Breaking News

शरद पवारांचा पंतप्रधान मोदींना टोला, देशाचे नेतृत्व करतो याचे भान ठेवले पाहिजे ८२ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार समारंभाला उत्तर देताना दिले लगावला टोला

आज आपण अडचणीच्या काळातून जात आहोत. त्यामध्ये भाजपाचे राज्य आहे. लोकशाहीच्या मार्गाने राज्य आल्यानंतर त्याला विरोध करायचा नसतो. ती समाजहिताची नसतील तर त्याच पध्दतीची भूमिका घ्यायची असते. परंतु राज्यकर्त्यांनी सुध्दा संबंध देशातील प्रांताकडे बघताना आपण देशाचे नेतृत्व करतो याचे भान ठेवले पाहिजे असे खडेबोल शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता सुनावले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या ८२ व्या वाढदिना निमित्त आयोजित राष्ट्रवादीकडून आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात केलेल्या सत्काराला उत्तर देताना शरद पवार बोलत होते.
यावेळी पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, नागपूरच्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी आपल्या भाषणात फार मोठ्या प्रमाणावर विरोधकांवर टीका केली. जाहीर सभेला पक्षाच्यावतीने गेले, निवडणूक प्रचाराला गेले आणि पक्षाची भूमिका मांडतात तो विरोधकांवर टिका टिपण्णी करण्याचा शंभर टक्के अधिकार आहे. रेल्वे, रस्ते उद्घाटन, हॉस्पिटल उद्घाटन आणि सरकारी कार्यक्रमाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान ज्यावेळी करतात त्या व्यासपीठावर विरोधकांवर टीकाटिपण्णी ही जर भूमिका मांडतात हे कितपत शहाणपणाचे आहे असा सवालही केला.

मी अनेक पंतप्रधानांचे कार्यक्रम पाहिले, भाषणे ऐकली आहे. अगदी जवाहरलाल नेहरूंपासून आणि त्यानंतरचे पंतप्रधान असोत निवडणूकीच्या प्रचाराला गेल्यानंतर विरोधी पक्षाची सरकारे असली तरी नेहरूंनी त्यांच्या विरोधकांवर कधी टिका केली नाही. आपली भूमिका मांडली पण विरोधक, विरोधी पक्षनेता, विरोधी पक्ष, यासुध्दा लोकशाहीच्या संस्था आहेत. त्या संस्थांचा सन्मान ठेवला पाहिजे. या सगळ्या भूमिका देशाच्या स्वातंत्र्यलढ्यानंतरच्या पंतप्रधानांनी पाळल्या परंतु आता पाळले जात नाही याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्यांनी काही गोष्टी सांगितल्या. समृद्धी रस्त्याला विरोधकांनी विरोध केला. मला माहिती नाही कुणी विरोध केला. माझा एक अनुभव सांगतो, मी औरंगाबादला गेलो असताना शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने माझी भेट घेतली. हा जो रस्ता होतोय त्यामध्ये जमिनी घेत आहेत. त्या जमिनीची रास्त किंमत देत नाही हे ऐकल्यानंतर मी स्वतः त्यावेळी मुख्यमंत्री होते त्यांना कॉल केला आणि हा विकासाचा प्रकल्प आहेत तो होत असेल तर विरोध नाही. परंतु ज्यांच्या जमिनी घेत आहात त्यांचे आयुष्य व उत्पन्नाचे साधन आहे. त्यांना रास्त किंमत द्या आणि त्यांना सन्मानाने जगता येईल असे सुचवले होते. मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कधी विरोध केला नाही असेही शरद पवार यांनी स्पष्ट करतानाच सत्ताधारी सांगून टाकत आहेत की, आम्ही चांगलं काम करतोय पण विरोधकांचा विरोध आहे याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

मध्यंतरी काही प्रकार झाले आणि जो काही प्रकार झाला ते योग्य नाही त्याचे मी समर्थन करणार नाही. विरोधकांवर टिका करायचा अधिकार आहे, तसा सत्ताधाऱ्यांवर टिका केली पाहिजे परंतु टिका करणे म्हणजे अंगावर शाईफेक करणे हा नव्हे. आम्ही याचे समर्थन कधी करणार नाही. परंतु शाईफेक झाल्यावर त्या उच्च शिक्षणमंत्र्यांनी बोलणे केले नसते तर असा प्रकार झाला नसता. त्यांनी फुले, आंबेडकर, कर्मवीर, यांचा उल्लेख केला. फुले आणि आंबेडकरांचे जीवन संपूर्ण देशाला माहित आहे. भाऊराव पाटील यांनी आपलं आयुष्य ज्ञानादानासाठी घालवलं. पैसे नसतानासुद्धा आपल्या पत्नीचे दागिने विकून शिकणार्‍या मुलांचे दोनवेळच्या जेवणाची व्यवस्था केली याची आठवण करून देतानाच शरद पवार यांनी ‘कमवा आणि शिका’ हे ब्रीद वाक्य असलेल्या रयत मध्ये मी अध्यक्ष आहे. गेली ५० वर्षे त्या संस्थेत महत्त्वाच्या जबाबदारीवर आम्ही काम करतो. हे काम करत असताना आम्ही राजकीय पक्षाचे जोडे कधी घालत नाही. तिथे सामान्य कुटुंबातील मुलामुलींना दालन कसे खुले राहिल, त्यांना दर्जेदार शिक्षण कसे मिळेल असा प्रयत्न असतो. अशा संस्थां किंवा महात्मा फुले, आंबेडकराबाबत बोलताना भीक मागणे हा शब्द वापरला नसता तर असे घडले नसते. ठीक आहे झाले ते झाले. परंतु लगेच गिरणी कामगारांचा मुलगा आहे म्हणून दाखवले. मंत्रिमंडळात मंत्री होतात. अध्यक्ष होतात आणि आताही मंत्री आहात आणि सामान्य कुटुंबातील व्यक्ती ही सत्तेपर्यंत पोचलेले उदाहरण तुमचेच आहे का? असा सवालही त्यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांना करत कितीतरी लोक असे आहेत, त्यांच्यावर टिका टिपण्णी झाली परंतु त्यांनी हा कांगावा कधी केला नाही हे दुर्दैव आहे. हे कधी घडलं नसते तर चांगले झाले असते मी याचे समर्थन करत नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या सर्व मित्रांना मग ते कोणत्याही पक्षाचे असोत टिका होईल. परंतु शाई टाकणे व तत्सम हे काम कधी करणार नाही ही भूमिका आपण घेऊ आणि महाराष्ट्राची जी एक सुसंस्कृत परंपरा आहे ती टिकवू आणि याची काळजी घेऊ असे आवाहनही शरद पवार यांनी केले.

मी ८३ व्या वर्षात पदार्पण करतोय याची आठवण का करून देता?

शरद पवारसाहेब यांचा ८२ वा वाढदिवस यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आज पक्षाच्यावतीने साजरा करण्यात आला. यावेळी राज्यभरातून व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून पवारसाहेबांना अनेक ज्येष्ठ नेत्यांनी शुभेच्छा दिल्या.
आज मला सन्मानित केलात याचा आनंद आहे. माझी वयाची ८२ वर्षे पूर्ण झाली आणि ८३ व्या वर्षात पदार्पण करतोय याची आठवण का करुन देता अशी मिश्किल टिपण्णी भाषणाच्या सुरुवातीला आदरणीय शरद पवार यांनी करताच सभागृहात एकच हंशा पिकला.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक कर्तृत्ववान नव्या पिढीचे प्रतिनिधी आहेत. त्यांच्यामार्फत महाराष्ट्राचा गाडा नीटनेटका चालवावा अशी अपेक्षा ठेवली तर चुकीचे नाही असे कर्तृत्व त्यांच्यामध्ये आहे. त्यामुळे साहजिकच अशा लोकांना प्रोत्साहित करण्याची भूमिका घेतली पाहिजे आणि त्यात अधिक लक्ष घालून याची जाणीव करून देण्यासाठी हा सोहळा याठिकाणी आयोजित केला आहे. मी आणि माझ्या आसपासच्या वयाचे लोक नव्या पिढीला प्रोत्साहित करण्याची भूमिका अखंडपणे केल्याशिवाय राहणार नाही असा आत्मविश्वास दिला.

Check Also

नाना पटोले यांची टीका,… हा तर छत्रपती शिवरायांचा अपमान

हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षाकडून सातत्याने केला जात आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *