Breaking News

मराठी भाषेवरून राज्य सरकारवर पुन्हा नामुष्की समुह गीता दरम्यान स्पीकर बंद आणि सातवे कडवे वगळल्यावरून विरोधकांचे रणकंदन

मुंबई : प्रतिनिधी

मराठी राजभाषा दिन साजरा करण्यासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या सदस्यांच्यावतीने सुरेश भट लिखित महाराष्ट्राच्या गौरव गीत गाण्यात आले. मात्र या समुह गीत कार्यक्रमा दरम्यान लाऊड स्पीकरच बंद पडण्याची घटना घडली. तसेच त्या गौरव गीतातील सातवे कडवे राज्य सरकारने वगळल्याने राज्य सरकारवर पुन्हा नामुष्कीची वेळ आली. त्यातच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी विधानसभेत चांगलेच रणकंदन करत राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले. त्यामुळे सभागृहाचे कामकाज दोनवेळा तहकूब करावे लागले.

विधानसभेचे कामकाज सुरु होताच याप्रश्नावरून विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी लाऊड स्पीकर बंद पडण्याची आणि गौरव गीतातील सातवे कडवे वगळण्यावरून प्रश्न उपस्थित करत मराठी भाषा दिनीच मराठीचा खून करण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात येत असल्याचा आरोप केला. तसेच सरकारने याप्रश्नी पुन्हा सभागृहाची माफी मागावी अशी मागणी केली.

यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार, जयंत पाटील यांनीही या नामुष्कीबद्दल राज्य सरकारने माफी मागावी अशी मागणी केली.

त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहा क़डव्यांची कविता आघाडी सरकारनेच छापली आहे. त्यानुसारच या गीताचे वाचन करण्यात आल्याचे स्पष्ट केले.

त्यावर विरोधकांनी माफीची मागणी उचलून धरत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे सुरुवातीला १५ मिनिटासाठी आणि नंतर एकदा १५ मिनिटांसाठी तहकूब करावे लागले.

शेवटी सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे म्हणाले की, सुरेश भट यांच्या काळातच सहा कडव्याच्या गीताला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे सातवे कडवे वगळल्याचा प्रश्न उद्भवत नसल्याचे सांगत त्यांनी या गोंधळावर पडदा टाकला.

 

Check Also

पंतप्रधान मोदींच्या आमंत्रणावर शरद पवार यांची स्पष्टोक्ती, …राजकिय असोसिएशन कधीही नाही

लोकसभा निवडणूकसाठी आजपर्यंत तीन टप्प्यात मतदान झाले. या तिन्ही टप्प्यातील मतदानाची आकडेवारी पाहिली तर ती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *