नाना पटोले यांचा खोचक सवाल, …भाजपा आणि देवेंद्र फडणवीस कधी मागणार? डिसकव्हरी ऑफ इंडियाबाबत भाजपाकडून सातत्याने खोटे बोलून अपप्रचार

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा’ असा नारा दिला, त्याच आधारावर राहुल गांधी यांनी आयर्न लेडी इंदिरा गांधींच्या नावाने राजकारणात महिला सशक्तीकरणासाठी महत्वाचे पाऊल उचलले आहे. इंदिरा गांधी फेलोशिपअंतर्गत महिला सशक्तीकरणासाठी ‘शक्ती अभियान’ सुरु करण्यात आले असून महाराष्ट्रात या अभियानाची सुरुवात आजपासून करण्यात येत असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

टिळक भवन येथे ‘शक्ती अभियानाचा’ शुभारंभ केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, एक वर्षापूर्वी सुरु केलेल्या शक्ती अभियानाला राज्यातून चांगला प्रतिसाद मिळाला असून प्रदेश काँग्रेस हे अभियान मोठ्या ताकदीने राबवणार आहे. या अभियानात महाराष्ट्रातील आयेशा खान, अनुष्का वानखडे, रोहिणी धोत्रे, विजया दुर्धवळे, मीना धोदडे यांनी सहभाग घेऊन उत्तम कामगिरी केली आहे. हे अभियान जिल्हा, तालुका, ब्लॉक स्तरावर राबवले जाणार आहे. महिला नेतृत्व पुढे आले पाहिजे यासाठी हे अभियान सुरु करण्यात आले आहे. सोनिया गांधी यांच्या पुढाकाराने काँग्रेसने महिला आरक्षण विधेयक आणले त्यावेळी याच भाजपाने त्याला विरोध केला होता पण मोदी सरकारने ते विधेयक पुन्हा आणले असता काँग्रेसने मात्र त्याला पाठिंबा दिला. पण मोदी सरकारने फक्त विधेयक मंजूर केले आरक्षणाची अंमलबाजवणी केली नाही कधी करणार ते ही सांगितले नाही काँग्रेस पक्ष मात्र सरकार आल्याबरोबर महिला आरक्षणाची अंमलबजावणी करेल असे आश्वासनही यावेळी दिले.

मालवणातील राजकोट घटनेबद्दल फडणवीस केव्हा माफी मागणार ?

नाना पटोले पुढे बोलताना म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंडित नेहरुंनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या लिखाणाचा मुद्दा उपस्थित करुन राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी केली. देवेंद्र फडणवीस यांचा अभ्यास कच्चा आहे. पंडित जवाहरलाल नेहरु यांनी तुरुंगात शिक्षा भोगत असताना जे लिखाण केले त्याची नंतर माहिती घेऊन दुरुस्ती केली व माफी सुद्धा मागितली. भाजपा शिवाजी महाराजांचा वापर केवळ मते मिळवण्यासाठी करत असते. मालवणमध्ये महाराजांचा पुतळा कोसळून अवमान केला, कोट्यवधी शिवप्रेमींच्या मनाला वेदना झाल्या पण अद्याप देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली नाही, फडणवीस केंव्हा माफी मागणार? असा सवालही यावेळी केला.

पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले की, भाजपाला छत्रपती शिवाजी महाराजांचा विचारच मान्य नाही. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला त्यावेळी याच पेशवाईवृत्तीने विरोध केला होता आणि आजही त्याच पेशवाई विचाराचे राज्य महाराष्ट्रातही आहे. शिवाजी महाराजांचे विचार हीच प्रवृत्ती संपवत आहे. २०१९ मध्ये स्वयंभू विश्वगुरु, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते व देवेंद्र फडणवीस त्यांच्यासोबत अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे जलपूजन करण्यात आले, त्याचे काय झाले? याचे उत्तर फडणवीस यांनी द्यावे अशी मागणीही यावेळी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, मोदी खरे कधी बोलतात का? ते तर सातत्याने खोटेच बोलतात. फोडाफोडीचे राजकारण तर भारतीय जनता पक्ष व नरेंद्र मोदी स्वतःच करत आहेत. पण आरोप मात्र काँग्रेसवर करत आहेत. मोदींचा काँग्रेसवरचा आरोप म्हणजे ‘उलटा चोर कोतवाल को डांटे’ असा आहे. भाजपा व मोदी हे गांधी-नेहरु कुटुंबाला शिव्या देण्याचेच काम करत असतात. ११ वर्षात मोदींनी काय केले ते सांगावे? असे आव्हानही यावेळी दिले.

हरियाणा व जम्मू काश्मीरच्या ‘एक्झीट पोल’वर बोलताना नाना पटोले म्हणाले की, महाराष्ट्राने लोकसभा निवडणुकीवेळीच परिवर्तनाची भूमिका घेतली ते मतपेटीतून दिसले आहेच, विधानसभेला यापेक्षा चांगले परिणाम दिसतील. खोक्याचे असंवैधानिक सरकार उखडून टाकण्याची जनतेची मानसिकता आहे. हरियाणा आणि जम्मू काश्मीरपेक्षा चांगले परिणाम महाराष्ट्र विधानसभेला दिसतील, असा विश्वासही या वेळी व्यक्त केला.

ड्रगच्या माफीयांसंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, ड्रग माफिया ललित पाटील हा भाजपा सरकारचाच माणूस आहे, त्याच्या विरोधात काँग्रेसने आवाज उठवला होता. नाशिकच्या पोलिसांनी त्याला अटक केली नाही तर मुंबई पोलिसांनी अटक केली होती. पण ससून हॉस्पिटलमध्ये त्याला फाईव्हस्टार सुविधा देण्यात आल्या होत्या. महाराष्ट्राला ड्रग हब बनवून तरुण पीढी बरबाद करण्याचे पाप भाजपा सरकार करत असल्याची टीकाही यावेळी केली.

या पत्रकार परिषदेला प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश अध्यक्ष वजाहत मिर्झा, शक्ति अभियानाचे राष्ट्रीय संयोजक, अॅड. संदीप पाटील ढवळे, महाराष्ट्र समन्वय अॅड. फ्रिडा निकोलस, अॅड. दीपक तलवार, अॅड. गौरी छाबरिया आदी उपस्थित होते.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, मनसेसोबतच्या युतीसंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा नाही नगरपालिका निवडणुकांसाठी काँग्रेसकडे ३५ हजार इच्छुक उमेदवारांचे अर्ज; १२ तारखेच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत निर्णय

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर युती वा आघाडीसंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *