Breaking News

देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांना टोला, चहापानाच्या ऐवजी पान सुपारी…

पाच राज्यातील विधानसभा निवडणूकांच्या निमित्ताने विरोधकांकडून वेगवेगळे दावे करण्यात येत होते. मात्र निवडणूकांचे निकाल लागताच विरोधी पक्षांच्या आघाडीतच फाटाफुट झाल्याचे दिसत आहे. वास्तविक पाहता हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने विरोधकांकडून सरकारच्या चहापानावर बहिष्कार घातला. मात्र चहापानाच्या कार्यक्रम हा चर्चा करण्यासाठी असतो. मात्र त्यांच्या पत्रकार परिषदेत काही जण झोपले होते. त्या झोपेतच हे पत्र लिहिले की काय अशी शंका उपस्थित करत पत्रात विदर्भ, मराठवाड्यातील प्रश्नांवर लिहिण्यापेक्षा चहापानाच्या कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याची कारणे दिली. त्यामुळे पुढील अधिवेशनाच्या काळात विरोधकांसाठी चहापानाऐवजी पान सुपारीचा कार्यक्रमच ठेवू असा खोचक टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला.

हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने राज्य सरकारच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर आयोजित पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे ही उपस्थित होते.

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, विरोधकांनी नेहमीप्रमाणे सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घातला. मात्र या कार्यक्रमाला गैरहजर राहण्याची कारणे सांगताना विरोधकांनी जे पत्र सरकारला पाठविले. ते पत्र मी पाह्यले, ते पत्र जसे ते निवडणूकीत झोपले त्याच अवस्थेत लिहिले असावे असा खोचक टोला काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव न घेता लगावला.

देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले, विरोधकांनी पत्रात जो मुद्दा उपस्थित केलेला आहे तो कंत्राटी नोकरीच्या जीआरचा, तो जीआर कोणी काढला तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळात काढण्यात आलेला आहे. याचा विसरही विरोधकांना पडलेला आहे. त्यामुळे त्यांना कोणते मुद्दे उपस्थित करायचे याचे भानही राहिलेले नाही अशी टीका केली.

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, यापूर्वी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १२ लाख कोटींची होती. मात्र आज ती ३६ लाख कोटींवर पोहोचली आहे. त्यामुळे राज्यावर कर्ज किती वाढले, विकास किती याची माहिती अर्थमंत्री अजित पवार देतीलच पण आता राज्याची अर्थव्यवस्था ही संतुलित असल्याचा दावा केला.

याशिवाय देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विरोधकांनी त्यांच्या एनसीआरटीचा मुद्दा उपस्थित केला. पण विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी तो मुद्दा उपस्थित केला. मात्र एनसीआरटीच्या अहवालात वेगवेगळ्या गोष्टींवर भाष्य नसतं. तर त्यात सगळे गुन्हे एकत्रितरित्या ग्राह्य धरण्यात येतात. काही विरोधकांनी तर महाराष्ट्र गुन्हेगारीत २ ऱ्या स्थानी असल्याचा आरोप केला. मात्र खरे पाह्यला गेलं तर महाराष्ट्र हा गुन्हेगारीत ८ व्या स्थानी आहे हे सांगणे हे ही काही भूषणावह नसल्याची स्पष्टोक्ती देत विरोधकांच्या आरोपातील हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला.

तसेच विरोधकांनी लावलेल्या बॅनरबाजीवरून बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही विरोधकांनी लावलेले काही पोस्टर लावलेले पाह्यले. त्यावर उल्लेख केलेला होता की, फक्त १० दिवसांचे अधिवेशन. पण विरोधकांना एक गोष्ट कळायला पाहिले होती की, अधिवेशनातील कामकाज किती पूर्ण होते. ते पाहून पुढील कालावधी वाढवायचा की नाही हे ठरविण्यासाठी १९ तारखेला विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. त्यात अधिवेशनाच्या कालावधीबाबतचा निर्णय घेण्यात येईल असे सांगितले.

त्याबरोबर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, यापूर्वीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आम्ही म्हणायचो की, हिवाळी अधिवेशन नागपूरात घ्या, आम्ही सल्लागार समितीच्या बैठकीतही मागणी करायचो. पण ते कोविड असल्याचे कारण पुढे करत अधिवेशन नागपूरात घेत नव्हते. त्यामुळे जे अधिवेशन घेतच नव्हते त्यांनी जरा स्वतःकडेही पहावे असे सांगत आता हिवाळी अधिवेशन नागपूरात आम्ही घेत आहोत तर विरोधक आमच्यावर आरोप करत आहेत असा पलटवार उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता विरोधकांवर केला.

विरोधकांवर टीका करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणूकीत मोदी यांच्या नेतृत्वाखाली पाच पैकी तीन राज्यात भाजपाची सत्ता आली. परंतु विरोधक आरोप करत आहे की, ईव्हीएममुळे आणि दडपशाहीच्या जोरावर सत्ता आली. या मानसिकतेतून जोपर्यंत विरोधक बाहेर येत नाहीत. तो पर्यंत त्यांचा पराभव असा होतच राहणार आहे. त्यामुळे या मानसिकतेतून बाहेर पडावे असे आवाहन करत नाही तर पुढील निवडणूकीत यापेक्षा वाईट अवस्था होईल असा इशारा देत उत्तर भारतातील राज्यांमध्ये भाजपाने विजय मिळविला आणि दक्षिण भारतात काँग्रेस विजयी झाल्याने उत्तर भारत विरूध्द दक्षिण भारत असा काही सामना होणार नाही असेही सांगितले.

Check Also

सुनिता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यास मुभा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *