Breaking News

विरोधकांना बोलण्याची संधी नाकारल्याने जयंत पाटील म्हणाले, तुम्ही तरी निर्लज्जपणा करू नका… अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील निलंबित

आज विधानसभेत फोन टॅपिंगच्या मुद्यावरून विरोधकांनी गदारोळ केल्यानंतर त्यास प्रत्युत्तर म्हणून सत्ताधाऱ्यांकडून दिशा सालियन आत्महत्या प्रकरण पुढे आणण्यात आले. त्यानंतर कामकाज सुरळीत झाल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भास्कर जाधव यांना बोलू देण्याची मागणी केली. मात्र अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भास्कर जाधव यांना बोलू देण्यास परवानगी नाकारली. त्यामुळे विरोधक आपल्याच मुद्यावर ठाम राहिले. त्यातच चिडलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी किमान तुम्ही तरी निर्लज्जपणा करू नका असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना उद्देशून बोलले. त्यावर सत्ताधारी बाकावरील सदस्यांकडून एकच गोंधळास सुरुवात केली. या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज अनेकवेळा तहकूब करावे लागले. त्यामुळे अखेर जयंत पाटील यांना हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीपूरते निलंबित करण्यात आले.

हिवाळी अधिवेशनास सुरुवात झालेल्या दिवसापासून विधानसभेत विरोधकांचा आवाज सत्ताधाऱ्यांकडून मिळत नसल्याचे वारंवार दिसून येत असल्याची भावना विरोधी बाकावरील सदस्यांमध्ये निर्माण झाली होती. तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सत्ताधारी बाकावरील सदस्यांना सातत्याने झुकते माप देत असल्याचेही विरोधी बाकावरील सदस्यांकडून वारंवार खाजगीत बोलले जात होते. त्यातच आज फोन टॅपिंगच्या मुद्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सत्ताधारी बाकावरून दिशा सालियन आत्महत्येचे प्रकरण पुढे आणण्यात आले. या मुद्यावरून विरोधी बाकावरील सदस्य बोलू पहात होते. मात्र विरोधी पक्षाच्या आमदारांना अध्यक्षांनी शेवटपर्यंत संधीच दिली नाही. उलट सातत्याने सभागृह तहकूब केले.

त्यातच दिशा सालियन प्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी चौकशीची घोषणा केली. त्यानंतर अजित पवार हे ही बोलले.
त्यानंतर विरोधी पक्षनेते भास्कर जाधव हे सातत्याने बोलण्याची मागणी करत होते. परंतु त्यांना परवानगी नाकारली जात होती. अखेर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विरोधकांच्यावतीने भास्कर जाधव यांना बोलण्याची संधी द्यावी अशी विनंती विधानसभाध्यक्ष नार्वेकर यांना केली.
परंतु नार्वेकर यांनी ते बोलल्यानंतर या बाजूने कोणी तरी बोलणार, त्यानंतर तिकडून कोणी तरी बोलणार. तुम्ही बोलण्यास परवानगी मागितली. तुम्हाला मी परवानगी दिली. त्यामुळे आता बोलण्यास परवानगी नाही असे स्पष्ट केले.

त्यावेळी विरोधी बाकावरील अनेक सदस्य भास्कर जाधव यांना बोलू देण्यासाठी अध्यक्षाकडील जागेकडे जमा होण्यास सुरुवात केली. तर काही सदस्य तुमच्या नजरेतील हीच का लोकशाही असा सवाल करण्यास सुरुवात करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

तितक्याच सकाळपासून विरोधकांना बोलण्याची संधी नाकरत असल्याच्या भावनेतून राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी किमान तुम्ही तरी निर्लज्जपणा करू नका असे वक्तव्य केले.

त्यावर सत्ताधारी बाकांवरील एक सदस्यांने त्यांना निलंबित करा अवमानकारक शब्द वापरल्याने त्यांना निलंबित करा अशी मागणी करण्यास सुरुवात केली.

त्यावेळी विधानसभाध्यक्ष नार्वेकर यांनी किमान तुमच्याकडून तरी अशी अपेक्षा नव्हती असे सांगत सभागृहाचे कामकाज तहकूब केले. त्यानंतरही सभागृहात गोंधळाची परिस्थिती कायम राहिल्याने कामकाज अनेकवेळा तहकूब केल्याने

त्यानंतर अखेर शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी जयंत पाटील यांच्या निलंबनाची मागणी केली. त्यानंतर सांसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांच्या निलंबनाचा ठराव मांडत हिवाळी अधिवेशनाचा कालावधी संपे पर्यत जयंत पाटील यांना निलंबिनाची कारवाई करावी अशी मागणी केली. त्यानुसार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जयंत पाटील यांना निलंबित करण्यात येत असल्याचा ठराव मंजूर करण्यात येत असल्याचे जाहिर केले.

Check Also

नवनीत राणा यांचे पुन्हा एकदा असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात चिथावणी वक्तव्य

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना भाजपा नेत्या नवनीत राणा म्हणाल्या की “राम भक्त” (प्रभू रामाचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *