूबा मुफ्ती यांचे निवडणूक आयोगाला पत्रः कार्यकर्त्यांना अटक करण्याचे थांबवा

जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) च्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *