Breaking News

उध्दव ठाकरे यांचा भाजपासह शिंदे गटावर निशाणा, तर उद्योगपतीही मुख्यमंत्री-पंतप्रधान होऊ शकतात न्यायालयाने तातडीने निर्णय घेणे अपेक्षित होते

जवळपास मागील सात महिन्यापासून शिवसेना उध्दव ठाकरे गटाची की शिंदे गटाची यावरून राज्यात उत्सुकता लागून राहिली आहे. त्यातच निवडणूक आयोगाकडे यासंदर्भात सातत्याने सुनावणी अद्याप प्रलंबित आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयातही एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या विरोधात अपात्रतेचा निर्णय प्रलंबित आहे. त्यातच भाजपाकडून काही विशिष्ट उद्योगपतींसाठी धोरण राबविले जात असून उद्योगपतींच्या आर्थिक पाठबळाच्या आधारे आमदार-खासदार फोडण्याचे कामही मोठ्या प्रमाणावर आहे. या साऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर पत्रकार परिषद घेत भाजपासह बंडखोर शिंदे गटावर निशाणा साधला.

यावेळी बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले, कोणताही पक्ष जनतेच्या आधारावर स्थापन होत असतो. जर पक्ष फक्त निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवर अवलंबून राहणार असेल, तर उद्या देशातले दोन तीन नंबरचे उद्योगपती आमदार-खासदार फोडून देशाचे पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री होऊ शकतात. त्याला गद्दारी म्हणतात असा टोला भाजपासह बंडखोर शिंदे गटाला लगावला.

तसेच उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले, विधिमंडळ, संसद आणि रस्त्यावरचा असे पक्षाचे तीन प्रकार आहेत. तसेच, दुसरी शिवसेना मी मानत नाही, एकच शिवसेना आहे, असं मी मानतो असंही स्पष्ट करत ते पुढे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी १४ तारखेपासून सलग होणार आहे. निवडणूक आयोगाची सुनावणी पूर्ण झालेली आहे. शिवसेनेनं आमच्याकडून आमचं म्हणणं लिखित स्वरूपात सादर केलं आहे. नेमकं काय होणार? हा प्रश्न सगळ्यांच्याच मनात आहे असेही त्यांनी सांगितले.

मुद्दा स्पष्ट आहे. कोणताही पक्ष जनतेच्या आधारावर स्थापन होत असतो. जर पक्ष फक्त निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवर अवलंबून राहणार असेल, तर उद्या देशातले दोन तीन नंबरचे उद्योगपती आमदार-खासदार फोडून देशाचे पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री होऊ शकतात. त्याला गद्दारी म्हणतात असे सांगत भाजपासह बंडखोर शिंदे गटाला लगावला.

पक्ष दोन पातळीवर असतो. एक वैधानिक म्हणजे विधिमंडळ, दुसरं संसदीय आणि त्यापलीकडचा मोठा पक्ष रस्त्यावरचा असतो. जो पक्ष आपला नेता, आपली घटना पाळतो. जी घटना शिवसेनेला आहे. त्या घटनेनुसार निवडणुका होतात, असेही उद्धव ठाकरे यावेळी स्पष्ट केले.

यावेळची निवडणूक २३ जानेवारीला होणं अपेक्षित होतं. ती निवडणूक आयोगाकडे आम्ही मागणी केली आहे. एकतर ही निवडणूक आम्हाला घेण्याची परवानगी द्या. नाहीतर जे आहे तसंच चालू ठेवा. आयोगाकडून अजून तसं काही उत्तर आलेलं नाही. आयोगाच्या परवानगीनंतर रीतसर निवडणूक होईल. या घटनेनुसारच शिवसेनेतील पदांचा उल्लेख केला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

शिवसेनाप्रमुख हे पद बाळासाहेब ठाकरेंनाच शोभून दिसतो. म्हणून तो शब्द आम्ही गोठवला किंवा तसाच ठेवला. त्यानंतर मी शिनसेना पक्षप्रमुख हे पद निर्माण केलं आणि गेली काही वर्षं मी कारभार बघतोय. शिवसेनेत मुख्य नेता हे पद घटनाबाह्य आहे. ज्या गद्दारांनी शिवसेनेवर दावा सांगितला आहे, त्यांनी शिवसेनेची घटनाच आम्हाला मान्य नाही असं सांगितलंय. शिवसेनेच्या घटनेनुसार त्यांनी मग काही पदांची निर्मिती केली. त्यात विभागप्रमुख हे पद आहे. आयोगाने ज्या गोष्टी सांगितल्या, त्या आम्ही पूर्ण केल्या आहेत. आमच्या पदाधिकाऱ्यांची शपथपत्र आम्ही सादर केली आहेत. आमची सदस्यसंख्याही आम्ही दाखवली असल्याचे त्यांनी सांगितले.

आता गद्दार गटाचा दावा असेल की निवडून आलेले खासदार किंवा आमदार म्हणजेच पक्ष आहे तर ते हास्यास्पद आहे. कारण मग इतके दिवस निवडणूक आयोगानं थांबण्याची गरजच नव्हती. सदस्य संख्येचे गठ्ठे बघून त्यांच्या तोंडचं पाणी पळालं असेल, तर मला त्यात आश्चर्य वाटण्याचं कारण नाहीये. पण देशात लोकशाही आहे असं आपण जर मानतो, तर पक्षांतर्गत लोकशाहीसुद्धा आहे. त्यानुसारच आम्ही निवडणुका घेतो असेही त्यांनी स्पष्ट केले.
तसेच निवडणूक आयोगाचा निर्णय येण्याआधी सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणाचा निकाल यावा, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

बंडखोर एकनाथ शिंदे यांच्यासह १६ जण अपात्र ठरण्याची शक्यता दाट आहे. घटना तज्ज्ञांनी म्हटल्याप्रमाणे त्याचा निर्णय आधी लागावा अशी आमची इच्छा आहे. आयोगाने जे काही मागितले, ते सगळं आम्ही आयोगाला पुरवलं आहे. पण नंतर हे गद्दार गट सांगायला लागले की आमच्याकडे आमदार-खासदार जास्त आहे. एखाद्याला ओसरी राहायला दिली तर तो उद्या घरावर अधिकार सांगायला लागला असा तो प्रकार झाला, असा खोचक टोलाही उद्धव ठाकरे यांनी बंडखोर गटाला लगावला.

निवडून आलेल्या प्रतिनिधींवरच ठरवायचं असतं, आयोगाने एकतर्फी बाजू घेण्याचा निर्णय घेतला असता तर दोन-तीन महिन्यांपूर्वीच आयोग निकाल देऊ शकत होता. पण मधल्या काळात त्यांनी आम्हाला जो खटाटोप करायला लावला, तो आम्ही व्यवस्थित केला आहे. मधल्या काळात आमच्या शपथपत्रांवरही आक्षेप घेतला. मग तो आक्षेप का घेतला? जर तुम्हाला ती मानायचीच नव्हती, तर मग आक्षेप का घेतला? त्यांना आता कळलंय की यांचं पारडं जड आहे. दिशाभूल करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून चालू आहे, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाचे आमदार अपात्र होणारच असल्याचा ठाम दावा करत म्हणाले, घटनेला काहीतरी अर्थ असतो. उगीच तो कागदपत्रांचा खेळ नसतो. त्यामुळे घटनेनुसार आयोगाने काही कायदे केले आहेत. त्यांचं पूर्ण पालन आम्ही करतो. त्याचवेळी कार्याध्यक्ष वगैरे पदं आम्ही घटनेनुसार निर्माण केली. आयोगाच्या मान्यतेनुसारच आम्ही कारभार करतो. आता त्यांची अडचण ही झालीये की त्यांनी व्हीप मोडला आहे. त्यामुळे ते अपात्र तर होणारच. अपात्र झाल्यानंतर पुन्हा दावा कसा सांगणार? त्यामुळे यात वेळ लागावा, विलंब व्हावा म्हणून ही खुसपटं काढायची आणि नको तो युक्तीवाद तिथे करायचा याला काही अर्थ नाही असा ठाम विश्वास व्यक्त करत शिवसेना आमचीच असा विश्वासही व्यक्त केला.

Check Also

पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील दौऱ्यात महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार

भाजपाचा मित्र पक्ष जेडीएसचा लोकसभा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने शेकडो महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर लैंगिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *