Breaking News

दिशा सालियनप्रकरणी फडणवीसांच्या घोषणेनंतर अजित पवार म्हणाले, तीच्या आईवडीलांची तरी… सीबीआयला त्यात काही आढळून आले नाही

विरोधकांच्या फोन टॅपिंगच्या मुद्याला प्रत्युत्तर म्हणून शिंदे गट आणि भाजपाने पध्दतशीरपणे विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी दिशा सालियन आत्महत्या प्रकरण बाहेर काढले. तसेच सत्ताधारी आमदारांच्या मागणीनुसार गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा तपास एसआयटी मार्फत करण्याची घोषणाही विधानसभेत केली. मात्र फडणवीसांच्या या घोषणेनंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सालियनच्या आई-वडीलांनी केलेल्या आवाहनाची आठवण करून देत केवळ राजकिय उद्देशाने तिची आणखी बदनामी करू नका असे आवाहन केले.
विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणेनंतर अजित पवार यांनी भाजपाच्या दाव्यातील हवा काढून घेतली.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, दिशा सालियन आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरुवातीला सीबीआयकडे होता. सीबीआयने तपास केल्यानंतर त्यात काही आढळून आले नसल्याची माहिती आपल्या सर्वांपर्यत पोहोचली. त्यानंतर मुंबई पोलिसांकडूनही तपास करण्यात आला. मात्र त्यातही काही आढळून आलेले नसल्याने या प्रकरणाचा तपास जवळपास बंद झाल्यात जमा आहे. असे असताना केवळ राजकिय अभिनिवेषातून हे प्रकरण पुन्हा काढायचे असा आरोप केला.

यासंदर्भात तिच्या आई-वडीलांनी मध्यंतरी सर्वच राजकिय पक्षांना आवाहन केल्याचेही आपण सर्वांनी पाहिले. तीचे आई वडील म्हणाले होते की आमच्या पोटचा गोळा गेला आहे. ती चवथ्या मजल्यावरून पडल्याने तिचा मृत्यू झाला. ती आता गेलेली असताना तीची आणखी बदनामी करू नका. कृपया शांततेत जगू द्या असे आवाहन केल्याची आठवण अजित पवार यांनी करून दिली.

त्यानंतरही राजकिय अभिनिवेष बाळगून या प्रकरणाचा तपास करण्यात येणार असेल यात दिशा सालियन हीचीच बदनामी होणार आहे. तसेच एखाद्या गेलेल्या व्यक्तीबद्दल त्यांच्या मृत्यूनंतर त्याबद्दल फारसं बोलायचं नसतं. त्यामुळे मला तरी त्याबद्दल बोलून तीच बदनामी करायची नाही. त्यामुळे एसआयटी मार्फत चौकशी करण्याचा निर्णयाने दिशा सालियनची बदनामी होण्याचीच शक्यता असल्याची भीती त्यांनी यावेळी व्यक्त केली.

ती ही कोणाची तरी मुलगी आहे, आपली मुलगी आहे असे असताना त्या प्रकरणाचा वापर राजकिय फायद्यासाठी कितपत योग्य आहे असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, दिशा सालियन प्रकरणी तुम्ही जे बोलताय ते प्रसारमाध्यमात आलेल्या बातम्यांच्या आधारे बोलत आहात. हे खरे आहे की, अनेक गोष्टी या तपासात पुढे आलेल्या नाहीत. त्यामुळे त्या पुढे याव्यात असे वाटते. मात्र या प्रकरणी कोणताही राजकिय अभिनिवेष न बाळगता चौकशी केली जाईल असे आश्वासन दिले.

Check Also

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्रासाठी मागितल्या या गोष्टी, पण पंतप्रधान मोदींकडून साधा उल्लेखही नाही

स्वातंत्र्य मिळाल्यावर काँग्रेस विसर्जित करावी असा सल्ला महात्मा गांधींनी दिला होता. त्यानुसार काँग्रेस विसर्जित झाली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *