Breaking News

उध्दव ठाकरेंची टीका, सध्याची राज्याची अवस्था म्हणजे कोणीही यावे आणि…

वृद्धाश्रमात ज्यांना जागा नाही त्यांना राज्यपाल म्हणून पाठवायचे हेच अत्यंत चुकीचे आहे. अशा राज्यपालांना हटवा. अधिक चांगला वृद्धाश्रम असेल तर तेथे पाठवा पण हे सॅम्पल आमच्याकडे नको अशा खोचक शब्दात छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी  यांच्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सडकून टिका केली.

तसेच सध्या राज्याची अवस्था म्हणजे कोणीही यावे आणि टपली मारून जावे अशी अवस्था असल्याची खोचक टीकाही त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली.

मातोश्री या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत उध्दव ठाकरे बोलत होते.

यावेळी बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले, या राज्यपालांना हटविण्यासाठी राजकीय पक्ष भेद सोडून महाराष्टप्रेमी जनतेला एकत्र येण्याचे आवाहन आपण येत्या चार-पाच दिवसात जनतेला करणार असून राज्यपालांच्या वक्तव्याच्या विरोधात एकतर महाराष्ट्र बंद किंवा इतर स्वरूपातील आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा दिला.

राज्यपाल हे राष्टपतींचे दूत असतात म्हणून त्यांनी काहीही बोलावं हे खपवून घेणार नाही. राज्यपालांनी कसं वागावं कसं काम करावं याबाबत नियम असायला हवेत. मंत्रीमंडळाने शिफारशी केल्यानंतर किती दिवसात नियुक्त्या करायला पाहिजेत याबाबतीतही नियम असावेत असे ठाकरे यांनी यावेळी सांगितले. राज्यपाल कोश्यारी यांनी याअगोदर मराठी माणसांचा अवमान केला. महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीमाई  फुले यांचा अवमान केला. महाराष्ट्रातील महापुरूषांचा अवमान होतो आमच्या दैवतांचा अवमान होतो. तेव्हा मी त्यांना कोल्हापुरी चप्पल दाखविण्याची वेळ आली असे सांगितले होते यांची ठाकरे यांनी आठवण करून दिली.

देशाचे कायदामंत्री सांगतात देशाच्या न्यायमुर्तींच्या नियुक्त्या करण्याचे अधिकार पंतप्रधानांना हवेत. याचे उत्तर न्यायमुर्तींनीच दिले. मात्र देशाचा कायदामंत्री जर असे बोलत असेल तर न्यायाची काय अपेक्षा करणार असा सवाल यावेळी ठाकरे यांनी केला. मात्र टी एन शेषन सारखा अधिकारी या देशाला हवा असे न्यायमुर्तींनीच सांगितले. एकाबाजूला मंत्री न्यायपालिकेवर अविश्वास दाखवतो तर दुसऱ्याबाजूला न्यायालय सुनावणी घेत आहे. तसेच राज्यपालांच्या नियुक्त्यांसदर्भात न्यायालयाने सुनावणी घेवून राज्यपाल नियुक्तीचे निकष ठरवावेत अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मिंधे सरकार असा उल्लेख करीत उद्धव ठाकरे म्हमाले की, महाराष्ट्राची अवस्था कोणी यावं टपली मारून जावं अशी झाली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री काही बोलतात हे चालणार नाही पण त्याला मिळमिळीत उत्तरे देतात. महाराष्ट्रातले उद्योग बाहेर चाललेत महाराष्ट्र उघडा पडतोय अशा वेळी मुख्यमंत्र्यांकडून काय अपेक्षा करणार असा सवाल करीत त्यांनी शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली.

Check Also

पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील दौऱ्यात महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार

भाजपाचा मित्र पक्ष जेडीएसचा लोकसभा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने शेकडो महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर लैंगिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *