Breaking News

शिवसेनेपाठोपाठ आता काँग्रेस, राष्ट्रवादीचाही किसान सभेच्या मोर्चाला पाठिंबा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे होणार सहभागी, विखे-पाटीलही सहभागी होण्याची शक्यता

मुंबई : प्रतिनिधी

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नी मोर्चा डाव्यांच्या किसान सभेने काढलेल्या मोर्चाला आता शिवसेनेपाठोपाठ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा जाहीर केला आहे. त्याचबरोबर या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे सहभागी होणार आहेत. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील सहभागी होणार असल्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर शेत मालाला हमी भाव मिळावा या उद्देशाने काँग्रेसकडून जनआक्रोश मोर्चा तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. मात्र यातील काही ठिकाणचा अपवाद वगळता या दोन्ही काँग्रेसच्या शेतकऱ्यांच्या मोर्चाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता या दोन्ही काँग्रेसकडून परिवर्तन यात्रेची सुरुवात लवकरच करण्यात येणार आहे.

याउलट डाव्यांच्या किसान सभेने अर्थात डाव्या पक्षांनी राज्यभरात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर फारसा गाजावाजा न करता आंदोलनास सुरुवात केली. त्याची परिणती त्यांच्या विधान भवनावरील यशस्वी मोर्चात होण्याची शक्यता अधिक आहे. दुसऱ्याबाजूला या दोन्ही काँग्रेसकडून नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विधिमंडळावर मोर्चा काढण्यात आला. मात्र हा मोर्चा नागपूरातूनच काढण्यात आला. मात्र डाव्यांनी  नाशिकपासून सुरु होत मुंबईतल्या विधानसभेवर काढण्यात येत आहे. या मोर्चात सर्व कष्टकरी भूमिहीन शेतकरी, शेतमजूर, शेतकरी हे सहभागी असून त्यास चांगला प्रतिसादही आहे.

त्यामुळेच या मोर्चाला शिवसेनेने सर्वात आधी पाठिंबा देत इतर राजकिय पक्षांवर कुरघोडी केली. त्यामुळे या मोर्चापासून स्वत:ला लांब ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेस,राष्ट्रवादीलाही अखेर पाठिंबा देण्याशिवाय पर्याय राहीला नाही.

या मोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांनी व्टीट करून दिली. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी किसान सभेचे लाँग मोर्चाला पाठिंबा असल्याचे जाहीर करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हट्टीपणा सोडून शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात असे आवाहन केले आहे.

Check Also

मेहबूबा मुफ्ती यांचे निवडणूक आयोगाला पत्रः कार्यकर्त्यांना अटक करण्याचे थांबवा

जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) च्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *