Breaking News

आघाडीच्या मोर्चाला परवानगी मिळाल्यावर शरद पवार म्हणाले, मुख्यमंत्री शिंदेनी आधीच… देवेंद्र फडणवीसांनी आघाडीच्या मोर्चाला परवानगी दिल्यानंतर दिली प्रतिक्रिया

मागील काही दिवसांपासून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासह भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी आणि त्यानंतर भाजपा आमदार तथा मंत्री मंगलप्रभात लोढा, प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारी वक्तव्ये केली. त्यावरून राज्यातील राजकिय वातावरण चांगलेच तापले. यावरून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते उध्दव ठाकरे यांनी भाजपावर टीका केली. त्यातच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सीमावादावरून महाराष्ट्राच्या विरोधात तप्त वातावरणात आणखीन तेल ओतले. तसेच राज्यातील वाढती महागाई, बेरोजगारीच्या विरोधात या महाविकास आघाडीच्यावतीने उद्या १७ डिसेंबर २०२२ रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला काही तासांचा अवधी उरलेला असतानाच अखेर शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडीच्या मोर्चाला परवानगी देत असल्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहिर केले. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना शरद पवार म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गुरुवारी बोलताना सांगितलं होतं की, लोकशाहीत मोर्चा काढण्याचा सर्वांना अधिकार आहे. तेव्हा त्यांनी परवानगीबाबत स्पष्ट संकेत दिले होते. त्यामुळे मला त्यात काही आश्चर्य वाटत नाही. या मोर्चासंबंधी लोकांत औत्सुक्य आणि राग आहे.

राग याच्यासाठी की छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करण्यात आली. जबाबदार लोकांनी केलेली ही विधान सामान्य माणसांना अस्वस्थ करणारी आहेत. त्याची प्रतिक्रिया उद्या मोर्चात दिसेल, हा मला विश्वास आहे, असेही ते म्हणाले.

तसेच, ज्या गृहस्थांनी (राज्यपाल) शिवरायांबद्दल अनुचित उद्गार काढले. त्यांच्याबाबत केंद्र सरकारला आज ना उद्या निर्णय घ्यावे लागेल. तो बदल झालेला कदाचित आपल्याला पाह्यला मिळेल असे भाकितही त्यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्याबाबत केले.

या विषयाच्या अनुषंगाने उदयनराजे यांनी चांगली भूमिका घेतली. मात्र राज्य सरकार आणि केंद्र सरकारने जी पुरेशी काळजी घ्यायला पाहिजे होती, ती गेतली नाही. त्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. त्याबाबत लोकांच्या मनात संताप असल्याचेही ते म्हणाले.

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, या मोर्चाला परवानगी देण्यात पोलिसांना काहीच अडचण असण्याचं कारण नाही. महाविकास आघाडीच्या मोर्चाला परवानगी देण्यात आली आहे. त्यांनी ठरलेल्या मार्गानुसार हा मोर्चा काढावा. तो शांततेच्या मार्गाने निघून कायदा सुव्यवस्थेचे पालन करावे.

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *